मराठी गझलेतील अस्सल शेर : इलाही जमादार


इलाही जमादार हे कालवश सुरेश भट यांच्यानंतर व्यापक लोकप्रियता व रसिकप्रियता आपल्या कसदार लेखणीने मिळवणारे  वर्तमान मराठी गझलेतील एक मान्यवर गझलकार होते. यांच्या निधनाने विद्यमान मराठी गझलेने एक 'शेर ' गमावला आहे.फार मोठा गझलकार आणि अतिशय उत्तम माणूस गेला आहे.त्यांच्याविषयी थोडेसे....


मराठी गझलेतील अस्सल शेर : इलाही जमादार

---------------------------------------------------------

 प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी

 ( ९८ ५०८ ३० २९० )

 "मी शब्दांसंगे अविरत भांडत असतो

अन अर्थाचा मी काथ्या कांडत असतो,

जे मुशीतूनी तावून सुलाखून निघते

ते कांचन मी बाजारी मांडत असतो.."

असे मुक्तक  लिहिणारे ज्येष्ठ गझलकार इलाही जमादार  रविवार ता.३१ जानेवारी २०२१ रोजी कालवश झाले. जीवनातील बहुतांश काळ पुण्यात काढलेल्या इलाहीसाहेबांनी सांगली जिल्ह्याच्या मिरज तालुक्यातील दुधगाव या जन्मगावी अखेरचा श्वास घेतला. कालवश सुरेश भट यांच्यानंतर व्यापक लोकप्रियता व रसिकप्रियता आपल्या कसदार लेखणीने मिळवणारे ते वर्तमान मराठी गझलेतील एक मान्यवर गझलकार होते. यांच्या निधनाने विद्यमान मराठी गझलेने एक 'शेर ' गमावला आहे.फार मोठा गझलकार आणि अतिशय उत्तम माणूस गेला आहे.त्यांच्या निधनापूर्वी आठ दिवस ज्येष्ठ गझलकार व इलाहीसाहेबांनी ज्यांना गझललेखनाचे 

धडे दिले त्या आमच्या गझलसादी सहकारी डॉ. संजीवनीजी तोफखाने दुधगावला जाऊन  त्यांना बघून आल्या होत्या.त्यावेळी त्यांचे माझे फोनवर बोलणे झाले होते. आम्ही सर्व गझलसाद ,कोल्हापूर समूहाला घेऊन इलाहीजीना भेटायला  जायचेही ठरवले होते.पण ते होऊ शकले नाही.याची खंत कायम सतावत राहील. जन्मभर एकाकीपणाशी मैत्र असणारा आमचा हा ज्येष्ठ मित्र आपल्या गझला,गाणी,कविता,दोहे ,मुक्तक,रुबाई व अन्य लेखन मागे ठेवून  एकटा निघून गेला.त्यांचा स्वभावही एकांतप्रिय होता.गप्पांची मैफल जमविणे,फड उभारणे त्यांना भावत नव्हते.अर्थात व्यक्तिगत संवाद ते नेहमी ठेवत असत.

"अशी कशी रे तुझी सावली माझ्यावरती पडली सुर्या

तुझ्यासारखे माझ्यासोबत वावरणारे एकाकीपण..

एकांताच्या कुशीत शिरता आकांताने ऊर फाटते

कोठे लपवू,कसे थोपवू पाझरणारे एकाकीपण...

पत्नी -पुत्र वियोग आणि साहित्य क्षेत्रातील संकुचित प्रवृत्तीं कडून आलेले कटू अनुभव व अन्य करणे यामुळे आलेल्या आपल्या एकाकीपणाचे दुःख त्यांना जरूर होते .पण त्या एकाकीपणाची तुलना सूर्याशी करणारा हा प्रकाशपूजक गझलकार होता.मराठीतील एक थोर,प्रतिभावंत,प्रयोगशील गझलकार म्हणून ते ख्यातकीर्त होते.त्यांच्या निधनाने मराठी गझल विश्वाची फार मोठी हानी झाली आहे. माझा एक सदैव चर्चेला तयार असणारा,अनेक मुशायऱ्यात,कार्यक्रमात ज्येष्ठ म्हणून बरोबर असणारा,आणि वयात अंतर असूनही एकेरी नावाने मैत्र असणारा माझा १९८६ पासूनचा गझलमित्र मी गमावला आहे. गझलविचारांबाबत काही वेगळी मते असली,भूमिका असल्या तरी त्याचा आदर करणारा ,मतभेद असले तरी मनभेद न मानणारा एक फार उत्तम माणूस व श्रेष्ठ गझलकार म्हणून त्यांची ओळख व स्थान फार वरचे राहील.

