ज्येष्ठ दाक्षिणात्य अभिनेत्री पावला श्यामला यांच्यावर पुरस्कार विकण्याची दुर्दैवी वेळ आली



ज्येष्ठ दाक्षिणात्य अभिनेत्री पावला श्यामला यांच्यावर कोरोना काळात बिकट परिस्थिती ओढवली आहे हाताला काम नाही तब्बेतीचे दुखणे आणि लेकीचे आजारपण यामुळे 70 वर्षीय पावला यांच्यावर पुरस्कार विकण्याची दुर्दैवी वेळ आली आहे त्यांची व्यथा व्हायरल झाल्यानंतर अनेक जण आता त्यांच्या मदतीला सरसावले आहेत .

तेलगू अभिनेत्री पावला श्यामला यांनी 250हून अधिक सिनेमांमध्ये काम केले आहे.नेनू लोकल, माथू वाडालारा अशा अनेक सिनेमांसाठी त्यांना पुरस्कार मिळाले आहेत. मात्र आज हेच पुरस्कार त्यांना विकावे लागत आहेत. उत्पन्नाचे दुसरे कोणतेही साधन नसल्याने दोन वेळच्या जेवणासाठी त्यांच्यावर ही वेळ आली आहे. याबद्दल पावला म्हणाल्या, गरिबी मी खूप आधीपासून पाहिली आहे. पण अशी परिस्थिती माझ्यावर पहिल्यांदा आलीय. त्याची मला भीती वाटतेय. माझी लेक अंथरुणाला खिळून आहे. तिच्या पायावर जखम आहे आणि ती टीबीची रुग्ण आहे. तिच्या उपचारासाठी महिन्याला दहा हजार रुपये खर्च येतो. मी याआधीही माझे पुरस्कार विकले आहेत. कोरोना काळात कुणी मदतीला आले नाही. तसेच तेलंगणा सरकारकडून ज्येष्ठ नागरिकांची पेंशनही बंद झाली आहे.

चिरंजीवी यांचा मदतीचा हात

कठीण काळात पावला श्यामला यांना दाक्षिणात्य सुपरस्टार चिरंजीवी यांनी मदतीचा हात दिला आहे. त्यांनी श्यामला यांना एक लाखाची मदत केली आहे. तसेच मुव्ही आर्टिस्ट असोसिएशनमध्ये त्यांचे नाव नोंदवले आहे. त्यामुळे त्यांना सहा हजार रुपये मासिक पेन्शन मिळेल. अभिनेते पवन कल्याण हेदेखील मदतीसाठी पुढे आले आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post