-सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे सत्र परीक्षा

ऑनलाइन होणार की ऑफलाइन अशी संभ्रमाची स्थिती 


प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली शेख :

 पुणे -सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे सत्र परीक्षा येत्या फेब्रुवारीत होणार आहे. या परीक्षेची पद्धत ऑफलाइन की ऑनलाइन हे निश्‍चित करण्यासाठी विद्यापीठाने समिती नियुक्‍त केली आहे.तिचा अहवाल आठवडाभरात येणार असून, त्यानंतर परीक्षेची पद्धत ठरविण्यात येणार आहे. ही परीक्षा ऑफलाइन होण्याची चिन्हे आहेत.

विद्यापीठाची हिवाळी सत्राची परीक्षा अद्याप झालेली नाही. ऑफलाइन परीक्षांच्या तुलनेत ऑनलाइन परीक्षांच्या निकालात वाढ झाल्याने ऑनलाइन परीक्षांच्या गुणवत्तेबाबत प्रश्‍नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. एकीकडे महाविद्यालये सुरू झालेली असली, तरी ऑफलाइन परीक्षा घ्यायच्या झाल्यास अद्याप वसतिगृहे सुरू झालेली नसल्याने बाहेरगावी असलेल्या विद्यार्थ्यांच्या निवासाचा प्रश्‍न निर्माण होणार आहे. त्यामुळे परीक्षा ऑनलाइन होणार की ऑफलाइन अशी संभ्रमाची स्थिती आहे.

या पार्श्‍वभूमीवर कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी परीक्षा पद्धत ठरवण्यासाठी समितीची नियुक्ती केली आहे. तर पारंपरिक पदवी-पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांची परीक्षा फेब्रुवारीमध्ये घेण्याचे नियोजन आहे. दरम्यान, विद्यार्थी मात्र संभ्रमात सापडले आहेत.

निर्णय लवकर घ्या

परीक्षा पद्धत ठरवण्यात वेळ घालवून विद्यापीठ परीक्षा घेण्यास दिरंगाई करत असल्याची टीका विद्यार्थी संघटना करत आहेत. परीक्षा उशिरा झाल्याने पुढील शैक्षणिक सत्र आणि शैक्षणिक वर्ष उशिरा सुरू होऊन परीक्षा, निकाल जाहीर होण्यास उशीरच होईल. या सगळ्याचा परिणाम म्हणून विद्यार्थ्यांचे पुढील शैक्षणिक प्रवेश आणि नोकरीच्या संधीवर होणार आहे. त्यामुळे परीक्षा पद्धत लवकरच जाहीर करण्याची मागणी विद्यार्थ्यांमधून होत आहे.


फॉलो करा : फेसबुक , ट्विटर ,  टेलिग्रामवर .

Post a Comment

Previous Post Next Post