20 ऑक्‍टोबरपासून महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय जाहीर



प्रेसे मीडिया वृत्तसेवा : 

पुणे- राज्याचे उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दि. 20 ऑक्‍टोबरपासून महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्या पार्श्‍वभूमीवर सोमवारी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने संलग्नित महाविद्यालयांना नियमित वर्ग सुरू करण्यासंदर्भात सूचना दिल्या आहेत.

राज्यातील इयत्ता आठवी ते बारावीचे वर्ग यापूर्वीच सुरू करण्यात आले. तसेच राज्यातील करोनाबाधित रुग्णांची संख्या आटोक्‍यात आली आहे. त्यामुळे राज्यातील सर्व विद्यापीठे व संलग्नित महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी ऑफलाइन पद्धतीने नियमित वर्ग सुरू करणे योग्य राहील. त्याचा विचार करून महाविद्यालये 20 ऑक्‍टोबरपासून सुरू करण्याचे आदेश उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून राज्यातील सर्व विद्यापीठांना दिले होते. त्यानुसार पुणे विद्यापीठाने संलग्नित महाविद्यालय प्राचार्य व मान्यताप्राप्त परिसंस्थांचे संचालकांना करोना प्रतिबंधात्मक उपाययोजना करून नियमित वर्ग सुरू करण्यासंदर्भात परिपत्रकाद्वारे सूचना दिल्या आहेत.

पुणे विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात असलेल्या नाशिक व नगर जिल्ह्यातील सर्व संलग्नित महाविद्यालयांनी स्थानिक प्रशासनाने निर्गमित केलेल्या आदेशानुसार महाविद्यालय सुरू करण्यासंदर्भात कार्यवाही करावी. त्याचप्रमाणे चालू सत्राचा अभ्यासक्रम विहित कालावधीत शिकवून पूर्ण करण्याची जबाबदारी संबंधित प्राध्यापक व प्राचार्यांची राहील, असेही विद्यापीठाने स्पष्ट केले आहे.राज्यातील वरिष्ठ महाविद्यालये दि. 20 पासून सुरू होत आहेत. सर्वांनी महाविद्यालात येताना शासनाने आणि विद्यापीठांनी घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणाने पालन करावे. विद्यार्थ्यांची सुरक्षितता ही देखील आम्हाला महत्त्वाची आहे.

- उदय सामंत, उच्च शिक्षणमंत्री, महाराष्ट्र


पुणे विद्यापीठाची नियमावलीच नाही

करोनाच्या पार्श्‍वभूमीवर स्थानिक परिस्थिती विचारात घेऊन संबंधित विद्यापीठाने महाविद्यालयांना नियमित वर्ग सुरू करण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना अथवा मानक कार्य प्रणाली (एसओपी) जाहीर करावी, असे स्पष्ट आदेश राज्य शासनाने दिले आहेत. त्यानुसार मुंबई विद्यापीठाने वर्ग सुरू करण्यासंदर्भात नियमावली जाहीर केली. मात्र प्रतिष्ठित असलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने राज्य शासनाच्या 13 ऑक्‍टोबरच्या शासन निर्णयानुसार वर्ग सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मुळात विद्यापीठाने पुढाकार घेत विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून नियमावली प्रसिद्ध करणे अपेक्षित होते. मात्र काहीच नियमावली जाहीर न करता विद्यापीठाने वर्ग सुरू करण्याबाबत सर्व जबाबदारी महाविद्यालय प्रशासनावर सोपविली आहे. त्यावरून विद्यापीठावर शिक्षण क्षेत्रातून टीका होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post