कोल्हापूर व हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील मतदान केंद्रांवरील पथके रवाना

मतदानासाठी 3 हजार 986 मतदान केंद्र होणार सज्ज

जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची गडहिंग्लज येथील ईव्हीएम मशीन व साधनसामग्रीं वितरण केंद्राला भेट

प्रेस मीडिया लाईव्ह :

कोल्हापूर, दि.06 (12.15 PM) जिमाका : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 अंतर्गत 47 कोल्हापूर व 48 हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी मंगळवार, दि. 7 मे रोजी मतदान होणार आहे. सकाळी सात ते सायंकाळी सहा या वेळेत जिल्ह्यातील मतदारांना आपल्या मतदानाचा हक्क बजावता येईल. 

कोल्हापूर मतदारसंघात एकूण 19 लाख 36 हजार 403 मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून त्यासाठी 2 हजार 156 मतदान केंद्र असणार आहेत. हातकणंगले मतदारसंघात एकूण 18 लाख 14 हजार 277 मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून त्यासाठी 1 हजार 830 मतदान केंद्र असणार आहेत. जिल्ह्यातील या मतदान केंद्रासाठी ईव्हीएम मशीन व मतदानासाठी लागणारे आवश्यक साहित्य, साधनसामुग्रीचे वितरण मतदान चमूंना वितरीत करण्यात आले असून मतदान पथके मतदानस्थळी रवाना होत आहेत. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी महाराणी राधाबाई माध्यमिक उच्च माध्यमिक प्रशाला गडहिंग्लज येथील ईव्हीएम मशीन व साधनसामग्रीं वितरण केंद्राला भेट देवून कामकाजाचा आढावा घेतला.

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. यातील कोल्हापूर उत्तर मतदारसंघातील मतदान केंद्राकरिता ईव्हीएम मशीन व साधनसामग्रींचे विवेकानंद कॉलेज या ठिकाणाहून वितरण झाले. करवीर मतदारसंघाकरिता ईव्हीएम व साधनसामग्रींचे महासैनिक प्रशिक्षण केंद्र, लाईन बाझार रोड येथून वितरण झाले. कोल्हापूर दक्षिण मतदारसंघाकरिता व्हि.टी. पाटील सभागृह, राजारामपूरी येथून वितरण झाले. कागल मतदारसंघाकरिता जवाहर नवोदय विद्यालय, राधानगरी मतदारसंघाकरिता जवाहर बाल भवन, मौनी विद्यापीठ गारगोटी तर चंदगड-गडहिंग्लज मतदारसंघाकरिता महाराणी राधाबाई माध्यमिक प्रशाला गडहिंग्लज या ठिकाणाहून ईव्हीएम मशीन व मतदान साहित्य, साधनसामग्रींचे निवडणूक विभागाकडून संबंधित पोलींग पार्टींना वितरण करण्यात आले.

हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील चार विधानसभा मतदारसंघाचा समावेश कोल्हापूर जिल्हयात आहे. यातील शाहूवाडी मतदारसंघाकरिता मतदान केंद्रासाठी ईव्हीएम मशीन व साधनसामग्रींचे श्री. शाहू हायस्कूल या ठिकाणाहून वितरण झाले. हातकणंगले मतदारसंघाकरिता ईव्हीएम व साधनसामग्रींचे मध्यवर्ती प्रशासकीय इमारत येथून वितरण झाले. इचलकरंजी मतदारसंघाकरिता राजीव गांधी सांस्कृतिक भवन येथून वितरण झाले. तर शिरोळ मतदारसंघाकरिता मध्यवर्ती प्रशासकीय इमारत या ठिकाणाहून ईव्हीएम मशीन व मतदान साहित्य, साधनसामग्रींचे निवडणूक विभागाकडून संबंधित पोलींग पार्टींना वितरण करण्यात आले.

जिल्ह्यात 425 सर्वाधिक मतदान केंद्र 272-राधानगरी  मध्ये असून सर्वात कमी 255 मतदान केंद्र 279-इचलकरंजी मतदारसंघात आहेत. चंदगड मतदारसघांत 381 मतदानकेंद्र, कागल मतदारसंघात 354, कोल्हापूर दक्षिण मतदारसंघात 328, करवीर मतदारसंघात 357, कोल्हापूर उत्तर 311, शाहूवाडी 333, हातकणंगले 331, शिरोळ 293, इस्लामपूर 284, शिराळा 334 याप्रमाणे एकूण 3 हजार 986 मतदान केंद्र आहेत.

जिल्ह्यातील चंदगड, राधानगरी, कागल, कोल्हापूर दक्षिण, करवीर, कोल्हापूर उत्तर, शाहूवाडी, हातकणंगले, इचलकरंजी, शिरोळ या 10 विधानसभा मतदारसंघात प्रत्येकी एक महिला मतदान केंद्र (पिंक बुथ), एक दिव्यांग मतदान केंद्र, युवा अधिकारी-कर्मचारी मतदान केंद्र स्थापित करण्यात आली आहेत. तसेच दोन्ही लोकसभा मतदारसंघातील -एकुण 55 ग्रामीण व शहरी 18 मतदान केंद्र जिल्हयातील वैशिष्टयांवर वेगवेगळ्या थीमवर आधारीत असणार आहेत.

लोकसभा निवडणुकीसाठी जिल्हा निवडणूक यंत्रणा सज्ज झाली असून जिल्ह्यातील दहाही विधानसभा मतदारसंघात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. जिल्हयात एकुण 15003 मतदान अधिकारी कर्मचारी नियुक्त केले आहेत. संवेदनशील केंद्रांवर विशेष लक्ष दिले जात आहेत. जिल्ह्यातील  1756 मतदान केंद्रावर वेब कास्टींगव्दारे निगरानी ठेवली जाणार आहे. सर्व मतदार केंद्रावर सावली मंडप, प्रतिक्षा कक्ष, एनएसएस/एनसीसी स्वयंसेवकांची मदत, मतदार मदत कक्ष, पिण्याचे पाणी, मेडीकल किटसह वैद्यकीय पथक आदी सुविधा मतदारांना पुरविण्यात येणार आहे. दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांसाठी मतदान केंद्रावर व्हिल चेअरसह इतर आवश्यक सर्व सुविधा पुरविण्यात आल्या आहेत.

मतदान केंद्रातील आवश्यक सुविधा व  सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्व यंत्रणेतील अधिकारी, कर्मचारी यांना प्रशिक्षण देऊन तत्पर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. लोकसभा निवडणूक प्रक्रिया निर्भय, नि:ष्पक्ष आणि शांततापूर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी मतदान प्रक्रियेमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन आपला मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे.


Post a Comment

Previous Post Next Post