इलाहीसाहेबांच्या जाण्याची जखम सुगंधी नाही तर ती काळजात खोल वार करणारी आहे.पण त्यांची गझल मराठी गझलविश्वात नेहमीच सुगंधित राहील यात शंका नाही. त्यांचा  गझल मोगरा अक्षय दरवळत राहील कारण त्यांचा वारही मोगऱ्याचा असायचा.तसेच दुसऱ्या बाजुला खुले आकाशही त्यांना पिंजरा वाटायचे. त्यांनी लिहिले आहे,

"जखमा अशा सुगंधी झाल्यात काळजाला

केलेत वार ज्याने तो मोगरा असावा..

माथ्यावरी नभाचे ओझे सदा इलाही

दाहीदिशा कशाच्या, हा पिंजरा असावा..

१ मार्च १९४६ रोजी जन्मलेल्या इलाही जमादार यांनी वयाच्या अठराव्या वर्षांपासून कविता लिहायला सुरुवात केली. कालवश डॉ.सुरेशचंद्र नाडकर्णी यांना ते आपले गुरू मानत होते. इलाही आकाशवाणी व दूरदर्शनचे ते मान्यताप्राप्त कवी होते.अनेक मालिका,चित्रपट,नाटके यासाठी त्यांनी गीतलेखन केले.अनेक ध्वनिफितीतून ते रसिकांसमोर आले.मराठी गझल सर्वदूर जावी यासाठी गझल सागर प्रतिष्ठानच्या माध्यमातून गेली अनेक वर्षे सातत्याने कार्यरत असलेले,ख्यातनाम गझलगायक गझलनवाज भीमराव पांचाळे यांनी इलाहीसाहेबांच्या  गझला आपल्या गायकीतून व चालीतून लोकप्रिय केल्या.भीमरावजींच्या मैफलीत इलाहीसाहेबांच्या गझलांचे एक वेगळे गारुड असायचे.त्यामुळे त्यांची पुस्तके न वाचलेले रसिकही केवळ शेरांमुळे ओळखत असत.अर्थात त्यांची पुस्तकेही प्रचंड गाजली.जखमा अशा सुगंधी,भावनांची वादळे,दोहे इलाहीचे,अर्ध्य,चांदणचुरा,वाटसरू, मीरा,गुक्तगु,सखये,मोगरा,आभास,तुझे मौन यासारखी अनेक पुस्तके रसिकांना भावली आहेत.मराठी कवितेत त्यांचे वेगळे  असे स्थान आहे.

दोह्या पासून मुक्तछंदा पर्यन्त सर्व काव्यप्रकार ताकदीने हाताळणारे इलाही उत्तम गझलकार होते,शायर होते.त्यांनाही गझलच जवळची वाटायची. १९९४ ला त्यांचा ' जखमा अशा सुगंधी ' हा गझलसंग्रह आला.त्याच्या मनोगतात ' मी व गझल 'यांचे नाते उलगडताना ते म्हणतात," आज इलाही जमादार म्हणजे गझल असेच माझ्या जीवनाचे समीकरण झाले आहे.गेली चौदा वर्षे मी गझलशिवाय दुसरा कसलाच विचार फारसा केला नाही.माझा हा चौदा वर्षाचा कालावधी वनवासासारखा कठीण व कठोर असला तरी मधूमासासारखा दरवळत राहिला.गझलेने मला खूप खूप दिले .खरं तर आज मी जिवंत आहे तो केवळ गझलेमुळेच.कदाचित काहींना ही अतिशयोक्ती वाटेल.कोणत्याही गोष्टीवर पराकोटीच प्रेम करणाऱ्यालाच याची प्रचिती येऊ शकते.मनातील खेद, खंत,दुःख,वेदना,वंचना जर व्यक्त करता आल्या नाहीत तर माणूस पार गुदमरून,गोठून जातो.जगण्यावरची वासना उडते.या गोष्टींचा कुठे तरी निचरा व्हावाच लागतो.रडल्याशिवाय दुःख हलकं होत नाही असं म्हणतात. "रोते रोते सो जाएगा,फिर सपनों मे खो जाएगा "...अश्रू रूपाने दुःखाचा निचरा होतो व नकळत दुःखाची तीव्रता कमी होते.गझलेने नेमके हे काम केलं आहे.शब्द अश्रूसारखे जेंव्हा जेंव्हा पाझरले तेंव्हा तेंव्हा गझलेने जन्म घेतला.म्हणूनच मला गझल ( कविता ) इतक्या जवळची वाटते." हास्य आहे चेहऱ्यावरती फुलांचे,बाग हृदयाची परी उध्वस्त आहे ' किंवा "पावसाने मांडली फिर्याद आहे ,आसवांचा ,मी तुझ्या अनुवाद आहे ". " अनाथ होईल जगी वेदना माझ्यानंतर,छळेल तुजला तुझी वंचना माझ्या नंतर ".असे शेर  त्यांनी त्यातूनच लिहिले आहेत.

