कात्रज ते स्वारगेट हा बस रॅपिड ट्रान्झिट (बीआरटी) मार्ग सुरू करण्याला अखेर शुक्रवारचा (दि.5) मुहूर्त मिळाला

 


पुणे - बहुप्रतीक्षित आणि बहुप्रलंबित कात्रज ते स्वारगेट हा बस रॅपिड ट्रान्झिट (बीआरटी) मार्ग सुरू करण्याला अखेर शुक्रवारचा (दि.5) मुहूर्त मिळाला आहे. मात्र, या मार्गातून एसटीसह खासगी वाहनांना ये-जा करता येणार नाही. तर पुढील आठ दिवसांसाठी रस्त्याच्या डाव्या बाजूला असणाऱ्या बसथांब्यांवर पीएमपीच्या कर्मचारी नियुक्त करण्यात येणार आहेत.

पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) बसेसचे संचलन सुरळीत होण्यासाठी पालिकेने सन 2005-06 मध्ये पायलट बीआरटी लेनचे काम हाती घेतले. कात्रज ते स्वारगेट, संगमवाडी-विश्रांतवाडी, येरवडा ते वाघोली, सांगवीफाटा ते किवळे मुकाई, नाशिकफाटा ते वाकडफाटा, निगडी ते दापोडी, चिखली ते काळेवाडी याठिकाणी बीआरटी मार्गाची आखणी करण्यात आलीमात्र स्वारगेट ते कात्रज हा 5.8 किलोमीटरचा प्रस्तावित बीआरटी प्रकल्प उड्डाणपूल, अनियोजित बीआरटी मार्ग, थांबे आदींमुळे सुमारे 15 वर्षे गिनीपिगच ठरला. अपूर्ण कामांमुळे 1 जानेवारी 2021 होणारे उद्‌घाटन देखील रद्द झाले. बीआरटी मार्गाच्या सद्यस्थितीबाबत वारंवार दैनिक 'प्रभात'ने वृत्तदेखील प्रकाशित केले आहे.

5 फेब्रुवारीपासून कात्रज ते स्वारगेट या मार्गावरील वाहतूक सुरू करण्यात येणार आहे. सध्या डाव्या बाजूला असणाऱ्या बसथांब्यांवर पुढील 8 दिवस पीएमपीकडून चेकर सेवक नेमण्यात येणार असून, यामुळे प्रवाशांना बीआरटी बसथांब्यांना पोहोचण्यास मदत होणार आहे. यांसह बीआरटी मार्गात अन्य वाहनांनी प्रवेश करू नये, यासाठी पालिकेकडून सुरक्षारक्षकांची नेमणूक करण्यात येणार आहे.

कात्रज-स्वारगेट या मार्गावर एकूण 223 बसेस धावणार असून, एकूण 2 हजार 946 खेपा नियोजित आहे. त्यामुळे या मार्गावर राज्य परिवहन महामंडळाच्या बसेससह इतर वाहनांना प्रवेश देता येणार नाही. केवळ रुग्णवाहिका वाहतूक करू शकणार असल्याचे पीएमपी प्रशासनाकडून सांगण्यात आले.

Post a Comment

Previous Post Next Post