बंगलो, फार्म हाऊससाठी प्लॉट घेण्याच्या बहाण्याने नऊ जणांकडून कोट्यवधी रुपये घेऊन त्यांची फसवणूक केल्याचा धक्‍कादायक प्रकार उघडकीसहिंजवडी -
 बंगलो, फार्म हाऊससाठी प्लॉट घेण्याच्या बहाण्याने नऊ जणांकडून कोट्यवधी रुपये घेऊन त्यांची फसवणूक केल्याचा धक्‍कादायक प्रकार उघडकीस आला आहे. घेतलेल्या पैशांच्या मोबदल्यात त्यांना फार्म हाऊस प्लॉट न देता तसेच त्यांचे पैसे परत न करता प्लॉटधारकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी लॅण्डमाफिया असलेल्या डेव्हलपर्स विरोधात हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

साईरंग डेव्हलपर्स प्रा लिमिटेडचे संचालक के. आर. मलिक, शाहरुख मलिक, कार्यकारी संचालक नंदिनी रणजित कोंढाळकर, पीटर आणि इतर अशी गुन्हा दाखल झालेल्या लॅण्डमाफियाची नावे आहेत.मलिक यांच्यावर यापूर्वी ही हिंजवडी, चतुःशृंगी पोलीस ठाण्यात जमीन फसवणुकीचे अनेक गुन्हे दाखल आहेत.

याबाबत सुयोग संतोष नाटेकर यांचे कुलमुखत्यार संतोष वासुदेव नाटेकर (वय 63, रा. कर्वेनगर, पुणे) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

10 फेब्रुवारी 2012 पासून 1 मार्च 2021 या कालावधीत साईरंग डेव्हलपर्स आणि प्रमोटर प्रा लिमिटेड हिंजवडी फेज दोन येथे घडला. आयटी पार्क परिसरात बोडकेवाडी व मारुंजी परिसरात आलिशान कार्यालये मांडून विनापरवाना प्लॉटिंगचा धंदा मोठ्या जोमात सुरू होता. याच डेव्हलपर विराधात मारुंजी-नेरे येथे फसवणूक झालेल्या अनेकांनी यापूर्वीच गुन्हे दाखल केले आहेत, तेव्हापासून मलिक फरार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येते.

या घटनेबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार, फार्म हाऊस प्लॉट खरेदी करण्यासाठी आरोपींनी फिर्यादी यांच्यासोबत मेमोरंडम ऑफ अंडरस्टॅण्डिंग (एमओयू) केला. प्लॉटच्या खरेदीसाठी आरोपींनी फिर्यादी यांच्याकडून 13 लाख 5 हजार रुपये घेतले. तसेच आरोपींनी अन्य आठ गुंतवणूकदारांकडून एक कोटी 85 लाख 18 हजार 800 रुपये घेतले. घेतलेल्या रकमेवर सर्वांना आठ ते 18 टक्‍के व्याज देण्याचे आमिष ही दाखवले. त्यानंतर फिर्यादी आणि अन्य गुंतवणूकदारांना ठरल्याप्रमाणे फार्म हाऊस प्लॉट न देता रकमेच्या परताव्याची रक्‍कम सुमारे चार कोटी 30 लाख रुपये देण्याचे ठरले; मात्र ऍग्रीमेंटमधील ठरलेली ठेव रक्‍कम कायदेशीर मार्गाने देता येऊ नये यासाठी आरोपींनी गुंतवणूकदारांना पुढील तारखेचे धनादेश दिले. धनादेश बॅंकेत वटण्यापूर्वीच आरोपींनी दिलेल्या धनादेशाचे पेमेंट बॅंकेला सांगून स्टॉप केले असल्याचे नाटेकर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

सद्या हिंजवडी, माण, मारुंजी, नेरे, जांबे परिसरात बेकायदा प्लॉटिंगचा व्यवसाय मोठ्या तेजीत सुरू आहे. अनेक व्हाइट कॉलर लॅण्डमाफिया देखील या व्यवसायात मोठ्या प्रमाणात सहभागी आहेत. अनेक प्रलोभने व आमिषे दाखवून, होर्डिंग्ज बॅनर लावून खरेदी-विक्रीचा गोरख धंदा राजरोसपणे सुरू आहे. त्यामुळे प्लॉट खरेदी करणारांची फसवणूक होताना दिसत आहे.

तक्रारी आल्या की लगेच गुन्हे दाखल करणार
आमच्याकडे प्लॉटधारकांच्या तक्रारी आल्यानंतर पोलीस आयुक्‍तांच्या आदेशानुसार तत्काळ गुन्हे दाखल करून लॅण्ड माफियांच्या मुसक्‍या आवळणार आहोत. कुणाचीही गय केली जाणार नाही. त्यामुळे पुढील काळात आशा फसवणुकीच्या प्रकारांना पायबंद बसेल, असे हिंजवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत यांनी सांगितले.

Post a comment

0 Comments