गणपतराव पाटील हे क्षारपडमुक्त जमीन पॅटर्नचे जनक व्याख्याते वसंतराव हंकारे यांचे प्रतिपादन





 हातकणंगले तालुका प्रतिनिधी : आप्पासाहेब भोसले 

             

  श्री दत्त साखर कारखान्याचे चेअरमन, उद्यानपंडित गणपतराव पाटील यांच्या माध्यमातून जमिनीची, काळ्या आईची सेवा होत आहे. क्षारपड जमिनी याही वृद्धाश्रमात कैद असलेल्या सारख्याच होत्या. त्या पुन्हा पिकाऊ व्हाव्यात आणि काळ्या आईची माया आपल्या घरी रहावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. त्याच पद्धतीने क्षारपड जमिनीवर काम करून ही जमीन सुद्धा पिकावू व्हावी हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून गणपतराव पाटील यांनी तालुका, जिल्हा, महाराष्ट्राला क्षारपडमुक्त जमिनीचा पॅटर्न दिला आहे. गणपतराव पाटील हे या पॅटर्नचे जनक आहेत. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर या कामाची दखल घेतली जात आहे. काळी आई पुन्हा एकदा हसेल आणि शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धी येईल, असे प्रतिपादन व्याख्याते वसंतराव हंकारे यांनी केले.

 श्री दत्त साखर कारखाना उद्योग समूह तसेच डॉ. आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील जयसिंगपूर उदगाव बँकेच्या सहकार्याने राजापूर परिसरातील सुमारे ४०० एकर क्षारपड नापीक जमीन पिकाखाली आणण्यासाठी क्षारपड जमीन सुधारणा सर्वेक्षण मोहिमेचा शुभारंभ वसंतराव हंकारे आणि उद्यानपंडीत गणपतराव पाटील यांच्या हस्ते झाला. यावेळी हंकारे बोलत होते.

      उद्यानपंडित गणपतराव पाटील म्हणाले, राजापूर (ता. शिरोळ) परिसरात  सुमारे ४०० एकरापैकी १०० एकर जमीन क्षारमुक्त करण्यासाठीच्या पहिल्या टप्प्यास आज सुरुवात झाली आहे. जमीन सर्वांना जगविणारी आहे.  क्षारपडीमुळे ही जमीन वापरात नव्हती. तिला  पुनरुज्जीवन देऊन  जमीन पिकाऊ करण्यासाठी प्रयत्न करीत आहोत. जमीन पिकाऊ झाल्यास आपलेही जीवन समृद्ध होईल. या कामांमध्ये कोणतीही अडचण येऊ देणार नाही. सतत पाठपुरावा करीत राहणार आहे. दत्त कारखान्यामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना या शेतकऱ्यांच्या फायद्याच्या असून शेतकऱ्यांनी याचा फायदा घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. प्रारंभी विधिवत पूजा करून श्रीफळ वाढविण्यात आला.

   श्री दत्त कारखान्याचे मुख्य शेती अधिकारी श्रीशैल हेगान्ना , दानू पाटील, मोहन ढवळे, जावीर जमादार, अरुण मगदूम, सलीम जमादार, रावसाहेब कोरे, आबा खोत, बसाप्पा धरणगुत्ते, राजू पाणदारे, लालू गवळी, मौला पटेल, कॉन्ट्रॅक्टर किर्तीवर्धन मरजे, संजय सुतार तसेच राजापूर  येथील शेतकरी उपस्थित होते. आभार अविनाश मिस्त्री यांनी मानले.

Post a Comment

Previous Post Next Post