कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणात तपास यंत्रणेने नेमके हल्लेखोर कोण. ? ते अगोदर निश्चित करावे ...ऍड. वीरेंद्र इचलकरंजीकर.

प्रत्यक्षात अन्वेषण पथकाने उच्च न्यायालयासमोर काय सादर केले ते अद्यापि गुलदस्त्यात.

प्रेस मीडिया लाईव्ह :

 मुरलीधर कांबळे :

कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणात तपास यंत्रणेने नेमके हल्लेखोर कोण. ?  ते अगोदर निश्चित करावे, असा युक्तिवाद आज संशयित आरोपींच्या वतीने ऍड. वीरेंद्र इचलकरंजीकर यांच्याकडून करण्यात आला.कोल्हापूर जिल्हा आणि सत्र न्यायाधीश बी. डी. शेळके यांच्या समोर सुरू असलेल्या सुनावणीत कॉ. पानसरे हत्या प्रकरणात डॉ. वीरेंद्रसिंह तावडे आणि सचिन अंदुरे यांची निर्दोष मुक्तता करावी, या मागणीसाठी युक्तिवाद झाला. पुढील सुनावणी 25 मार्च रोजी होणार असल्याची माहिती ऍड. इचलकरंजीकर यांनी दिली. यावेळी ऍड. समीर पटवर्धन यांनीही युक्तिवाद केला. या प्रकरणात अटक केलेले अन्य संशयित मुंबई, पुणे, तसेच बंगळुरू येथील कारागृहातून 'व्हिडीओ कॉन्फरन्स'द्वारे उपस्थित होते.


ऍड़ इचलकरंजीकर म्हणाले, कॉ. पानसरे हत्या प्रकरणात सुरुवातीला समीर गायकवाड याने गोळ्या झाडल्याचा पोलिसांचा दावा केला आहे. 2015 मध्ये या प्रकरणात पहिल्या टप्प्यातील तपासात प्रत्यक्ष आरोपी म्हणून दोघेच असल्याचे पोलीस सांगत होते. त्यातील पहिला संशयित व गोळी झाडणारा म्हणून समीर गायकवाड याला अटक केली. त्याला ओळखल्याच्या काही साक्षीही पोलिसांनी त्यावेळी दाखवल्या. मात्र, यातील दुसरा आरोपी कोणता हे अद्यापि समोर आलेले नाही.

दुसऱ्या आणि तिसऱ्या तपासात वेगळ्याच आरोपींनी गोळ्या झाडल्याचा पोलिसांचा दावा असून, ते दोघे सारंग अकोलकर आणि विनय पवार असल्याचे सांगत आहेत. पुढच्या तपासात वासुदेव सूर्यवंशी गाडी चालवणारा आणि गोळ्या झाडणारा सचिन अंदुरे असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे पोलिसांनीच सादर केलेल्या तपासातून प्रत्येक वेळी गोळ्या झाडणारा संशयित वेगवेगळा असल्याचे समोर येत असल्याचा युक्तिवाद त्यांनी केला. प्रत्येक वेळी उच्च न्यायालयाचे नाव सांगून दबाव निर्माण करण्याचा तपास यंत्रणांचा प्रयत्न असून, प्रत्यक्षात अन्वेषण पथकाने उच्च न्यायालयासमोर काय सादर केले ते अद्यापि गुलदस्त्यात आहे. अटक केलेल्या संशयितांनी आणखी किती वर्षे अशाच प्रकारे काढायची असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post