गझलसादच्या वतीने मराठी राजभाषा दिन मैफलीने साजरा



प्रेस मीडिया लाईव्ह :

कोल्हापूर ता. २७  येथील गझलसाद समूहाच्या वतीने  मराठी राजभाषा दिन अर्थात कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिना निमित्ता मराठी गझल मैफल आयोजित केली होती. गझलसादचे निमंत्रक प्रा.नरहर कुलकर्णी यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. ज्येष्ठ रसिक कलावंत सुभाष नागेशकर यांच्या हस्ते कविवर्य कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. निनाद खाडिलकर यांनी 'लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी' हे सुरेश भट यांचे मराठी अभिमानगीत गाऊन मैफलीची सुरुवात केली. त्यानंतर कविवर्य कुसुमाग्रज यांच्या पृथ्वीचे प्रेमगीत पासून स्वातंत्र्यदेवतेच्या विनवणीपर्यंत काही कविता सादर करण्यात आल्या.यावेळी सुरेश भट यांचा नव्वदावा जन्मदिन आणि गझलसाद समूहाच्या पाचवा वर्धापन दिन याचे औचित्य साधून एप्रिल महिन्यात गझलसाद  समूहाच्या वतीने प्रातिनिधिक गझल संग्रह प्रकाशित करण्याचे ठरविण्यात आले.

या गझल मैफलीची सुरुवात सारिका पाटील यांनी 'गंधाळते बनुनिया दारात पारिजातक ,आहे जपून बाई श्वासांत पारिजातक,सर्वस्व दान करणे ठाऊक फक्त ज्याला ,वसतो समर्पणाच्या प्राणात पारिजातक ' अशा गंधाळत्या गझलेने केली. त्यानंतर प्रवीण पुजारी यांनी "वळवाल तशी माझी वळते माय मराठी ,शब्दांनाही वेड लावते माय मराठी असा मराठीचा जागर करत , 'आयुष्य गीत गाता, गाईन मारवा मी

ना चंद्र ना प्रभाकर, होईन काजवा मी ' ही गझल सादर केली. हेमंत डांगे यांनी ,' लिहितो आहे जाणवलेले, काही क्षण हे सापडलेले, मी ह्या आनंदात बुडालो, गडे तुला मी वाचवलेले ' ही गझल सादर केली.

 नरहर कुलकर्णी यांनी ' मी कल्पना आहे तुझी साकारतो दुसरा कुणी, आहे तुझाच विचार मी मज मांडतो दुसरा कुणी, तू सांग का या गोठल्या संवेदना ह्रदयातल्या  मी छेडतो तारा तुझ्या झंकारतो दुसरा कुणी " ही गझल सुरेल आवाजात गाऊन सादर केली.प्रा.डॉ.सुनंदा शेळके यांनी ' कविता होती सोबत म्हणुनी जगणे झाले,करुणा घेऊन जगाकडे या बघणे झाले ' या गझलेसह 'मघाशी पावले दारी कुणाची वाजली होती,उघडता दार हलक्याने जराशी लाजली होती ' ही गझल मधुर आवाजात गाऊन सादर केली.

डॉ .दिलीप कुलकर्णी यांनी घरपण होते बेघर, भरल्या घरात शिरता विषवेली,सुखासुखी ना कुठे जन्मते कविता व्यथेत भिजलेली ' ही गझल आणि ' मराठी असे आमुची मायबोली आताशा थके ही माऊली ही तरी, हिला इंग्रजी डोस देऊन आम्ही हिचे पुत्र आणून हिला तर्तरी ' मी हजल सादर केली.

प्रसाद कुलकर्णी यांनी 'जळता जळता गझल चितेला दिसली माझी,आग तिलाही असेल नक्की कळली माझी,आपण नसतो गझलेपेक्षा कधीच मोठे ,गझल मनावर असेच ठसवत फुलली माझी ' या  गझलेने मैफलीचा समारोप केला. कोल्हापुरातील नागेशकर कलादालनात ही मैफल संपन्न झाली.

फोटो : कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करताना सुभाष नागेशकर आणि गझलसादचे गझलकार

Post a Comment

Previous Post Next Post