१९८० साली गझलेशी ओळख होऊन तिच्या प्रेमात पडलेल्या इलाहीसाहेबांनी अतिशय ताकदीची  व प्रयोगशील गझल लिहिली. उर्दू गझलेतील काही प्रकार त्यांनी मराठीत प्रथमच आणले.'२००४ साली त्यांचा 'अर्ध्य ' हा तिसरा गझलसंग्रह आला.त्याला  " मजल दरमजल..माझी गझल "  या शिर्षकाने प्रस्तावना त्यांनीच लिहिली आहे.त्यात हजल,उर्दू- मराठी,मराठी- उर्दू द्विभाषी गझल,त्रिवार काफिया गझल,मुस्तजाद गझल,सेमिसरी ( तीन ओळींचा शेर ) गझल,जुलकाफिया (द्विकाफिया ),मक्ताबंद गझल,कवीचे नाव तखल्लूस असलेली गझल,अष्टाक्षरी गझल, सवतीकाफिया गझल असे दहा प्रकार दिले आहेत.इलाही साहेबांनी हे सारे प्रकार ताकदीने हाताळले.गझल लेखनातील हे सर्व प्रकार सर्वानाच भावतील, पटतील असे नाही.पण इलाहीनी ते मराठीत सर्वप्रथम आणले व ताकतीने हाताळले हे मान्य करावेच लागेल. तसेच त्यांना शास्त्रीय संगीत व विविध कला यांची उत्तम जाण होती हे शेरांतूनही दिसून येते.

इलाहीसाहेबानी मानवी मनाच्या सर्व भावभावनांवर शेर लिहिले.मृत्यूकडे सोडवणुकीचा मदतनीस म्हणून ते अगदी पहिल्या पासून बघत होते. म्हणून तर आपल्या पहिल्याच पुस्तकात अनुक्रमणिकेनंतर ते लिहितात ," पंचमहाभूतानाच सांगणार आहे मी ,माझी तिरडी उचलायला, खांदे द्या,मडकं धरा आणि तुमच्यातच तुम्ही मला घेऊन चला, मात्र परत हा उपद्व्याप नको ! " या विषयावर त्यांनी अनेक शेर लिहिले आहेत.उदाहरणार्थ, "काढले आयुष्य सारे मी उभ्या वणव्यात रे,या चितेचा दाह अन अंगार आहे कागदी "," आयुष्यावर जबरदस्त मी प्रहार केला,ओठ शिवोनी मृत्यूशी मी करार केला ", माणसास हे कळते कोठे ?,क्षणाक्षणाने सरतो आहे ", " सरणावरती दुर्दैवाने पेटवली आशा,अन नियतीने खुशाल नंतर सावडली आशा". " आरास पाहिली मी माझ्या कलेवराची,पाहून अंत्ययात्रा हरवून प्रेत गेले, मेल्यावरी जगाच्या प्रेमा उधाण आले,'मेलो कधीच असतो ' ,बोलून प्रेत गेले " , मी तुझ्या साठीच मृत्यो आणली ही जिंदगी,तूच दे शिक्षा तिला रे माजली ही जिंदगी ", " खूप पहिली स्वप्ने आता काय आणखी पाहू ?,तिरडीवरचा प्रवास माझा कशी पालखी पाहू ?"," हिंडलो आजन्म मी मृत्युसवे , जीवनाचा मी दरारा मानला ",आदी शेर त्याची साक्ष देतात.

