वाहन चालकांनी नियम मोडणार नाही, याची खबरदारी घेणे गरजेचे

इंटरसेप्टर व्हेईकलद्वारे  अनेक वाहनचालकांना आतापर्यंत ऑनलाइन दंड ठोठावण्यात आला ..


प्रेस मीडिया वृत्तसेवा :

 सोलापूर : महामार्गावरून वाहन चालवताना वाहन चालकांनी नियम मोडणार नाही, याची खबरदारी घेणे गरजेचे आहे.रस्त्यालगत थांबलेल्या इंटरसेप्टर व्हेईकलद्वारे  अनेक वाहनचालकांना आतापर्यंत ऑनलाइन दंड ठोठावण्यात आला आहे. दुसरीकडे, वाहतूक पोलिसांनी हात करूनही न थांबलेल्या वाहनांवर ई-चलनद्वारे  दंड करण्यात येत आहे. अनेक वाहनचालकांना आपल्याला दंड केल्याची माहितीदेखील नाही, ही वस्तुस्थिती आहे. 

रस्ते अपघात  कमी व्हावेत, वाहन चालकांना स्वयंशिस्त लागावी म्हणून सातत्याने दंडात्मक कारवाई केली जात आहे. सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरून  प्रवास करणाऱ्या बेशिस्त वाहनचालकांना मोठ्या प्रमाणावर दंड केला जात आहे. या मार्गावर पाकणी, मोडनिंब, इंदापूर  या ठिकाणी वाहतूक पोलिस थांबूनही कारवाई करताना पाहायला मिळतात. राष्ट्रीय महामार्ग पोलिसांनी फिक्‍स पॉईंट करूनही अनेकदा वाहतूक पोलिस सावळेश्‍वर टोल नाका परिसरात थांबलेले असतात. या महामार्गावरून प्रवास करताना एका ठिकाणी वाहतूक नियम मोडल्याचा दंड केल्यानंतर पुढेही तशाच प्रकारचा दंड केला जात असल्याच्याही तक्रारी येत आहेत. अनेकांना आपल्या वाहनावर दंड असल्याची माहितीदेखील नाही. तर गाडी त्या ठिकाणी गेलेली नसतानाही दंडाचा मेसेज आल्याच्या तक्रारी वाढत आहेत. राज्यातील बहुतेक वाहनांवर तशा प्रकारचा दंड आहेच, अशी स्थिती निर्माण झाली आहे. शहर-ग्रामीण पोलिस दलातील वाहतूक पोलिसांकडेही ई-चलनची मशीन देण्यात आली आहे. त्यांच्यासह आरटीओकडूनही (RTO) दंड ठोठावला जात आहे. या सर्व कारवायांमुळे वाहनचालक त्रस्त झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

गाडीच्या किमतीपेक्षाही दंड अधिक

एका वाहनचालकाने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, माझ्याकडे काही वर्षांपूर्वी घेतलेली दुचाकी आहे. शेतात, बाजारासाठी वापरून ती दुचाकी खराब झाली असून कामानिमित्त काही ठराविक अंतरावर जावे लागते. अनेकदा वाहतूक पोलिसांनी तर काहीवेळा इंटरसेप्टर व्हेईकलद्वारे दंड झाल्याचे काही महिन्यांनी समजले. दंडाची रक्‍कमच एवढी झाली आहे की, गाडी विकूनही तेवढे पैसे येणार नाहीत.

वाहनावरील दंड चेक तथा रद्द करण्यासाठी...

  • तुमच्या वाहनावरील दंड mahatraffic.echallan.gov.in वरून तपासता येईल

  • चुकीच्या पद्धतीने दंड झाल्यास helpdesk@mahatrafficechallan.gov.in वरून रद्द करा

  • नियमभंग केला नसतानाही दंड झाल्यास महाट्रॅफिक या ऍपवरूनही तक्रार नोंदविता येईल

  • हेल्मेट नसल्यास पाचशेचा ऑनलाइन दंड; लेन कटिंग, विरुद्ध दिशेने गेलेल्यांनाही दंड

  • इंटरसेप्टर व्हेईलकलद्वारे ज्यांना दंड करता येत नाही, त्यांच्यावर वाहतूक पोलिसांकडून कारवाई

सर्व वाहनचालकांनी शिस्तीचे पालन करणे आवश्‍यक आहे, जेणेकरून अपघातात जीव गमवावा लागणार नाही. सर्व वाहनचालकांनी त्यांच्या वाहनांना ई-चलन अथवा इंटरसेप्टर व्हेईकलद्वारे झालेला दंड वेळेत भरायला हवा. डिसेंबरमधील लोकअदालतीतून जवळपास एक हजार 400 कोटींचा दंड वसूल झाला आहे.

- प्रीतमकुमार यावलकर  उपअधीक्षक, महामार्ग सुरक्षा पथक, पुणे परिक्षेत्र

Post a Comment

Previous Post Next Post