श्री दत्त (शिरोळ) ला देश पातळीवरील उत्कृष्ट ऊस विकासाचा पुरस्कार प्रदान



प्रेस मीडिया वृत्तसेवा :

शिरोळ/प्रतिनिधी :

येथील श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्यास नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑपरेटीव्ह शुगर फॅक्टरी, नवी दिल्ली यांच्याकडून देशपातळीवरील उच्च साखर उतारा क्षेत्रातील उत्कृष्ट ऊस विकास पुरस्कार देशाचे माजी कृषीमंत्री शरदचंद्रजी पवार यांच्या हस्ते कारखान्याचे चेअरमन गणपतराव पाटील यांना प्रदान करण्यात आला.

देश पातळीवरील नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑपरेटीव्ह शुगर फॅक्टरीज् ही संस्था दरवर्षी देशातील सहकारी साखर कारखान्यांच्या एकूण कामकाजाबद्दल आढावा घेवून त्यांच्या वार्षिक साधारण सभेमध्ये अशा अग्रगण्य संस्थांना पुरस्कार प्रदान करते. या वर्षी श्री दत्त कारखान्याने गत हंगामामध्ये ऊस विकास योजने अंतर्गत हाती घेतलेल्या एकरी दोनशे टन व एकरी दिडशे टन ऊस

उत्पादन तसेच सेंद्रिय कर्ब वाढीसाठी राबविलेल्या विविध उपक्रम व सेंद्रिय शेतीस दिलेले प्रोत्साहन या बाबींची दखल घेवून हा देशपातळीवरील उच्च साखर उतारा क्षेत्रातील उत्कृष्ट ऊस विकास पुरस्कार या संस्थेस प्रदान केला आहे. श्री दत्त शिरोळ कारखान्याला ऊस विकास, तांत्रिक निकष, उत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापन, जास्तीत जास्त एकरी सरासरी उसाचे उत्पादन काढणे, जास्तीत जास्त साखर निर्यात करणे इ. विविध कामामध्ये केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल आत्तापर्यंत ६५ पुरस्कार मिळालेले आहेत.याही पुरस्कारामुळे कारखान्याने आपली यशाची उज्वल परंपरा जपली आहे.

या कार्यक्रमास राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, आरोग्य मंत्री राजेश टोपे, सहकार राज्यमंत्री विश्वजीत कदम, उत्तर प्रदेश राज्याचे सहकार मंत्री बी. एल. वर्मा, मुख्य सचिव ए. रेड्डी, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, फेडरेशनचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर उपस्थित होते.

 कारखान्याच्या वतीने पुरस्कार स्वीकारण्यासाठी कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन इंद्रजीत पाटील, कार्यकारी संचालक एम. व्ही. पाटील, ऊस विकास अधिकारी दिलीप जाधव आदी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post