कात्रज ते नवले पुल.पुणे पोलिसांनी सुचवल्या आहेत 24 उपायोजना.

PRESS MEDIA LIVE : पुणे : मोहम्मद जावेद मौला.

पुणे - कात्रज ते नवले पूल महामार्गांवर दोन महिन्यांपासून अपघात सत्र सुरू आहे. या पार्श्‍वभूमीवर पोलीस प्रशासन आणि महामार्ग प्राधिकरणाकडून या भागाची पाहणी करण्यात आली असून अपघाती ठिकाणे लक्षात घेता 24 उपाययोजना सुचवण्यात आल्या आहेत. या मार्गावर वारंवार अपघात होणाऱ्या ठिकाणांबाबत सिंहगड रोड पोलिसांनी 24 सूचना भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला (एनएचएआय) केल्या आहेत. यामध्ये रम्बलर, ब्लिंकर्स बसवणे, वेगमर्यादा दर्शवणारे फलक लावणे, रिफ्लेक्‍टर बसवणे, दिशादर्शक फलक लावणे, रोड स्टड बसवणे, बॅरिकेडिंग करणे आदी सूचनांचा समावेशआहे.

 रात्रीच्या वेळी अपघात टाळण्यासाठी…

नवले ब्रीज सुरू होण्यापूर्वी ते वारजेमाळवाडी नदी पुलापर्यंतच्या रस्त्यावर असणारे पथदिवे (स्ट्रीट लाइट) बंद आहेत. हे दिवे तत्काळ सुरू करावे. यासह कात्रज बोगदा ते वारजे नदी पुलाजवळ रस्ता दुभाजक रात्रीच्या वेळी दिसत नाही. त्यामुळे ते स्वच्छ करून पुन्हा रंगरंगोटी सुरू करावी आणि रेडियम आणि रिफ्लेक्‍टर लावण्याच्या सूचनांचा यामध्ये समावेश आहे. याशिवाय प्रत्येक एक्‍झिट पॉईंटला ब्लिंकर्स बसवणे, वडगाव पूल संपल्यानंतर रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठे खड्डे/घळ तयार झाल्याने साइड शोल्डर भरण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत.

उपाययोजनांची ठिकाणं

- स्वामी नारायण मंदिर पुलाजवळ

- तक्षशिला सोसायटीजवळ

- इंद्रायणी इंटरनॅशनल स्कूलजवळ

- भुमकर चौकाकडून येणारा सर्व्हिस रोड

- रघुनंदन हॉलसमोर

महामार्गाचा सर्व्हेक्षण केले आहे. अपघातांची संख्या कमी होण्याच्या दृष्टीने याबाबत उपाययोजना करण्यात येत असून, विविध ठिकाणी साइन बोर्ड, रम्बलर्स आदीचे काम सुरू आहे.


- सुहास चिटणीस, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण


या मार्गावर अपघाती ठिकाणी 24 दोष शोधून काढले आहेत. ते संबंधित विभागांना देखील पाठवले आहेत. याबाबतची कार्यवाही झाल्यास अपघातांची संख्या कमी होईल आणि मनुष्यहानी देखील टळेल.


- देवीदास घेवारे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सिंहगड रोड पोलीस स्टेशन

.

Post a comment

0 Comments