भविष्यात कोणतीही आपत्ती उद्भवल्यास आपत्कालीन यंत्रणा सर्व तयारीनिशी सज्ज असल्याचा विश्वास आयुक्तांनी व्यक्त केला.



सांगली :  दोन वर्षांपूर्वी आलेल्या महापुराचा अनुभव घेता सांगली महापालिकेकडून आपत्तीपूर्व तयारीला वेग देण्यात आला आहे. या तयारीचा महापौर दिग्विजय सूर्यवंशी आणि मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांनी  ऑनफिल्ड आढावा घेतला. कृष्णा नदीपात्रात बोटींचे प्रात्यक्षिकही घेत संभाव्य आपत्ती उद्भवल्यास यंत्रणा सज्ज असल्याची माहिती आयुक्त नितीन कापडणीस यांनी दिली.

2019 साली सांगली आणि मिरजेच्या नदीकाठच्या भागाला महापुराचा मोठा फटका बसला होता. यावेळी अचानकपणे पाणी वाढल्याने अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या. यावर मनपा प्रशासनाने मात करीत या आपत्तीमध्ये मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली कोणतीही जीवितहानी न होता आपत्तीग्रस्तांना मदत केली होती.या महापुराचा अनुभव लक्षात घेता आयुक्त कापडणीस यांनी महापालिकेच्या आपत्कालीन सर्व व्यवस्थेचा आढावा सुरू केला आहे. यामध्ये प्रत्यक्ष आपत्तीकाळात मदतीसाठी पाण्यात जाऊन लोकांचा बचाव करणाऱया अग्निशामक विभागाच्या तयारीचा आढावा आज कृष्णा नदीच्या सरकारी घाटावर घेण्यात आला. यावेळी महापौर दिग्विजय सूर्यवंशी, मनपा आयुक्त नितीन कापडणीस, विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर, उपायुक्त राहुल रोकडे, महिला बालकल्याण समिती सभापती गीतांजली ढोपे पाटील, नगरसेविका ऊर्मिला बेलवलकर, भारती दिगडे, नगरसेवक सुबराव मद्रासी, राहुल ढोपे पाटील आदी उपस्थित होते.


महापौर दिग्विजय सूर्यवंशी आणि मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांनी प्रत्यक्ष नदीपात्रात बोटीतून फेरफटका मारत यांत्रिक बोटींच्या सुस्थितीबाबतची माहिती घेतली. मुख्य अग्निशमन अधिकारी चिंतामणी कांबळे यांनी सर्वांना अग्निशामक विभागाकडील उपलब्ध साधनसामग्री आणि मनुष्यबळ याची माहिती दिली. या प्रात्यक्षिकांबाबत महापौर दिग्विजय सूर्यवंशी, आयुक्त नितीन कापडणीस यांनी समाधान व्यक्त केले. तसेच, भविष्यात कोणतीही आपत्ती उद्भवल्यास आपत्कालीन यंत्रणा सर्व तयारीनिशी सज्ज असल्याचा विश्वास आयुक्तांनी व्यक्त केला.

Post a Comment

Previous Post Next Post