भाजपचा निषेध करण्यासाठी काँग्रेसचा महानगरपालिकेवर हंडा मोर्चा

१५ दिवसांत पाणी पुरवठा सुरळीत केला नाही, तर महानगरपालिका भवनाला हजारो महिलांसह घेराव घालू...कॉंग्रेसचे शहराध्यक्ष डॉ. कैलास कदम.


प्रेस मीडिया लाईव्ह : 

अनवरअली शेख :

पिंपरी चिंचवड : गेल्या चार वर्षापासून पिंपरी चिंचवड शहरात एक दिवसा आड पाणी पुरवठा होत आहे. शहराला पाणीपुरवठा करणारे पवना धरण मागील पावसाळ्यात शंभर टक्के भरूनही शहरातील बहुतांश भागात कमी दाबाने अनियमित पाणी पुरवठा होत आहे.त्यामुळे त्या विरोधात व महानगरपालिकेतील सत्ताधारी भाजपचा  निषेध करण्यासाठी शहर कॉंग्रेसने आंदोलन करीत गुरुवारी ता.२४ फेब्रुवारी महानगरपालिकेवर हंडा मोर्चा काढला. १५ दिवसांत पाणी पुरवठा सुरळीत केला नाही, तर महानगरपालिका भवनाला हजारो महिलांसह घेराव घालू, असा सणसणीत इशारा यावेळी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष डॉ. कैलास कदम यांनी दिला आहे.

कॉंग्रेसच्या महिला शहराध्यक्षा सायली नढे यांच्या नेतृत्वाखाली हा हंडा मोर्चा काढण्यात आला. माजी नगरसेविका निर्मला कदम तसेच छाया देसले, निर्मला खैरे, वैशाली शिंदे, तुलसी नांगरे, स्वाती शिंदे, भारती घाग, डॉ. सुनिता पुलावळे, रमा भोसले, सुप्रिया मलशेट्टी, रझीया शेख, आशा भोसले, अनिता डोळस, रेखा ओव्हाळ, शिल्पा गायकवाड, दिशा बनसोडे, कल्पना बनसोडे, नंदा तुळसे, अनिता धर्माधिकारी आदी त्यात सामील झाल्या होत्या. तो पालिका प्रवेशव्दारावर पोलिसांनी अडवला. त्यामुळे तेथेच त्याचे सभेत रूपांतर झाले.मागील पालिका निवडणुकीलाच भाजपने शहरात २४ तास पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन दिले होते. पण त्यांनी ते पूर्ण केले, तर नाही, उलट शहरात दिवसाआड पाणी सुरु केले. ते सुद्धा गढूळ. त्यामुळे रोगराई पसरत आहे.

मागील निवडणूक जाहीरनाम्यातील एकही आश्वासन त्यांनी पूर्ण केले नाही, असे कदम म्हणाले. राज्याचे अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांना काल ईडीने अटक करणे हे महाविकास आघाडी सरकारला जाणूनबुजून त्रास देण्याचे षडयंत्र असल्याचेही ते म्हणाले. सभेनंतर नढे, कदम यांच्या शिष्टमंडळाने आयुक्त राजेश पाटील यांना वरील इशाऱ्याचे निवेदन दिले.

Post a Comment

Previous Post Next Post