कोल्हापूर जिल्ह्यातील बंद करण्यात आलेली 200 हून अधिक लसीकरण केंद्रे पुन्हा सुरू



 कोविशिल्डचे एक लाख डोस उपलब्ध झाल्याने, कोल्हापूर जिल्ह्यातील बंद करण्यात आलेली 200 हून अधिक लसीकरण केंद्रे  पुन्हा सुरू झाली. लसीकरणासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. दरम्यान, उपलब्ध झालेल्या या लसींचा साठा बुधवारपर्यंत पुरणार आहे. त्याच दिवशी आणखी 1 लाख 80 हजार डोस मिळणार असल्याची माहिती जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. फारुख देसाई यांनी दिली.

लस उपलब्ध न झाल्याने दोन दिवसांपासून राज्यातील लसीकरण केंद्रे बंद पडली होती. कोल्हापूर जिल्ह्यात शासकीय आणि खासगी रुग्णालये मिळून 250 केंद्रे आहेत. यातील 100 केंद्रांवर गुरुवारी, तर शुक्रवारी आणखी 110 केंद्रांवर लस नसल्याने लसीकरण झाले नाही.त्यामुळे उर्वरित 40 लसीकरण केंद्रे कशीबशी सुरू राहिली होती. मात्र, शनिवारी कोविशिल्डचे 1 लाख डोस उपलब्ध झाल्याने कालपासून पुन्हा लस देण्यास सुरुवात झाली. रविवारी सुटीच्या दिवशी शहरासह जिल्ह्यातील लसीकरण केंद्रांवर लसीसाठी गर्दी झाली होती. जिल्ह्यात आतापर्यंत 10 लाख जणांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली आहे. सध्या 16 लाख लसीकरणाचे उद्दिष्ट आहे. यामध्ये 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक, 45 ते 59 वयोगटातील व्याधीग्रस्त व अन्य लाभार्थींचा समावेश आहे.

Post a Comment

Previous Post Next Post