घरगुती सांडपाण्यावर प्रक्रिया करून शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी मैलाशुद्धीकरण प्रक्रिया यंत्रणा उभारण्याचे आदेश




 पिंपरी - पवना, मुळा व इंद्रायणी नदीमध्ये कोणत्याही उद्योगातून थेट नदीमध्ये सांडपाणी मिसळत नाही. तथापि, शहरातून दररोज 32.55 दशलक्ष लिटर इतके अप्रक्रियायुक्त घरगुती सांडपाणी नदीपात्रात मिसळत आहे. या घरगुती सांडपाण्यावर प्रक्रिया करून शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी मैलाशुद्धीकरण प्रक्रिया यंत्रणा उभारण्याचे आदेश महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने पिंपरी-चिंचवड महापालिकेला दिले असल्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.

आमदार लक्ष्मण जगताप यांनी 2019-20 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातील पुरवणी मागण्यांवर विधिमंडळात कपात सूचना उपस्थित केली होती.त्याला अनुसरून ठाकरे यांनी त्यांना मंगळवारी (दि. 9) त्याबाबतचे उत्तर पाठविले आहे.

जगताप यांनी कपात सूचनेत म्हटले होते की, शहरातील एमआयडीसीमधील उद्योगांनी केंद्र व राज्य सरकारच्या नियमानुसार कंपनीतील रसायनयुक्त सांडपाण्यावर स्वत:च्या रासायनिक प्रक्रिया अथवा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाद्वारे पाणी शुद्ध करून नदीत सोडण्याचे आदेश आहेत.

अनेक छोटे-मोठे उद्योग ज्यांच्याकडे रासायनिक सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प नाहीत तेही मध्यरात्री राजरोसपणे पवना, मुळा व इंद्रायणी नदीमध्ये रसायनयुक्त सांडपाणी सोडत आहेत. त्यामुळे नदीतील पाणी दूषित होऊन जलपर्णीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. डासांचे प्रमाण वाढल्याने जलचर व नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) व मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्स यांच्या संयुक्त विद्यमाने सामूहिक सांडपाणी प्रक्रिया केंद्र उभे करण्याचे नियोजन ठरले आहे. परंतु अद्याप याबाबत कोणतीही कार्यवाही केलेली नाही.

उद्योगातून थेट नदीमध्ये सांडपाणी मिसळत नाही - ठाकरे
कपात सूचनेला उत्तर देताना ठाकरे यांनी नमूद केले आहे की, शहरातील कोणत्याही उद्योगातून थेट नदीमध्ये सांडपाणी मिसळत नाही. तथापि, पवना, मुळा व इंद्रायणी नदीमध्ये महापालिका क्षेत्रातून 32.55 दशलक्ष लिटर, लोणावळा नगरपालिका क्षेत्र - 9 दशलक्ष लिटर, कामशेत क्षेत्र - 1 दशलक्ष लिटर, तळेगाव दाभाडे - 14 दशलक्ष लिटर, देहूगाव - 3 दशलक्ष लिटर, आळंदी - 2.3 दशलक्ष लिटर इतके अप्रक्रियायुक्त घरगुती सांडपाणी मिसळत आहे. शहरातून निर्माण होणाऱ्या घरगुती सांडपाण्यावर प्रक्रिया करून शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने पिंपरी-चिंचवड महापालिकेला सूचित केलेले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post