भाजपमध्ये धुमसणारा अंतर्गत कलह अखेर उफाळला



सांगली :.  सांगली जिल्ह्यातील भाजपमध्ये धुमसणारा अंतर्गत कलह अखेर उफाळला आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकांमध्ये खासदार संजयकाका पाटील यांच्या संतापाचा उद्रेक झाला. ते जिल्हा परिषद अध्यक्षांच्या बंगल्यावर झालेल्या सदस्यांच्या बैठकीतून बाहेर पडले. त्यानंतर त्यांनी गाडीचा दरवाजा जोरात आपटत पुढचा रस्ता धरला. त्यांच्या संतापाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.

चंद्रकांत पाटील हे रविवारी एका कार्यक्रमानिमित्त जिल्ह्यात आले होते. मात्र खासदार असूनही संजयकाका यांनी त्यांच्या कार्यक्रमाला हजर राहिले नाही. त्यानंतर विजयनगरच्या हॉटेलमध्ये पक्षाच्या सुकाणू समितीची बैठक झालीतेथेही संजयकाका न गेल्यामुळे उलटसुलट चर्चा सुरू झाली होती. बैठक संपतेवेळी ते आले, त्यावेळी चंद्रकांत पाटील हे पदाधिकारी बदलासाठी जिल्हा परिषद अध्यक्षांच्या बंगल्यावर गेले होते..


संजयकाका चंद्रकात पाटलांना भेटण्यासाठी तेथे गेले, मात्र दोन-तीन मिनिटांतच ते बाहेर पडले. या वेळी प्रदेशाध्यक्षांवरील संताप त्यांच्या चेहऱयावर दिसत होता. त्यांनी रागातून गाडीचा दरवाजा जोराने बंद केला. काही पदाधिकाऱयांनी त्यांना प्रदेशाध्यक्ष परत बोलवत असल्याचा निरोप दिला. मात्र संजयकाकांनी त्या निरोपाला जुमानले नाही.

जिल्हा परिषदेतील पदाधिकारी बदलण्यासाठी संजयकाका अनेक दिवसांपासून पक्षाकडे पाठपुरावा करीत आहेत. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील जिह्यात आले असताना याचा फैसला होईल, या विचाराने संजयकाका त्यांच्याशी चर्चा करायला गेले होते. मात्र पाटील यांनी पदाधिकारी बदलाचे घोंगडे भिजतच ठेवल्याचा आरोप संजयकाकांनी केला.

Post a Comment

Previous Post Next Post