महापौर मुरलीधर मोहोळ यांची जंबो रुग्णालयास भेट ,मंगळवारपासून रुग्ण दाखल करून घेण्याला सुरूवात केली जाणारपुणे : कोविड रुग्णालयात मंगळवारपासून रुग्ण दाखल करून घेण्याला सुरूवात केली जाणार असून, सुरूवातीला अडीचशे बेडची व्यवस्था केली जाणार असून, शुक्रवारपर्यंत 500 बेडची व्यवस्था पूर्ण होईल, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली .

यावेळी महापालिका आयुक्त विक्रम कुमार आणि अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, प्रभारी आरोग्य प्रमुख डॉ. अंजली साबणे, जंबोचे व्यवस्थापक आदी यावेळी उपस्थित होते. या सगळ्यांनी सोमवारी जंबो ची एकत्रित पाहणी केली. त्यानंतर ते  पत्रकार परिषदेत बोलत होते.

जंबो रुग्णालय पुन्हा सुरू करण्याची वेळ अशी वेळ येईल म्हणूनच हे रुग्णालय बंद न करण्याचा निर्णय त्यावेळी घेण्यात आला होता. प्राथमिक स्तरावर 8 ते 10 दिवसाम्त 500 बेडची व्यवस्था याठिकाणी करण्यात येणार आहे. त्यामध्ये 250 ऑक्‍सिजन बेड, 200 आयसोलेशन बेड आणि 50 आयसीयु बेडची व्यवस्था येथे करण्यात येणार आहे. सोमवारी तातडीने 55 बेड सुरू करण्यात येणार आहे. त्यामध्ये 25 ऑक्‍सिजन, 25 सीसीसी आणि पाच आयसीयु बेडचा समावेश असल्याचे मोहोळ म्हणाले. बुधवारी आणखी 100 ऑक्‍सिजन बेड, 75 आयसोलेशन बेड आणि 20 आयसीयु बेड सुरू करण्यात येणार आहेत. शुक्रवारी 125 ऑक्‍सिजन बेड, 100 आयसोलेशन बेड आणि 25 आयसीयु बेड सुरू करत आहोत. एका आठवड्यात या हॉस्पिटलमध्ये 500 बेड तयार होतील, असे मोहोळ यांनी नमूद केले.

खासगी रुग्णालयांच्या प्रतिनिधींबरोबरही महापालिका आयुक्तांनी बैठक घेतली आहे. संसर्ग वाढत चालला आहे. कोविड विषयक यंत्रणा कमी पडणार नाही; परंतु ती वापरण्याची वेळ येऊ नये यासाठी नागरिकांनी सुरक्षेविषयी अधिक काळजी घेतली पाहिजे. जंबो मध्ये जे आयसीयु बेड आहेत त्यामध्ये जंबो मध्ये आयसोलेशन मध्ये किंवा ऑक्‍सिजन वर असलेला रुग्ण गंभीर झाल्यास त्याला शिफ्ट केले जाणार आहे. बेडची कमतरता आता आपल्याकडे नाही, असे मोहोळ म्हणाले.

कडक निर्बंधाची अंमलबजावणी महापालिका आणि पोलीस प्रशासनाने केली पाहिजे. भविष्यात करोना बाधितांची संख्या वाढली तर आणखी काही निर्बंध लावण्याचा विचार करावा लागेल. पक्ष, संघटना असे कोणतेही राजकारण न करता जे नियम पाळनार नाहीत त्यांच्यावर कारवाईचा निर्णय प्रशासन त्यांच्या स्तरावर घेईल, असेही मोहोळ यांनी स्पष्ट केले.

मागील वर्षी रुग्णालयात दाखल असलेल्यांची संख्या 18 ते 20 टक्के होती; आता ती 10 टक्केच आहे. बऱ्याचशा रुग्णांना सौम्य लक्षणे आहेत, तसेच अनेकजण सुरूवातीलाच डॉक्‍टरांकडे जात असल्याने रुग्ण गंभीर होण्याचे प्रमाण कमी आहे. सध्या 2300 बेड उपलब्ध आहेत त्यातील 1600 खासगीमध्ये तर 700 बेड सरकारी रुग्णालयात आहेत. मागीलवर्षी खासगी रुग्णालयातील सुमारे 3500 बेड नियंत्रणाखाली आणले होते. त्यामुळे आता आणखी 1900 बेड आपण त्यांच्याकडून घेऊ शकतो, असं महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी सांगितले.

जंबोमध्ये दाखल होण्यासाठी हेल्पलाइन - अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल

महापालिकेच्या सेंट्रल वॉररूममधूनच जंबोमध्ये रुग्णाला दाखल करता येणार आहे. त्यासाठी 25502110 हा संपर्क क्रमांक आहे. त्यावरूनच होणार आहे. 'वॉक इन' रुग्णांना घेणार नाही. अगदी अत्यवस्थ असेल तर त्यांना कॅज्युल्टीमध्ये घेऊन, सर्व प्रक्रिया करूनच दाखल करून घेतले जाईल. खासगी रुग्णालयांना त्यांचे नियंत्रणाखाली आणलेले बेड 'नॉन कोविड' रुग्णांसाठी वापरायला देताना, पुन्हा हे बेड हवे असतील तर 72 तासांत उपलब्ध करून देण्यासंदर्भात अट टाकण्यात आली होते. त्याची अंमलबजावणी आता करण्यात येणार आहे.

Post a comment

0 Comments