मराठी वृतपत्रसृष्टीचे जनक 'दर्पण'कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे नाव महाराष्ट्र शासनाच्या राष्ट्रपुरुष , थोर व्यक्ती यांच्या शासकीय अभिवादन यादीत नव्याने समाविष्ट करण्यात आले



महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीच्या पाठपुराव्यानंतर मराठी वृतपत्रसृष्टीचे जनक 'दर्पण'कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे नाव महाराष्ट्र शासनाच्या राष्ट्रपुरुष / थोर व्यक्ती यांच्या शासकीय अभिवादन यादीत नव्याने समाविष्ट करण्यात आले आहे, अशी माहिती महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे संस्थापक अध्यक्ष रवींद्र बेडकिहाळ यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

'राज्य शासनाच्या मंत्रालय, विधिमंडळ, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद व अन्य शासकीय, निमशासकीय जिल्हा व तालुका कार्यालये यातून विविध क्षेत्रात ऐतिहासिक उल्लेखनीय असे कार्य करणार्‍या राष्ट्रपुरुष / थोर व्यक्तींना त्यांच्या जयंती/पुण्यतिथी दिवशी राज्यशासनाच्या वतीने अभिवादन करण्यात या शासकीय यादीमध्ये आचार्य बाळशास्त्री जांभेकरांचे नाव शासनाने समाविष्ट करावे, अशी मागणी महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली होती.

आचार्य बाळशास्त्री जांभेकरांच्या जन्मगावी पोंभुर्ले (जि.सिंधुदुर्ग) येथे महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीने उभारलेल्या 'दर्पण'कारांच्या स्मारकाच्या विकास व सुशोभीकरण कामासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्व संबधित मंत्री, सचिव व अधिकारी यांची एक विशेष बैठक 5 जानेवारी रोजी झाली.

विकास व सुशोभिकरण कामाबरोबरच आचार्य बाळशास्त्री जांभेकरांचे नाव राज्यशासनाच्या अभिवादन यादीत घ्यावे, अशी मागणी आग्रहाने केली होती. अजित पवार यांनी सामान्य प्रशासन विभागाच्या अधिकार्‍यांकडून या यादीची सविस्तर माहिती घेऊन तातडीने बाळशास्त्री जांभेकरांचे नाव या यादीत घ्यावे, असे निर्देश दिले होते. राज्यशासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने शासनाचे परिपत्रक काढत 14 जानेवारी 2021 नुसार त्यांचे नाव या यादीत समाविष्ट केल्याचे शासनाच्यावतीने जाहीर करण्यात आले आहे.'

शासन परिपत्रकानुसार शासकीय कार्यालयांमधून येत्या 16 फेब्रुवारी रोजी जांभेकरांना अभिवादन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तथापी, जांभेकरांची जन्म 16 फेब्रुवारी की 20 फेब्रुवारी यामध्ये निश्‍चित पुरावा उपलब्ध नसल्याने अभिवादन जांभेकरांच्या पुण्यतिथी दिवशी म्हणजेच 17 मे रोजी किंवा जांभेकरांनी सुरु केलेल्या पहिल्या मराठी 'दर्पण' वृत्तपत्राच्या शुभारंभ दिनी म्हणजेच 6 जानेवारी राज्यस्तरीय पत्रकार दिनादिवशी करावे, अशी सुधारित मागणी तातडीने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व सामान्य प्रशासन विभागाचे प्रधान सचिव यांचेकडे केली आहे, असेही बेडकिहाळ यांनी सांगितले..

Post a Comment

Previous Post Next Post