त्याच कालावधीत पुणे महानगरपलिकेची निवडणूक जाहीर होईल...



प्रेस मीडिया लाईव्ह : 

जिलानी उर्फ मुन्ना शेख :

पुणे - राज्यात सर्वत्र कोरोना मुळे लावण्यात आलेले निर्बंध , त्यात ओबीसी राजकीय आरक्षण या मुद्यामुळे महानगरपालिकेच्या निवडणूका लांबणीवर पडणार अशी  जोरदार चर्चा सुरू असताना प्रारूप प्रभाग रचना जाहीर करण्यात आली. त्यानंतर शुक्रवारी (दि.25) आणि शनिवारी (दि.26) हरकती-सूचनांवर सुनावणीही झाली आहे. तर, दि. 2 मार्चला या संदर्भातील अहवाल निवडणूक आयोगाकडे जाहीर होऊन अंतिम प्रभाग रचना जाहीर होईल. त्यानंतर प्रभाग आरक्षणाची प्रक्रिया सुरू होणार आहे. 

महानगरपालिका निवडणुकी संदर्भातील ही प्रक्रिया वेळापत्रकानुसार सुरू असताना निवडणूक आयोगाने जिल्ह्यातील मुदत संपलेल्या नगरपालिकांच्या प्रभाग रचनेचा कार्यक्रमही जाहीर केला आहे. अर्थातच महानगरपालिकेच्या निवडणूक झाल्यानंतरच नगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत  .

महानगरपालिका तसेच नगरपालिका निवडणुका लांबणीवर पडण्यामागचे  मुख्य  कारण ओबीसींचे राजकीय आरक्षण हाच महत्त्वाचा मुद्दा आहे. परंतु , हे आरक्षण पुन्हा लागू करण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने जोरदार हालचाली सुरू आहेत  त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाकडून मुदत संपलेल्या महानगरपालिका तसेच नगरपालिकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम वेळापत्रकानुसार राबविला जात आहे.

नगरपालिकांसाठी प्रारुप प्रभाग रचनेचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे दि. 2 मार्चपर्यंत सादर करण्याचे आदेश मुख्याधिकाऱ्यांना आहेत. तर, दि. 2 मार्चला पुणे महानगरपालिका प्रभाग रचनेबाबतचा अंतिम अहवाल आयोगाला सादर केला जाणार आहे.
नगरपालिकेच्या प्रभाग रचनेवर दि. 10 ते 17 मार्चपर्यंत हरकती आणि सूचना मागवण्यात आल्या आहेत. याच कालावधीत पुणे महापालिकेची प्रभाग आरक्षण जाहीर होण्याची  शक्‍यता आहे. नगरपालिकांच्या अंतिम प्रभाग रचनेचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोग दि. 1 एप्रिलपर्यंत जाहीर करणार असताना त्याच कालावधीत पुणे महानगरपलिकेची निवडणूक जाहीर होईल, अशी चवीने चर्चा राजकीय  वर्तुळातून जोरदार पणे सुरू आहे.

Post a Comment

Previous Post Next Post