देशातील कोरोनाचा कहर आटोक्यात येऊ लागला.



देशातील कोरोनाचा कहर आटोक्यात आणण्यात महाराष्ट्रासह काही राज्यांनी चांगले यश मिळवले आहे. महाराष्ट्र, दिल्ली, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, बिहार व उत्तर प्रदेशमध्ये रुग्णसंख्या कमी होऊ लागली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 3 मेच्या 81.7 टक्क्यांवरून 85.6 टक्क्यांपर्यंत सुधारले आहे. मंगळवारी एका दिवसात सर्वाधिक 4 लाख 22 हजार 436 रुग्ण कोरोनामुक्त झाले.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी ही दिलासादायक आकडेवारी जाहीर केली. ऑक्सिजन तसेच लसींचा तुटवडा असतानाही राज्यांनी कडक निर्बंधांच्या मदतीने कोरोना संसर्ग नियंत्रणात आणल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, सध्या देशाचा पॉझिटीव्हीटी रेट 14.10 टक्के इतका आहे. आठ राज्यांमध्ये एक लाखाहून अधिक, 10 राज्यांत 50 हजार ते एक लाखापर्यंत आणि 18 राज्यांमध्ये 50 हजारांपेक्षा कमी ऑक्टिव्ह रुग्ण आहेत.कोरोनातून बरे होण्याचे प्रमाण चांगलेच सुधारले आहे. गेल्या 24 तासांत तब्बल 4 लाख 22 हजार 436 रुग्णांनी कोरोनावर मात करून घर गाठले. एका दिवसात कोरोनामुक्त झालेल्यांची ही आतापर्यंतची सर्वाधिक संख्या आहे. याचवेळी गेल्या दोन दिवसांपासून नव्या रुग्णांची संख्या तीन लाखांच्या खाली नोंद होत आहे. मंगळवारी 2 लाख 63 हजार नवे रुग्ण आढळले.

  • देशात आतापर्यंत एकूण लोकसंख्येच्या 1.8 टक्के लोकांना कोरोना झाला आहे.
  • गेल्या तीन आठवडय़ांपासून 199 जिह्यांत रुग्णसंख्येत सतत घट होत आहे.
  • रोज केवळ आठ राज्यांत 10 हजारांहून अधिक नव्या रुग्णांची नोंद होत आहे, तर 26 राज्यांमध्ये नव्या रुग्णांच्या तुलनेत अधिक लोक कोरोनामुक्त होत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post