पु.ना.गाडगीळ ज्वेलर्सचे सौरभ विद्याधर गाडगीळ यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार नोंदविली



पुणे. :  पुण्यातच नाही तर जगभर आपला ब्रँड पसरवण्यात यशस्वी झालेल्या पु.ना.गाडगीळ ज्वेलर्सचे सौरभ विद्याधर गाडगीळ यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार नोंदवली आहे. 1 कोटी 60 लाख 50 हजारांचा आपल्याला गंडा घातला असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. गाडगीळ यांनी रोहितकुमार शर्मा (वय 59 वर्ष, चंदीगड) नावाच्या व्यक्तीविरोधात ही तक्रार नोंदवली आहे. ऑक्टोबर 2018 पासून शर्मा याने आपल्याकडून वेगवेगळ्या सबबी सांगत ही रक्कम उकळल्याचं गाडगीळ यांनी म्हटलं आहे.

रोहितकुमार शर्मा हा मूळचा पंजाबचा रहिवासी असून तो एक व्यावसायिक आहे. सौरभ गाडगीळ आणि शर्मा यांची एका मित्रामार्फत ओळख झाली होतीत्यानंतर शर्माचे गाडगीळ यांच्या लक्ष्मीरोड वरील कार्यालयात सतत येणेजाणे होते. ओळख वाढल्यानंतर शर्माने गाडगीळ यांना देशाच्या इतर भागात जशा त्यांच्या शाखा तयार झाल्या आहेत तशीच एक शाखा चंदीगडमध्ये उभारण्याचा प्रस्ताव दिला. ही शाखा उघडण्यासाठी आपण लागेल ती मदत करू असंही शर्माने गाडगीळ यांना सांगितलं. गाडगीळ यांनी हा प्रस्ताव मान्य केला आणि दोघेही चंदीगडला शाखेसाठी पाहाणी करण्यासाठी गेले. शोरूमसाठी बऱ्याच जागा पाहिल्यानंतर एक जागा निश्चित करून गाडगीळ पुण्याला परतले.

गाडगीळ यांचा विश्वास संपादन केल्यानंतर शर्मा याने गाडगीळ यांना पटवून दिलं की नव्या शाखेवर स्वत:च्या खिशातून खर्च करण्याऐवजी आपण कर्ज काढून शाखा उभी करूयात. शर्माने या शाखेसाठी 50 कोटींचे कर्ज उभारण्यास मदत करतो असं गाडगीळ यांना आश्वासन दिलं. यानंतर त्याने कर्ज वितरीत करण्यासाठी तसेच कर्जासाठीच्या शुल्कापोटी (प्रोसेसिंग फी) गाडगीळ यांच्याकडून वेळोवेळी पैसे उकळले. या सगळ्याची एकत्रित रक्कम ही 1,60,50,000 इतकी आहे. याशिवाय शर्माने गाडगीळ यांच्याकडून त्याच्या व्यवसायासाठी 57.5 लाख रुपये वेगळे घेतले होते. कर्जाचं काय झालं हे विचारण्यासाठी कालांतराने गाडगीळ यांनी शर्माला फोन करायला सुरुवात केली, मात्र त्याने फोन घेणं बंद करून टाकलं. यामुळे गाडगीळ यांनी तातडीने गुन्हे शाखेत धाव घेतली आणि तक्रार दाखल केली.

अमित वैद्य हे गाडगीळ ज्वेलर्सचे फ्रॅन्चाईजी प्रमुख आहेत. त्यांची पुणे मिररने प्रतिक्रिया प्रसिद्ध केली असून त्यात म्हटलंय की गाडगीळ ज्वेलर्सचा उत्तरेकडील राज्यांत आपली शाखा सुरू करण्याचा मानस होता. खासकरून पंजाब आणि हरयाणामध्ये शाखा सुरू करावी अशा गाडगीळ ज्वेलर्सचा प्रयत्न होता. याच काळात रोहितकुमार शर्मा हा संपर्कात आला होता. शर्माने दिलेल्या आश्वासनांमुळे त्याच्याकडून हमी म्हणून धनादेश घेण्यात आले होते ज्याबदल्यात त्याला 1.6 कोटी देण्यात आले होते. शर्माने त्याची आश्वासने पूर्ण न केल्याने त्याने दिलेले धनादेश वठवण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र ते वठले नाहीत, यामुळे सौरभ गाडगीळ यांनी पोलिसांत धाव घेतली.

Post a Comment

Previous Post Next Post