हा गोंधळ कमी करण्याचे काम आता सरकारच्या आरोग्य विभागाला करावे लागेल.



 गेल्या वर्षाच्या प्रारंभी भारतासह जगात कोरोना या महामारीचा शिरकाव झाला तेव्हा या विषाणूची माहिती फारशी कोणाला नसल्याने या विषाणूमुळे होणाऱ्या आजारावर कोणता उपचार करावा, याबाबत होणारा गोंधळ समजण्यासारखा होता. पण आज वर्षानंतरही या आजारावर उपचार करण्याबाबत दररोज दावे-प्रतिदावे करण्यात येत असल्याने सामान्य नागरिकांच्या मनातही गोंधळ वाढत चालला आहे.या आजारावर आता कोणताही उपाय किंवा औषध उपलब्ध नाही, असे सातत्याने सांगितले जात असले तरी बाधित रुग्णांपैकी 90 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त रुग्ण बरे होत असल्याने त्यांच्यावर कोणते उपचार केले किंवा त्यांना कोणती औषधे दिली गेली याबाबतचा तपशील उपलब्ध असल्याने त्याच्या आधारेच नंतरही उपचार केले गेले का, हा एक प्रश्‍न आहे.

या महामारीची तीव्रता जास्त असण्याच्या काळामध्ये रेमडेसिविर या इंजेक्‍शनचा बोलबाला मोठ्या प्रमाणावर होता. हे इंजेक्‍शन जीवरक्षक असल्यासारखी चर्चा सुरू होती. आता गेल्या काही दिवसांपासून जागतिक आरोग्य संघटनेनेही करोनावर हे इंजेक्‍शन उपयुक्‍त नाही अशी घोषणा केल्याने आता या आजारावर कोणता उपचार करायचा, हा एक नवीन प्रश्‍न निर्माण होणार आहे. पण ज्या काळात या इंजेक्‍शनचा बोलबाला होता त्या काळात अनेकांनी या औषधाचा काळाबाजार करून स्वतःचे उखळ पांढरे करून घेतले, हेही तेवढेच खरे आहे. नंतरच्या काळात 'प्लाझ्मा थेरपी' ही करोना रुग्णांना बरे करण्यासाठी उपयुक्‍त ठरू शकते, असा विषय पुढे आला होता. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर प्लाझ्मा दान करण्यासंदर्भात चर्चा आणि आवाहन करण्यात येत होते. आता करोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी प्लाझ्मा थेरपीही उपयुक्‍त नसल्याचे जाहीर करण्यात आल्याने हा आणखी एक नवीन गोंधळ निर्माण होणार आहे. अशाप्रकारे 'ट्रायल अँड एरर मेथड'ने जर या रुग्णांवर उपचार होत असतील, तर आजारातून रुग्णाची कायमस्वरूपी सुटका होण्याची आशा धूसर होऊ शकते हे लक्षात घ्यावे लागेल.

सध्यातरी करोना विषाणूची बाधा झाल्यामुळे गंभीर आजारी असलेल्या रुग्णांवर ऑक्‍सिजनचा पुरवठा करून त्यांना जिवंत ठेवण्याचे काम केले जात असावे. गेल्या सहा महिन्यांच्या कालावधीमध्ये करोना प्रतिबंधक लसीचा शोध लागला असला, तरी भारतासारख्या मोठ्या लोकसंख्येच्या देशामध्ये सर्वांचे लसीकरण जलद गतीने पूर्ण होऊ शकत नाही. मुख्य म्हणजे एखाद्याचे लसीकरण पूर्ण झाले, तरी त्याला करोनाची बाधा होणार नाही, असा कोणताही दावा केला जात नाही. त्यामुळे लसीकरण झाल्यावरही अनेकांना करोनाची बाधा झाली आहे. फक्‍त त्यांना या आजारातून बरे होण्याची शक्‍यता जास्त असते आणि जीव जाण्याचा धोकाही खूप कमी असतो.

करोनाची लक्षणे सर्वसाधारणपणे न्यूमोनियाची लक्षणे किंवा तीव्र सर्दी, ताप, खोकल्याची लक्षणे असल्याने सध्यातरी रुग्णालयांमध्ये याच प्रकारच्या औषधांचा वापर केला जात आहे. पण औषधांच्या उपयुक्‍ततेबाबत दरवेळी उलटेसुलटे दावे केले जात असल्यामुळे केवळ सामान्य नागरिकांचा नव्हे, तर वैद्यकीय तज्ज्ञांचाही गोंधळ होत आहे. आता भारतातील 'डीआरडीओ' या संशोधन संस्थेने 2 डीजी हे औषध शोधले असून ते औषध शंभर टक्‍के खात्रीचे असल्याचा दावाही केला आहे. सरकारनेही हा दावा मान्य करून हे औषध उपचारासाठी वापरण्याची परवानगी दिली आहे. या शोधांचा रुग्णांवर कोणता परिणाम होतो हे नजीकच्या काळात कळणारच आहे; पण हे औषध जर प्रभावी ठरले तर डीआरडीओ निश्‍चितच अभिनंदनासाठी पात्र ठरणार आहे.

सर्व प्रकारचे प्रयोग करूनच डीआरडीओने या औषधाची घोषणा केली असल्याने याबाबत खात्री बाळगायला काहीच हरकत नाही. यानिमित्ताने का होईना करोना रुग्णांवर उपचार करण्याबाबतचा गोंधळ जर संपला तर ती एक आशादायक बाब म्हणावी लागेल. महामारीच्या या काळामध्ये उपचार पद्धतीतील गोंधळ वाढवण्यास समाजमाध्यमेही कारणीभूत ठरत आहेत. समाज माध्यमांच्या विविध प्लॅटफॉर्मवर अनेकजण विविध उपचार पद्धतींची घोषणा करत असतात त्यामुळे हा गोंधळ वाढत आहे. करोनाला दूर ठेवण्यासाठी हे करा आणि हे करू नका, अशा प्रकारच्या सूचनांचा पाऊस अक्षरश: समाज माध्यमांवर पडत आहे.

व्हॉट्‌सऍपसारख्या प्लॅटफॉर्मवरचे मेसेज मोठ्या प्रमाणात फॉरवर्ड केले जात असल्यामुळे अशास्त्रीय आणि कोणतेही आधार नसलेले मेसेज जनसामान्यांच्या हातात पडत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या गोंधळात अधिकच भर पडत आहे. नक्‍की काय करावे आणि काय करू नये, याबाबत कोणताही निर्णय घेणे सध्याच्या परिस्थितीमध्ये अवघड होत आहे. एखाद्या वैद्यकीय तज्ज्ञाचा सल्ला घेण्याचे म्हटले, तरी त्याच्याही मनात काही प्रमाणात गोंधळच आहे. हा गोंधळ कमी करण्याचे काम आता सरकारच्या आरोग्य विभागाला करावे लागेल.

Post a Comment

Previous Post Next Post