कर्नाटकात आता नव्या वादाची ठिणगी पडली

प्रेस मीडिया लाईव्ह :

  कर्नाटकात आता नव्या वादाची ठिणगी पडली आहे. कर्नाटक सीमेवरील काही भागांमध्ये मुस्लिम दुकानदारांवर वार्षिक जत्रां मध्ये 'स्टॉलबंदी' घातल्याचे वृत्त नुकतेच समोर आले आहे.त्रेत्यामुळे आधीच हिजाबवादामुळे आक्रमक झालेल्या मुस्लिम संघटना यावर काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


'इंडियन एक्सप्रेस'ने दिलेल्या वृत्तानुसार, एप्रिल-मे महिन्यामध्ये अनेक शहरांमध्ये आणि गावांमध्ये जत्रोत्सवाचे आयोजन केले जाते. गावाच्या कुलदैवताच्या भागामध्ये आयोजित जत्रोत्सवामध्ये आजूबाजूच्या भागातील दुकानदार जात-धर्म विसरून आपली दुकाने थाटतात आणि वर्षभराची कमाई करतात. मात्र कर्नाटकमधील काही भागांमध्ये अशा जत्रोत्सवामध्ये मुस्लिम दुकानदारांना दुकाने लावण्यासाठी होणाऱ्या लिलावामध्ये सहभागी होण्यास मनाई करण्यात आली आहे.

कर्नाटक उच्च न्यायालयाने दिलेल्या शाळा-कॉलेजमधील हिजाबबंदीच्या निर्णयाविरोधात मुस्लिमांनी पुकारलेल्या
बंद विरोधात काही कट्टर हिंदू संघटनांनी आक्रमक भूमिका घेतल्याने जत्रोत्सवाच्या आयोजकांनीही मुस्लिमांसाठी स्टॉलबंदी केली आहे. 20 एप्रिल रोजी महालिंगेश्वर मंदिराचा वार्षिक जत्रोत्सव होणार आहे. या उत्सवासाठी होणाऱ्या लिलावामध्ये मुस्लिमांना सहभागी होण्यास बंदी घालण्यात आली आहे. जत्रोत्सवासाठी 31 मार्च रोजी होणाऱ्या लिलावामध्ये फक्त हिंदू सहभागी होतील, असे आयोजकांनी स्पष्ट केले आहे.

महालिंगेश्वर मंदिराप्रमाणे उडुपी जिल्ह्यातही असाच प्रकार पाहायला मिळाला. कौपमध्ये होसा मारिगुडी मंदिराच्या  जत्रोत्सवा मध्येही मुस्लिमांना स्टॉल लावण्यास मनाई करण्यात आली आहे. या जत्रोत्सवासाठी 18 मार्च रोजी लिलाव होणार आहेत. मात्र या लिलावामध्ये मुस्लिमांना सहभागी होता येणार नाही असे आयोजकांनी स्पष्ट केले आहे. मंदिर प्रशासन समितीचे अध्यक्ष रमेश हेडगे यांनी याबाबत एक प्रस्ताव पारीत केला असून यात फक्त हिंदू लोकच दुकानांच्या लिलावामध्ये सहभागी होतील असा निर्णय घेण्यात आला आहे.

दक्षिण कन्नड जिल्ह्यातील बप्पनडुई श्री दुर्गापमेश्वरी मंदिराच्या वार्षिक जत्रोत्सवामध्ये एक पोस्टर सर्वाचे लक्ष वेधून घेत आहे. जे लोक कायद्याचा सन्मान करत नाहीत, जे लोक आम्ही देवासमान पुजणाऱ्या गायीची हत्या करतात त्यांना व्यावसाय करण्याची परवानगी दिली जाणार नाही. त्यांना उद्योगधंद्यांची परवानगी देणार नाही. हिंदूंनो जागरुक व्हा, असे पोस्टर जत्रोत्सवात लावण्यात आले आहे. याबाबत हिंदू जागरण वेदिकाचे मंगळुरू विभागाचे महासचिव प्रकाश कुक्केहल्ली (Prakash Kukkehalli) यांनी सांगितले की, कर्नाटक उच्च न्यायालयाच्या हिजाबबंदीबाबतच्या निर्णयाचा मुस्लिमांनी आपली दुकाने बंद करून निषेध केला होता आणि याबाबत स्थानिक मंदिरांमध्ये पुजा करणाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळेच असा निर्णय घेण्यात आला असावा अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली.

Post a Comment

Previous Post Next Post