बिनकामाचे ठरत आहेत



हडपसर :  - पुणे महापालिकेमध्ये 23 गावांचा समावेश करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू असताना या गावांपैकी शेवाळेवाडी, वडाची वाडी आणि औताडे हांडेवाडीमध्ये नियमानुसार आयोगाने ग्रामपंचायत निवडणूक घेतली. यामध्ये वडाची वाडी आणि औताडे हांडेवाडीत निवडणुकीवर बहिष्कार टाकण्यात आला. तर, शेवाळेवाडीत केवळ एका जागेसाठी निवडणूक झाली. आता, या गावात सरंपच पदाकरिताही आरक्षण जाहीर झाले असले तरी ते बिनकामाचे ठरत आहेत.

जिल्ह्यातील ग्रामपंचायतींसाठी नव्याने जाहीर करण्यात आलेल्या सरपंच पदाच्या आरक्षणानुसार पूर्व हवेलीतील शेवाळेवाडी, वडाची वाडीकरिता सर्वसाधारण (महिला) आणि औताडे हांडेवाडी नागरिकांचा मागास प्रवर्ग असे आरक्षण पडले आहे.परंतु, या गावांत निवडणुकाच झालेल्या नसल्याने ही गावे सरपंचाविना असतील.

तर म्हाळुंगे, सूस, बावधन बु., किरकटवाडी, पिसोळी, कोंढवे-धावडे, न्यू कोपरे, नांदेड, खडकवासला, मांजरी बु., नऱ्हे, मंतरवाडी, होळकरवाडी, नांदोशी, मांगडेवाडी, भिलारेवाडी, गुजर निंबाळकरवाडी, जांभुळवाडी, कोळेवाडी आणि वाघोली या गावच्या ग्रामपंचायती बरखास्त होऊन सरपंच तसेच अन्य सदस्य यांचीही पदेही येत्या काही महिन्यांत माजी अर्थातच रबरी शिक्‍क्‍यापुरती मर्यादित राहणार आहेत.

पुणे महापालिका हद्दीलगतच्या 23 गावांचा तपशील तसेच गाव समावेशानंतर सुधारित हद्द, सर्व्हे नंबर, क्षेत्रनिहाय तपशील याची माहिती नगरविकास विभागाकडे देण्यात आली आहे. यामुळे आता गावकारभार पालिका प्रशासनाकडे जाणार असल्याने ग्रामपंचायती बरखास्त होण्याच्या मार्गावर आहेत. याच कारणातून पालिकेत समावेश होणाऱ्या गावात निवडणुका लढविल्या गेल्या नाहीत. आता, या गावांकरिता सरपंच पदाची आरक्षणही जाहीर करण्यात आली असली तरी निवडणुकाच झाल्या नसल्याने सरपंच पदावर बसवायचे कोणाला? अशी प्रशासकीय अडचण निर्माण झाली आहे.

त्यामुळे पालिकेत जाणारी ही गावे विना सरपंचाची असतील तर अन्य गावांसाठीची सरपंच पदाची आरक्षणही जाहीर झाली असली तरी ही गावे आता पालिकेत समाविष्ट होत असल्याने त्याचा काही उपयोग होणार नाही, याउलट या गावच्या आताच्या ग्रामपंचायतीच बरखास्त होऊन सदर गावांचा प्रशासकीय कारभार पालिकेकडे जाणार आहे. यामुळे गेल्या कित्येक वर्षे ग्रामपंचायत निवडणुकांचा जल्लोष या गावांत दिसलेला नाही, सर्वत्र शांतता आहे. परंतु, येथील सरपंच, सदस्यांना आता नगरसेवक पदाचे वेध लागले आहेत. कारण, 2022 मध्ये होणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत पालिकेत समाविष्ट गावातही महानगरपालिका निवडणूक जाहीर होण्याची अधिकाधिक शक्‍यता आहे.

महापालिकेत येणाऱ्या गावांतील सरपंचपदाची आरक्षणं अशी…
सर्वसाधारण (महिला) : शेवाळेवाडी, पिसोळी, वडाची वाडी, किरकटवाडी, कोंढवे-धावडे, न्यू कोपरे, खडकवासला, नऱ्हे, मांगडेवाडी, भिलारेवाडी, गुजर निंबाळकरवाडी.
नागरिकांचा मागास प्रवर्ग : औताडे हांडेवाडी, सूस, बावधन बु., मंतरवाडी, होळकरवाडी.
नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) : नांदोशी, म्हाळुंगे.
प्रवर्गानुसार आरक्षण सर्वसाधारण : नांदेड.
सर्वसाधारण : मांजरी बु., वाघोली.
अनुसूचित जाती : जांभुळवाडी, कोळेवाडी.

Post a Comment

Previous Post Next Post