नाट्यगृहांकडे केवळ कमाईचे साधन म्हणून पाहणे चुकीचे... अभिनेता प्रशांत दामले



सातारा - करोनाची भीती आता मागे पडत चालली असली, तरी मराठी रंगभूमी संक्रमण काळातून जात आहे. तिच्या ऊर्जितावस्थेसाठी कोणीतरी खड्ड्यात उडी मारायला हवी होती. ते धाडस मी केले आहे. नाट्यगृहे आणि त्यात चालणारी नाटके रसिकांना निखळ मनोरंजन देतात. नाट्यगृहांकडे केवळ कमाईचे साधन म्हणून पाहणे चुकीचे आहे, असे मत नाट्य अभिनेता प्रशांत दामले यांनी साताऱ्यात व्यक्त केले.

प्रशांत दामले यांच्या 'एका लग्नाची पुढची गोष्ट' या नाटकाचा प्रयोग शुक्रवारी (दि. 19) रोजी शाहू कला मंदिर येथे होत आहे. इम्तियाज पटेल यांच्या कथेवर हे नाटक आधारित असून अद्वैत दादरकर यांचे दिग्दर्शन आहे. प्रशांत दामले व कविता लाड यांच्या प्रमुख भूमिका आहेत.या नाटकाच्या निमित्ताने दामले यांनी गुरुवारी साताऱ्यात पत्रकार परिषद घेतली.

ते म्हणाले, लॉकडाऊनमध्ये अडकलेला आणि संक्रमणाशी लढणारा रसिक प्रेक्षक थिएटरकडे वळत आहे. करोनाच्या आठ महिन्यांच्या काळात रंगकर्मी, तंत्रज्ञ, बॅक स्टेज आर्टिस्ट यांना प्रचंड आर्थिक ताणाला सामोरे जावे लागले. त्यामुळे झालेली आर्थिक कोंडी फोडण्यासाठी खड्ड्यात उडी मारण्याची तयारी मी केली. 'एका लग्नाची पुढची गोष्ट' या नाटकाचे प्रयोग 12 डिसेंबरपासून सुरू केले.

गेल्या तीन महिन्यांत तीनशे प्रयोग होऊन हाऊसफुलची पाटी झळकली. आमच्या आवाहनाला प्रतिसाद देत मुंबई, वाशी, ठाणे महापालिकांनी नाट्यगृहांच्या भाड्यांमध्ये कपात केली आहे. साताऱ्यात शाहू कला मंदिरचे भाडे 13 हजार रुपये आहे. सद्य स्थितीत ते रंगकर्मींना परवडणारे नाही. त्यामुळे भाड्यात कपात करण्यात यावी. नाटक हे निखळ मनोरंजनाचे साधन आहे. करोनाच्या संक्रमण काळात फार व्यावसायिक दृष्टिकोन दाखवणे योग्य नाही. मराठी नाटकांना उभारी देण्यासाठी कलाकारांनी मानधनात पन्नास टक्के कपात केली आहे.

नाट्यगृहे ही कलाविष्काराची केंद्रे आहेत. महाराष्ट्रात 62 नाट्यगृहे असून त्यांच्या देखभालीसाठी मोठा निधी उभारला जावा. दरम्यान, पत्रकार परिषदेनंतर दामले यांनी शाहू कला मंदिरातील सुविधांची पाहणी केली. नगराध्यक्ष सौ. माधवी कदम, नगरसेवक किशोर शिंदे, नाटक संयोजक आनंद कदम, माजी नगरसेवक कल्याण राक्षे उपस्थित होते. 

Post a Comment

Previous Post Next Post