जिल्ह्यांतील लॉकडाऊन पूर्णपणे उठण्यात येणार असून रेड झोन वगळता इतर सर्व ठिकाणी जिल्हांतर्गत प्रवासासाठी आता ई-पासची गरज लागणार नाही.



मुंबई - अनेक दिवसांच्या लाॅकडाऊननंतर राज्य सरकारने अनलाॅकची प्रक्रिया सुरू केली आहे. येत्या सोमवारपासून राज्यातील लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने उठवण्यात येणार आहे. त्याकरिता राज्य सरकारने जिल्हानिहाय गट तयार केले आहेत. त्यानुसार, पहिल्या गटात असलेल्या जिल्ह्यांतील लॉकडाऊन पूर्णपणे उठण्यात येणार असून रेड झोन वगळता इतर सर्व ठिकाणी जिल्हांतर्गत प्रवासासाठी आता ई-पासची गरज लागणार नाही.

करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी 'ब्रेक दि चेन' अंतर्गत राज्यात जिल्हांतर्गत प्रवासावर कठोर बंधने घालण्यात आली होती. लॉकडाऊन काळात केवळ अत्यावश्यक कारणासाठीच जिल्हांतर्गत प्रवास करण्याची मुभा देण्यात आली होती.प्रवासासाठी ई पास सक्तीचा करण्यात आला होता. मात्र आता करोनाच्या नवीन रुग्णांमध्ये मोठी घट होत असल्याने सर्व सुरळीत होत आहे. ई-पासचा नियम सरकारने रद्द केला आहे.

राज्यातील अनलॉकबाबत शनिवारी मध्यरात्री राज्य सरकारनं आदेश जारी केले आहेत. राज्यातील निर्बंध टप्प्याटप्प्यानं कसे शिथील होणार याची सविस्तर माहिती सरकारच्या परिपत्रकात देण्यात आली आहे. करोना संसर्गाचा दर आणि ऑक्सिजन बेडची उपलब्धता या निकषावर जिल्ह्यांचे पाच गट करण्यात आले आहेत.

त्यातील पहिल्या चार गटांत समावेश असलेल्या जिल्ह्यांत पूर्वीप्रमाणे प्रवास करता येणार आहे. खासगी कार, टॅक्सी, बस व पॅसेंजर रेल्वेनं प्रवास करताना ई-पासची गरज लागणार नाही. मात्र, राज्य सरकारच्या नव्या निकषानुसार पाचव्या गटात असलेल्या ठिकाणी म्हणजेच जिथे करोना रुग्णसंख्या जास्त आहे अशा भागात ई- पासशिवाय प्रवास करता येणार नाही. हा प्रवासही केवळ अत्यावश्यक कारणासाठीच करता येणार आहे. दिलासादायक बाब म्हणजे सध्या पाचव्या गटात कुठल्याही जिल्ह्याचा समावेश नाही. मात्र जर चौथ्या गटात असलेल्या जिल्ह्यांतील रुग्णसंख्या वाढली तर त्या जिल्ह्यांचा समावेश पाचव्या गटात होईल.


Post a Comment

Previous Post Next Post