बीड: परळी येथील रहिवासी असलेल्या पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात राज्यात एकच खळबळ उडाली आहे. पूजाच्या आत्महत्येप्रकरणी चौकशी व्हावी, असा पवित्रा विरोधी पक्षांनी घेतला आहे. तर दुसरीकडे मात्र पूजा चव्हाण हिचे कुटुंब नि:शब्द आहेत. माझ्या मुलीच्या आत्महत्येची चौकशी झाली पाहिजे, एवढीच मागणी पूजाचं कुटुंबीय करत आहेत.
पूजा चव्हाण ही तरुणी मूळची परळी येथील रहिवासी आहे भावासोबत पुणे येथे राहत असताना तिचा तिसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला तिची हत्या की आत्महत्या अद्याप अस्पष्ट आहे. या प्रकरणात मयत पूजा हीच कुटुंब काही बोलायला तयार नाही.परळी शहरात पूजाचं घर आहे, या घरात तिचे आई-वडील राहतात पूजाच्या मृत्यूने कुटुंबावर शोककळा पसरली आहे. माझ्या मुलीच्या आत्महत्येची चौकशी करा एवढीच मागणी पूजाच्या वडिलांनी केली.
उद्या समाजाची बैठक
पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात बीडमध्ये उद्या समाजाची बैठक बोलावण्यात आली आहे. या मृत्यू प्रकरणात अनेक राजकीय नेते गोवणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर होत आहे. त्यामुळे उद्या समाजाच्या या बैठकीत काय निर्णय होणार, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
पूजा चव्हाण माझ्या मतदारसंघातील तरुणी, तिच्या मृत्यूची सखोल चौकशी झालीच पाहिजे: पंकजा मुंडे
पुण्यातील पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणावरुन सुरु असलेल्या राजकीय वादात आता भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी उडी घेतली आहे. पूजा चव्हाण ही माझ्या मतदारसंघातील तरुणी आहे. तिच्या मृत्यूची बातमी ऐकून मला धक्काच बसला. तिच्या मृत्यूची सखोल चौकशी झालीच पाहिजे, अशी मागणी पंकजा मुंडे यांनी ट्विटरच्या माध्यमातून केली.
तत्पूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणाची तात्काळ चौकशी करण्याची मागणी केली. या तरुणीने आत्महत्या करुन 48 तास उलटले तरी अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. या तरुणीच्या नातेवाईकांनी तक्रार द्यायला हवी, असे पोलिसांचे म्हणणे आहे. पण राज्य सरकारला सुमोटो तक्रार दाखल करुन घेता येत नाही का? असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला.
0 Comments