आंबेगाव खुर्द प्रभाग क्र. ४२ अ मधील वाघजाईनगर, सह्याद्री सोसायटी मधील रहिवाशांचे पाण्यावाचून अतिशय हाल




पुणे :  दत्तनगर - आंबेगाव खुर्द प्रभाग क्र. ४२ अ मधील वाघजाईनगर, सह्याद्री सोसायटी मधील रहिवाशांचे पाण्यावाचून अतिशय हाल होत असून, आमचा पाणी प्रश्न महापालिका प्रशासनाने लवकरात लवकर मार्गी लावावा अशी मागणी परिसरातील नागरिक करत आहेत.

प्रभाग क्र. ४२ अ मधील, वाघजाईनगर व सह्याद्री सोसायटीमध्ये पुणे महानगरपालिका पाणी पुरवठा विभागाकडून ४ इंच व ६ इंच जलवाहिन्या टाकण्यात आलेल्या आहेत. शिवाय या वाहिन्यासोबतच ८ इंच जलवाहिनीही पाणीपुरवठा विभागाकडून टाकण्यात आलेली आहे. अनुक्रमे ४ व ६ इंच असलेल्या जलवाहिन्यातून या परिसरात पाणीपुरवठा केला जातो आहे. त्यातील ६ इंच वाहिनीतुन, सत्ताधारी लोकप्रतिनिधींशी लागेबंध असलेल्या नागरिकांनी अनधिकृतपणे अतिरिक्त नळजोड (कनेक्शन) केली आहे.शिवाय या अतिरिक्त नळजोडीला इलेक्ट्रिक मोटारी जोडून पाणी उपसले जाते आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मिळेल तितकेच कमी दाबाने येणारे पाणी भरावे लागते.

मुळातच या परिसरात पाणी पुरवठा हा दिवसाआड असून,त्याची निश्चित अशी वेळ नसल्याची तक्रारही नागरिक करत आहेत.आमच्या पाणी प्रश्नावर लवकर तोडगा काढावा अशी मागणी नागरिक करत आहेत.दोन तीन महिन्यापासून कमी दाबाने पाणी येत आहे. दिवसाआड येणाऱ्या पाण्यामुळे मनस्ताप होत असून उन्हाळ्याच्या तोंडावर पाणी प्रश्न उभा राहिला आहे. याचा त्रास होतो आहे.'

- रेखा शिंदे,रहीवाशी, वाघजाईनगर

४ व ६ इंच असलेल्या जलवाहिन्या या ८ इंच जलवाहिनीला जोडल्या तर परिसरातील नागरिकांना प्रेशरने पाणी मिळू शकेल. प्रशासन आणि स्थानिक प्रतिनिधींचे या परिसराविषयी असणारे औदासीन्य गंभीर बाब आहे.'

- प्रसाद जगताप, सामाजिक कार्यकर्ते

'या बाबतीत आमच्या कनिष्ठ अभियंत्याना त्या भागातील अडचणी पाहण्याच्या सूचना देऊन, प्रश्न सोडवीला जाईल.
- राजेश गुर्रम, उपअभियंता, स्वारगेट पाणीपुरवठा विभाग.

Post a Comment

Previous Post Next Post