पालिका आयुक्तांनी सादर केलेले 7 हजार 620 कोटींचे अंदाजपत्रक अवास्तव : सजग नागरिक मंच
पुणे - करोनामुळे महापालिकेचे उत्पन्नाचे स्त्रोत घटलेले असताना पालिका आयुक्तांनी सादर केलेले 7 हजार 620 कोटींचे अंदाजपत्रक अवास्तव असल्याची टिका सजग नागरिक मंचाने केली आहे.

यंदा मिळकतकरासाठी अभय योजना आणून सुद्धा पहिल्या 9 महिन्यांत जेमतेम एक हजार कोटी रुपये मिळकतकरांचे आणि दोनशे कोटी रुपयांचे पाणीपट्टी उत्पन्न पालिकेस मिळाले आहे, असे असतानाही महापालिकेला पुढच्या वर्षी 12 महिन्यांत या दोन्हींतून 2850 कोटी रुपये उत्पन्न मिळेल, हा अति आत्मविश्‍वास महापालिका प्रशासन बाळगत आहे.

त्यातच, बांधकाम क्षेत्र अडचणीत असताना यंदा पहिल्या 9 महिन्यांत जेमतेम 275 कोटी रुपये बांधकाम परवानगीतून मिळाले असताना पुढील वर्षी एकदम बांधकाम क्षेत्राला बरकत येऊन एक हजार कोटी रुपये बांधकाम परवानगी शुल्क जमा होईल?हा आशावाद कशाच्या आधारावर? इतर उत्पन्न आजवर कधी 300 कोटी रुपयांच्यावर मिळाले नसताना यावर्षी 900 कोटी रुपये मिळण्याचा अंदाज कसा बांधला? हे स्पष्ट होत नाही, त्यामुळे हे अंदाजपत्रक फुगविल्याची टिकाही मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी केली आहे.

Post a comment

0 Comments