टीआरपी घोटाळ्याप्रकरण : अर्णब गोस्वामिंच्या अटकेसाठी न्यायालयाने दिले हे आदेश.मुंबई : 
टीआरपी घोटाळ्याप्रकरणी आज उच्च न्यायालयात महत्वपूर्ण सुनावणी पार पडली. यावेळी राज्य सरकारने १२ आठवड्यांत तपास पूर्ण करु अशी ग्वाही न्यायालयात दिली आहे. मात्र यावेळी उच्च न्यायालयाने रिपब्लिक वाहिनीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांच्या अटकेसंबंधी मुंबई पोलिसांना महत्वाचे आदेश दिले. न्यायालयाने अर्णब गोस्वामी आणि वाहिनीची मालकी असलेल्या एआरजी आउटलियर मीडिया या कंपनीची याचिका दाखल करुन घेतली. सुनावणीदरम्यान आतापर्यंत कारवाईपासून दिलेला दिलासा न्यायालयाकडून रद्द करण्यात आला.

टीआरपी घोटाळाप्रकरणी मुंबई पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्राला आव्हान देण्यासह पोलिसांच्या कारवाईपासून संरक्षण द्यावे, प्रकरणाचा तपास सीबीआयकडे वर्ग करावा या मागणीसाठी गोस्वामी आणि एआरजी आउटलियर मीडिया कंपनीने याचिका केली होती.या याचिकांवर न्यायमूर्ती एस. एस. शिंदे आणि न्यायमूर्ती मनीष पितळे यांच्या खंडपीठासमोर सध्या नियमित सुनावणी सुरू आहे.

गोस्वामी आणि कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या डोक्यावर संशयित आरोपीची टांगती तलवार किती दिवस ठेवणार? तपास असाच सुरू ठेवता येऊ शकत नाही अशा मुद्द्यांवर न्यायालयाने याचिका दाखल करून घेतली. अर्णब गोस्वामी आणि एआरजी आऊटलीयर कंपनीसंबंधी अटकेची कारवाई करायची असल्यास तीन दिवस आधी नोटीस द्यावी असा आदेश न्यायालयाने बुधवारी सुनावणी दरम्यान दिला. प्रकरणाचा तपास कधीपर्यंत पूर्ण करणार हे बुधवारच्या सुनावणीत स्पष्ट करण्याचे न्यायालयाने पोलिसांना बजावले होते. राज्य सरकारकडून १२ आठवड्यात तपास पूर्ण केल जाईल अशी माहिती देण्यात आल्यानंतर न्यायालयाने हा आदेश दिला.

टीआरपी घोटाळ्याप्रकरणी जामिनावर सुटलेले 'बार्क'चे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी पार्थो दासगुप्ता आणि रिपब्लिक वाहिनीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी हे चांगले मित्र असून त्यांच्यात व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून झालेला संवादही मैत्रीपूर्ण होता. त्याचा टीआरपी घोटाळ्याशी काहीही संबंध नाही, असा दावा गोस्वामी यांच्यावतीने सोमवारी उच्च न्यायालयात करण्यात आला. मुंबई पोलिसांनी याप्रकरणी दाखल केलेल्या आरोपपत्रात महत्त्वपूर्ण पुरावा काय आहे? अशी विचारणा न्यायालयाने सोमवारी झालेल्या सुनावणीवेळी केली होती.

Post a comment

0 Comments