पत्रकार हा समाजातील घटनांचा वाहक आहेपुणे  :- पत्रकार हा समाजातील घटनांचा वाहक आहे. चांगल्या संकल्पना राबविण्याची भूमिका पत्रकार संघ नेहमीच घेतो. मात्र ज्यांच्यात क्षमता आहेत त्यांनी आपल्या क्षमता आपल्या माणसांसाठी वापराव्यात. तसेच वृत्तपत्र मालकांनी विक्री मूल्य वाढवावे,असे आवाहन महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे यांनी केले.

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या राज्य कार्यकारिणीची बैठक बुधवार दि. १० फेब्रुवारी रोजी राज्य संघटक संजय भोकरे यांच्या अध्यक्षतेखाली पुणे येथील कार्यालयात पार पडली त्यावेळी ते बोलत होते. सरचिटणीस विश्वास आरोटे, वृत्तवाहिनी प्रमुख रणधीर कांबळे, सांस्कृतिक विभाग प्रमुख संदिप भटेवरा, उमेश कुलकर्णी, अनिल बिबवे, पुणे विभागीय अध्यक्ष नितीन शिंदे, राज्य माध्यम समन्वयक भगवान राऊत, प्रदेश प्रसिद्धी प्रमुख नवनाथ जाधव, मराठवाडा विभागीय अध्यक्ष वैभव स्वामी आदी यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. 

आपल्या १ वर्षाच्या काळातील कार्याचा अहवाल त्यांनी यावेळी सादर केला.तसेच पुणे विभागीय म्हणजेच पश्चिम महाराष्ट्र नवीन कार्यकारिणी निवड केली गेली, व  पत्रकार संघाच्या वतीने राज्यात ११ रुग्णवाहिका प्रशासनाला देण्यात आल्या. कोरोना महामारी व लॉक डाऊनच्या काळात वेबिनारच्या माध्यमातून २८ जिल्ह्यातील पत्रकारांशी संवाद साधला. गरजू पत्रकारांना मदत केली. त्याचबरोबर पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबियांना विश्वास देण्याचे काम केले.  औरंगाबाद विभागिय कार्यालयाचे नूतनीकरण करण्यात आले. तेथे दर आठवड्याला वार्तालाप सारखा कार्यक्रम सुरू करण्यात आला. अशाच प्रकारचा कार्यक्रम आता सोलापूर आणि जळगाव जिल्ह्यातही सुरू होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

कोरोना काळात अनेक दैनिकांमधील पत्रकारांना कामावरून कमी करण्यात आले तर अनेकांचा पगार निम्म्यावर आला. याबाबत मालक, संपादकांची भेट घेऊन पत्रकार आणि मालक यांच्यामध्ये समन्वय साधण्याचा प्रयत्न केला. औरंगाबाद मध्ये संपादकांची गोलमेज परिषद आयोजित करून वृत्तपत्र व्यवसायातील अडचणींवर चर्चा करून मार्ग काढण्यात आला. वृत्तपत्र व्यवसाय टिकविण्यासाठी वृत्तपत्रांची किंमत वाढविली पाहिजे हे पटवून दिले त्यामुळे मराठवाड्यासह राज्यातील २५ हुन अधिक दैनिकांनी किंमत वाढविली. पत्रकार संघटनेच्या माध्यमातून नेमके काय केले पाहिजे यावरही चर्चा घडवून आणली. पत्रकारांनी आपल्याला मिळालेल्या संधीचे सोने केले पाहिजे. संघटना हे पत्रकारांना विकसित करण्याचे माध्यम आहे असे ते म्हणाले. 

राज्य संघटक संजय भोकरे म्हणाले की, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटना तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. आपल्याला अशाच पद्धतीने पुढे जायचे आहे. दोन्ही हातांनी चांगले काम करा म्हणजे हजारो हात तुमच्या मदतीसाठी तुमच्या पाठीशी उभे राहतील. आपले कुटुंब, समाज आणि देश यांच्याप्रती असणाऱ्या जबाबदारीचे भान आपण ठेवले पाहिजे आणि पत्रकारिता हाच धर्म समजून आपण ही संघटना पुढे घेऊन जाणार आहोत असे ते म्हणाले.

राज्य सरचिटणीस विश्वास आरोटे यांनी कोरोना महामारी व लॉक डाऊनच्या काळात केलेल्या कामाबद्दल सविस्तर माहिती दिली. यावेळी उत्तर महाराष्ट्र विभागाचे अध्यक्ष प्रविण सपकाळे, मराठवाडा विभागाचे अध्यक्ष वैभव स्वामी, ठाणे विभागाचे अध्यक्ष भगवान चंदे आणि राज्य माध्यम समन्वयक भगवान राऊत यांनी आपला कार्य अहवाल मांडला. यावेळी पुणे विभागीय कार्यकारिणीची निवड करण्यात आली. तसेच महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. कोरोना काळात हजारो गरजू लोकांना अन्नधान्य  व किराणा वाटप करणारे इंदापूर येथील पत्रकार अनिल मोहिते आणि सहकारी यांचा विशेष सत्कार करण्यात आला. 

वैभव स्वामी यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. विश्वास आरोटे यांनी आभार मानले. या बैठकीस पत्रकार संघाचे राज्यभरातील पदाधिकारी, विभागीय अध्यक्ष, प्रदेश कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते. 


Post a comment

0 Comments