प्रेस मीडिया वृत्तसेवा :
अनवरअली शेख
पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रदेश उपाध्यक्षा रुपाली पाटील - ठोंबरे यांनी आपल्या सर्व पदांसह पक्षाचा प्राथमिक सदस्य पदाचा राजीनामा दिला आहे . त्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पुणे दौरा पूर्वीच पक्षाला मोठा धक्का बसला आहे . रुपाली ठोंबरे यांनी राज ठाकरे यांना पत्र लिहून आपला राजीनामा दिला आहे .
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर
राजकीय क्षेत्रात भूकंप....
मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुढील दोन दिवस राज ठाकरे पुणे जिल्हा आणि पुणे शहराच्या दौऱ्यावर आहेत . मात्र , राज ठाकरे पुण्यात येण्याआधीच रुपाली पाटील यांनी राजीनामा दिला आहे त्यामुळे मनसेच्या गोटात खळबळ उडाली आहे . दरम्यान , मनसेच्या सर्व पदांचा आणि पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर रुपाली पाटील या आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे . राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्याशी त्यांची चर्चा झाली आहे . जगताप यांनी दिलेल्या माहितीनुसार येत्या शुक्रवारी रुपाली पाटील या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे . मात्र त्याबाबत अद्याप खात्रीलायक माहिती मिळालेली नाही .
मी माझ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षातील सर्व पदासह पक्षाचा प्राथमिक सदस्य पदाचा राजीनामा देत आहे , असं रुपाली ठोंबरे यांनी स्पष्टपणे पत्रात लिहिलं आहे . तसंच , ' आपण दिलेलं बळ नेहमी संघर्ष करण्याची प्रेरणा देत . यापुढेही आपले आशीर्वाद आणि ' श्री . राज ठाकरे ' हे नाव हृदयात कोरलेले कायम राहिल ' अशी भावना व्यक्त करत ठोंबरे यांनी राजीनामा दिला आहे .