शिरोळच्या श्री दत्त पॉलिटेक्निकमध्ये नवीन वर्षासाठी प्रवेश नोंदणी सुरू चेअरमन गणपतराव पाटील यांची माहिती



ओंकार पाखरे (शिरोळ तालुका प्रतिनिधी):

शिरोळ येथील श्री दत्त पॉलिटेक्निक कॉलेजमधील  विद्यार्थ्यांनी निकालाची उत्कृष्ट परंपरा जपली असून या विद्यार्थ्यांना कॅम्पस इंटरव्यूच्या माध्यमातून कॉलेजने राज्य, देश व विदेशात नोकरीची संधी उपलब्ध करून दिली आहे. आतापर्यंत ८००  हून अधिक विद्यार्थी अनेक नामवंत कंपन्यांमध्ये मोठे पॅकेज घेऊन कार्यरत आहेत. यावर्षीही  १२५ विद्यार्थ्यांची राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये झालेली निवड कॉलेजसाठी उल्लेखनीय आहे. आता जून महिन्यापासून सुरू होणाऱ्या नवीन शैक्षणिक वर्षाची प्रवेश  नोंदणी प्रथम वर्ष व थेट द्वितीय वर्ष विद्यार्थ्यांसाठी सुरू झाली असून विद्यार्थ्यांनी कॉलेजशी संपर्क साधावा, असे आवाहन संस्थेचे चेअरमन, उद्यानपंडित गणपतराव पाटील यांनी केले. 

 श्री दत्त पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

गणपतराव पाटील पुढे म्हणाले, यावर्षी गुणवत्तेमध्ये व कॅम्पस सिलेक्शनमध्ये कॉलेजने मोठे यश संपादन केले आहे. कोरोना महामारीच्या या कालावधीमध्येही विद्यार्थ्यांना विविध कंपन्यांमध्ये नोकरी उपलब्ध करून देण्यात आली आहे. नवनवीन तंत्रज्ञानावर आधारित गुणवत्तापूर्ण शिक्षण देत असतानाच सर्व विद्यार्थ्यांना प्रथम वर्षापासूनच विविध कंपन्यांच्या गरजेनुसार लागणारे सॉफ्ट स्किल, अप्टीट्युड टेस्ट, पर्सनल इंटरव्यू, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आदी विषयांचे प्रशिक्षण तसेच अनेक उद्योजकांचे मार्गदर्शन आयोजित केले जाते. अनेक विद्यार्थ्यांची मोठ्या पॅकेजवर विविध कंपन्यांमध्ये निवड झाली आहे. श्री दत्त पॉलिटेक्निक कॉलेजकडील टाटा मोटर्स, भारत फोर्ज, कमिंस इंडिया लि. पुणे अशा अनेक नामांकित कंपन्यांमध्ये मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, कॉम्प्युटर व इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन या ५ विभागातील अनेक विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.

संस्थेचे प्राचार्य आर. एस. चौगुले म्हणाले, महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशनकडून सर्व विभागांना एक्सलंट मानांकन मिळाले आहे. श्री दत्त पॉलिटेक्निक म्हणजे शंभर टक्के नोकरीची हमी असे समीकरण तयार झाले आहे. शासकीय नोकरी व स्पर्धा परीक्षाकरिता विशेष मार्गदर्शन केंद्र, विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी सर्व सोयींनी युक्त  वसतिगृह, विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी विशेष काळजी, उच्चशिक्षित, अनुभवी प्राध्यापक वर्ग, सुसज्ज ग्रंथालय, दवाखाना, बँक व पोस्ट ऑफिसची सुविधा, सर्व मार्गावरती कॉलेज बस फेऱ्यांचीही सुविधा, लिझलाईन ब्रॉडबँड, इंटरनेट सुविधा, झोनल, इंटर झोनल क्रीडा प्रकारांमध्ये उज्ज्वल यश, स्पर्धा परीक्षा अभ्यासिका केंद्र आणि सर्वांना परवडेल अशा अत्यल्प शुल्कामध्ये प्रवेश अशी अनेक वैशिष्ट्ये या पॉलीटेक्निकची आहेत. सर्व मागासवर्गीय, अल्पसंख्याक, आर्थिक मागास प्रवर्ग (एबीसी), इतर मागासवर्गीय (ओबीसी) विद्यार्थ्यांना शासकीय नियमानुसार  फीमध्ये सवलतही दिली जाते. तेव्हा विद्यार्थी व  विद्यार्थिनींनी या कॉलेजमध्ये प्रवेश घेऊन आपले जीवन निश्चिंत करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

यावेळी एक्स ऑफिसिओ ट्रस्टी एम. व्ही. पाटील, सेक्रेटरी अशोक शिंदे, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर सचिन शिंदे तसेच पाच विभागांचे विभाग प्रमुख, शिक्षक उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post