सोलापूर महापालिकेच्या अर्थसंकल्प सभेत प्रचंड गदारोळ झाला.


.


सोलापूर महापालिकेच्या अर्थसंकल्प सभेत आज प्रचंड गदारोळ झाला. सभाशास्त्र धारेवर बसवून सत्ताधारी व विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी एकमेकांना आरोप-प्रत्यारोप करीत गोंधळ घातल्याने अखेर पोलिसांचा ताफा सभागृहात बोलाविण्यात आला. अखेर गोंधळातच दोन मिनिटांत सभेचे कामकाज गुंडाळण्यात आले. दरम्यान, महापालिका प्रवेशद्वाराजवळ बूट पॉलिश आंदोलन करणाऱया नगरसेविका श्रीदेवी फुलारी यांच्याकडील बूट पॉलिशचे साहित्य पोलिसांनी जप्त केले.

सोलापूर महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात दि. 29 जानेवारी रोजी तहकूब करण्यात आलेली अर्थसंकल्पीय सभा आज पुन्हा बोलावण्यात आली होती. गटनेते श्रीनिवास करली यांनी सादर केलेला अर्थसंकल्प कोणत्याही चर्चेविना बहुमताने मंजूर करण्यात आल्याचे महापौर श्रीकांचना यन्नम यांना अखेर गोंधळाच्या वातावरणात जाहीर करणे भाग आणि सदरची घोषणा करून महापौर सभागृहाच्या बाहेर पडल्या. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी त्यांना सभागृहाबाहेर जाण्यास मज्जाव केला. यावेळी महिला पोलिसांनी हस्तक्षेप केला.

दरम्यान, विरोधी पक्षनेते अमोल बापू शिंदे यांनी महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांची भेट घेऊन नगरसचिव प्रवीण दंतकाळे यांच्या पक्षपाती कारभाराबद्दल टीका केली आणि अर्थसंकल्प मंजूर करू नये, अशी मागणी केली. आज सकाळी तहकूब सर्वसाधारण सभा सभागृहात सुरू होताच मोठय़ा प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. सभेचे कामकाज सुरू होताच काही नगरसेवकांनी शहरातील पाणीप्रश्नाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला, तर तहकूब अर्थसंकल्प सभा असल्याने प्राधान्याने अर्थसंकल्पावर चर्चा व्हावी, अशी मागणी सत्ताधारी भाजपच्या अनेक नगरसेवकांनी केली.


भाजपचे नगरसेवक सातत्याने मोठमोठय़ाने ओरडत होते. अखेर पोलिसांना पाचारण करावे लागले. सभागृहात पोलीस आल्याबद्दल ज्येष्ठ नगरसेवक सुरेश पाटील यांनी आक्षेप घेतला. प्रशासनाचा जुलूम आहे. सभागृहात सदस्यांना बोलण्याचा अधिकार आहे. प्रशासनाने ही दडपशाही बंद करावी. या गदारोळात अनेक महिला नगरसेवक अर्थसंकल्पावर चर्चा करा, अशी घोषणाबाजी करीत होत्या. अखेर गोंधळातच अर्थसंकल्प सभा समाप्त करण्यात आली..

Post a comment

0 Comments