" आयुष्याला नव्याने जगणे मी जमेल का ते बघतो,

प्रेताला माझ्या सजणे मी जमेल का ते बघतो..

शेंदूर फासुनी मजला पाषाण बनविले त्यांनी 

माणूस म्हणोनी जगणे मी जमेल का ते बघतो..

असे म्हणणारे इलाही माणूस म्हणून फार सरळ,निगर्वी व्यक्तिमत्व होते. ही नव्याने जगण्याची त्यांना आस होती."निशिगंध तिच्या नजरेचा डोळ्यात दरवळे माझ्या, चाहूल तिच्या प्रीतीची हृदयात दरवळे माझ्या ", "वाळूचे तर वाळूचे,चल बांधू घर वाळूचे"," घर वाळूचे बांधायाचे,स्वप्न अनोखे दिवाण्याचे"," स्वप्न हृदयात न्यायला सखे,पापण्यांचीच पालखी केली ". "शिक एकदा खरेच प्रीत तू करायला,हृदय लागले तुझे कधीच दरवळायला ", " उशीर झाला तुला यायला अखेर तू आलास तरी ,तगमग झाली जरी जिवाची सुटली नाही आस तरी "," ती सुगंधाची सावली होती,मी जिला माझी मानली होती ", " चिते सारखे जाळ मला वा फुलाप्रमाणे माळ मला,शब्दाने हेटाळ मला पण नजरेने कुरवाळ मला ".असे त्यांनी लिहिले आहे.

"मी न पूजा न आरती केली,फक्त श्रद्धेवर सही केली ", "शिड सुकाणू नसलेले मी गलबत बाई, जीवन म्हणजे तारेवरची कसरत बाई ", हवा कुणाच्या मुठीत नाही,विश्व हवेच्या मुठीत आहे ", " अस्तित्व संपलेले केंव्हाच आरशाचे,नाही कुणीच नाही येथे परिचयाचे ",

"दोष का देतो अता तो खंजीराला ,कापला त्याचा गळा त्याच्या ठशाने ", " तुला वाटते की तुला हे कळाले,खरे सांग मित्रा कितीसे कळाले ? ", असे शेकडो अप्रतीम शेर त्यांनी लिहिले.तसेच मुक्तका पासून दोह्यांपर्यंत आणि रुबाईपासून मुक्तछंदा पर्यन्त प्रचंड ताकदीची कविता त्यांनी लिहिली. त्यांच्या निधनाने मराठी गझलेची,कवितेची भरून न निघणारी हानी झाली आहे. त्यांच्या अखेरच्या काळात पं.हृदयनाथ मंगेशकर यांनी त्यांना मोठे सहकार्य केले होते.त्याबद्दल खुद्द इलाही कृतज्ञ होते.

"वाचलेली,ऐकलेली ,माणसे गेली कुठे ?

पुस्तकातून भेटलेली ,माणसे गेली कुठे ?

हे प्रदर्शन की प्रदूषण काय आहे नेमके ?

भावरंगी रंगलेली माणसे गेली कुठे ?


जनहीतासाठीच ज्यांनी जन्म अपुला वेचला

काळजावर कोरलेली माणसे गेली कुठे ?

असा अस्वस्थ होऊन माणसांचा शोध घेणारे  इलाही मराठी गझलेच्या काळजावर आपले नाव कायमचे कोरून गेले आहेत. आमचा हा ज्येष्ठ मित्र शब्दांतून अमर राहणार आहेच आहे. त्यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन.

( लेखक मराठी गझलकार आहेत.त्यांचे गझलांकित ( २००४ ),गझलसाद ( २०१० ),गझलानंद ( २०१४) हे संग्रह प्रसिद्ध आहेत. 'युट्युब ' वरही त्यांच्या गझला आहेत.तसेच  समाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजी च्या वतीने गेली एकतीस वर्षे प्रकाशित होणाऱ्या ‘प्रबोधन प्रकाशन ज्योती ‘ मासिकाचे संपादक आहेत.)

Post a Comment

Previous Post Next Post