पुणे -करोना प्रतिबंधक लसींसाठी माननीयांच्या कार्यालयाकडून दिले जाणारे टोकन आणि त्यामुळे लसीकरण केंद्रावर होणारा गोंधळ आटोक्यात आणण्यासाठी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी कठोर पावले उचलत, केंद्रांसाठी नियमावली जारी केली आहे.
नेत्यांच्या कार्यकर्त्यांना 'कट' केले असून, आरोग्य कर्मचारी, ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने लसीकरणासाठी आलेल्यांनाच केवळ केंद्रात प्रवेश दिला जाणार आहे. या शिवाय गर्दीचे नियोजन करण्याची जबाबदारी स्थानिक पोलिसांकडे सोपवली आहे. लसीकरण मोहीम सुरू झाल्यानंतर केंद्रांवर गोंधळाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.लसींची अपुरी उपलब्धता आणि मागणी अधिक असल्याने तेथे गर्दी होते.शिवाय, केंद्रावर 'कब्जा' केलेल्या नेत्यांसोबतच राजकीय हस्तक्षेप वाढून मर्जीतल्या नागरिकांना लस देण्यात येत आहेत. या तक्रारींचे प्रमाण वाढल्याने लसीकरण मोहीम राजकारणात अडकण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. त्यामुळेच लसीकरण सुरळीत व्हावे आणि करोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात यावा, यासाठी आयुक्तांनीच आता कडक अंमलबजावणीचे आदेश दिले आहेत.
लसीकरण केंद्रांसाठी नियमावली
लसीकरणासाठी को-विन पोर्टलवर ऑनलाइन नोंदणी केलेले आणि जे नागरिक स्वत:चे लसीकरण करण्यासाठी आले आहेत, त्यांनाच केंद्रांवर प्रवेश. त्यांच्यासाठी दोन स्वतंत्र रांगा बंधनकारक.
को-विन पोर्टलवर नोंदणी केल्याशिवाय लस देऊ नये.
ठरवून दिलेल्या ठिकाणीच लसीकरण घेण्यात यावे.
लस वाया जाणार नाही, याची दक्षता आरोग्य सेवकांनी घ्यावी.
केंद्र वाढवण्याचे अथवा कमी करण्याचे अधिकार आयुक्तांकडे.
प्रत्येक केंद्रावर सकाळी 10 वाजता लसीकरण सुरू करावे.
लस उपलब्धतेनुसार जेवढ्यांचे लसीकरण होणार आहे, त्यांनाच थांबवावे.
कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही आणि गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी लसीकरण केंद्रांवर पोलीस उपलब्ध करून घेण्यात यावेत.