रेमडिसिविर' या इंजेक्‍शनचा तुटवडा , औषध मिळवण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांना वणवण करावी लागत आहे, दुकानदारांकडून साठेबाजी होत असल्याचा आरोप.पुणे - अत्यवस्थ करोना बाधितांवर उपचारांसाठी प्रभावी ठरणाऱ्या 'रेमडिसिविर' या इंजेक्‍शनचा तुटवडा निर्माण झाला आहे. औषध मिळवण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांना वणवण करावी लागत आहे. रेमडिसिविरचा काळाबाजार होत असून, दुकानदारांकडून साठेबाजी होत असल्याचा आरोपही केला जात आहे. दरम्यान, 'या सगळ्या विषयांमध्ये संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालावे,' असे आदेश अन्न आणि औषध प्रशासनाचे (एफडीए) राज्याचे आयुक्त अभिमन्यू काळे यांनी काढले आहेतया आधी रेमडिसिविरचा 'कट टू कट' साठा अन्न आणि औषध प्रशासनाकडे होता आणि त्यांनी त्याचे वितरण केले होते. मात्र, आता या औषधाची मागणी अधिकच वाढली असून, त्याचा आता तुटवडा निर्माण झाला आहे. काही ठिकाणी त्याचा काळाबाजारही सुरू असून, त्यासाठी तिप्पट रक्कम आकारली जात आहे. नांदेड येथे रेमडिसिविरचा काळाबाजार करणाऱ्या दोघांना अटकही करण्यात आली आहे.

'एफडीए'चे राज्याचे आयुक्त अभिमन्यू काळे यांनी या संदर्भात तातडीची बैठक घेऊन, यावर नियंत्रण ठेवण्याचे आदेश सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. तसेच रेमडिसिविरच्या वापरावरही बंधन आणले असून, वैद्यकीय नियमानुसारच त्याचा वापर करण्याच्या सूचना सर्व खासगी आणि सरकारी रुग्णालयांना देण्याबद्दलही सांगण्यात आले आहे.

जिल्हाधिकाऱ्यांचे रुग्णालयांना आदेश, पण अंमलबजावणी होणार का?
रुग्णसंख्या आणि गरजेनुसार 'रेमडिसिविर'चा मर्यादित साठा खरेदी करावा
रेमडिसिविरच्या वापराबाबत स्वतंत्र रजिस्टर करावे. त्यामध्ये रुग्णाचे नाव, समूह क्रमांक, वापरलेली संख्या आणि आकारलेली किंमत नमूद करावी.

संबंधित रुग्णाला रेमडिसिविर वापरण्याची वेळ आली नाही, तर औषध हॉस्पिटल फार्मसी किंवा रुणांच्या नातेवाईकांना परत करून त्याचेही रेकॉर्ड ठेवावे. इंजेक्‍शन विक्रीचे गैरप्रकार आढळल्यास त्याला हॉस्पिटल व्यवस्थापनाला जबाबदार धरण्यात येईल.

ऑक्‍सिजनवरील रुग्णांनाच 'रेमडिसिविर'
'रेमडिसिविर'बाबत जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी आदेश काढले आहेत. या औषधाची उत्पादन क्षमता आणि मागणी यामध्ये तफावत असल्याने त्याचा बाजारात तुटवडा निर्माण झाला आहे. गरजू रुग्णांना वेळेत औषधे मिळत नाहीत, अशी परिस्थिती आहे. बाधितांवर कसे उपचार करावेत याबाबत केंद्र सरकाराचे नियम आहेत. त्यानुसार रेमडिसिविर हे इंजेक्‍शन 'मॉडरेट कंडिशन' (ऑन ऑक्‍सिजन) असलेल्या रुग्णांनाच देण्याच्या सूचना आहेत. त्यामुळे या सूचनेनुसारच उपचार करण्यात यावेत, असे या आदेशात नमूद केले आहे.

अन्न आणि औषध प्रशासनाने सुरू केलेल्या हेल्पलाइन
विवेक खेडेकर औषध निरीक्षक
9923125554
अतिष सरकाळे औषध निरीक्षक
9890165018
विजय नंगरे औषध निरीक्षक
7387561343

Post a comment

0 Comments