आणखी किती लोकांचा जीव या राजकारण्यांना हवा आहे, असे विचारण्याची वेळ आता आली आहे.



केंद्रातील सत्ताधिकारी किंवा राज्यातील विरोधक राज्याला दूषणे देत आहेत. संवेदनशीलता हरवलेल्या या राजकारणात गुदमरलेल्या सर्वसामान्यांच्या हालाला पारावार उरला नाही. आणखी किती लोकांचा जीव या राजकारण्यांना हवा आहे, असे विचारण्याची वेळ आता आली आहे.

महाराष्ट्रात मृत्यूही स्वस्त झाला आहे. ऑक्‍सिजनअभावी श्‍वास गुदमरत आहेत. रेमडेसिविर इंजेक्‍शनचा तुटवडा आणि काळाबाजार अशा कितीतरी समस्यांनी रोजचे जगणे मुश्‍किल झाले आहे. 'रोगापेक्षा इलाज भारी' अशी स्थिती निर्माण झाली आहे. करोनाच्या दुसऱ्या लाटेत महाराष्ट्राचा श्‍वास अधिकच गुदमरत चालला आहे. त्यातच नाशिक, विरार येथील हॉस्पिटलमधील दुर्घटनांनी माणसाभोवतीचा फास कसाही आवळला जातोय, असेच वाटू लागले आहे.ऑक्‍सिजनअभावी रुग्णांची तडफड होत आहे. राज्यावर मृत्यू घोंगावत असताना राज्यातील राजकारणी घाणेरड्या राजकारणाचे प्रदर्शन करीत आहेत. करोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी यांच्यात एकमत होत नाही. उलट एकमेकांच्या चुका काढण्यात धन्यता मानली जात आहे. या भयानक स्थितीत राज्यात कडक निर्बंधाच्या नावाखाली काहीसे संभ्रमाचे लॉकडाऊन सुरू आहे.

पंतप्रधानांनी केलेले लॉकडाऊन योग्य होते, असे छातीठोक सांगणारे आता मुख्यमंत्र्यांच्या लॉकडाऊनच्या भूमिकेला विरोध करीत आहेत. पहिल्या लाटेनंतरची दुसरी लाट इतकी जीवघेणी असावी, याची कल्पना सर्वसामान्य लोकांना नव्हती. पण ती राज्यातील आणि केंद्रातील सत्ताधाऱ्यांना असायला हवी होती. गेल्या नोव्हेंबरपासून करोना प्रमाण कमी होत चालले होते. दुसऱ्या लाटेची चाहूल घेऊन आरोग्य सुविधा सक्षम करण्याची संधी होती. पण सरकार टिकवण्यासाठी सत्ताधारी आणि सरकार पाडण्यासाठी विरोधक अशी झुंज आपण पाहात होतो. बंद पडलेली कोविड सेंटर्स सज्ज करणे, शासकीय रुग्णालयातील सुविधा सक्षम करणे, ऑक्‍सिजन, औषधे, इंजेक्‍शनचा पुरेसा साठा असण्याची व्यवस्था करण्याकडे दुर्लक्ष झाले. म्हणून सद्यःस्थितीत करोनाच्या आव्हानाशी लढताना आपण चाचपडत आहोत. ऑक्‍सिजन बेड मिळवणे मुश्‍किल झाले आहे. व्हेंटिलेटर बेड पुरेसे नाहीत, अशा चक्रव्यूहात सामान्य माणूस अडकला आहे.

केंद्र सरकारने व राज्य सरकारने आता तरी योग्य समन्वयाने उपाययोजनांची अंमलबजावणी केली पाहिजे. आवश्‍यक औषधे, इंजेक्‍शन्स, ऑक्‍सिजन यासह सर्व सुविधा सामान्यांना सहज उपलब्ध होतील, अशी संवेदनशीलता दाखवली पाहिजे. आता तरी शहाणे होऊन राजकारणाला पूर्णविराम देऊन लोकांचे प्राण वाचवायला हवेत. अन्यथा भयावह दृष्ये पाहूनच अनेकांचे श्‍वास गुदमरून जातील. अजूनही वेळ गेली नाही. राजकारण बाजूला ठेवून एकदिलाने आव्हान पेलले तरच महाराष्ट्र वाचेल.

Post a Comment

Previous Post Next Post