ग . दि. माडगूळकरांचे.

 ग.दि. माडगुळकरांचे पुणे,माडगूळ आणि  शेटफळ येथे उचित स्मारक व्हावे यासाठी महाराष्ट्रभर त्यांचा कवितांचा जागर करून १४ डिसेंबर २०२० रोजी महाराष्ट्रातील कवी,लेखक,कळावंत,सुज्ञ रसिक आदींनी विविध ठिकाणीअभिनव आंदोलन केले ते अति

 

शय उचित होते. वास्तविक गदिमांच्या जन्मशताब्दी वर्षात  हे स्मारक पूर्ण व्हायला हवे होते.शासनाने त्याकडे गंभीरतेने पहायला हवे होते.प्रभू श्रीरामाला राजकारणाचा विषय बनविणे वेगळे आणि गीतरामायणकाराचे उचित स्मारक उभारणे वेगळे याची प्रचिती आली. मात्र आतातरी हे स्मारक तातडीने उभे रहावे व विद्यमान सरकारने ते करावे ही तमाम साहित्यप्रेमीची अपेक्षा आहे.या निमित्ताने गदिमांच्या विषयी थोडं जाणूनही घेऊया...

स्मारक व्हावेच असे संस्मरणीय गदिमा

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी 

(९८ ५०८ ३० २९०)


मराठी साहित्य,काव्य,चित्रपट आदी क्षेत्रात गदिमा उर्फ गजानन दिगंबर माडगूळकर यांचे स्थान फार मोठे आहे.गीतरामायण लिहिलेल्या गदिमांचा ‘आधुनिक वाल्मिकी ‘अथवा ‘महाराष्ट्र् वाल्मिकी ‘असा आदरपूर्वक सार्थ गौरव केला जातो. १ ऑक्टोबर १९१९ रोजी जन्मलेले गदिमा १४ डिसेंम्बर १९७७ रोजी कालवश झाले.उणेपूरे अठ्ठावन्न वर्षांचे आयुष्य लाभलेल्या गदिमांनी मराठी भाषा व महाराष्ट्रासाठी अवीट व अमीट स्वरूपाची कामगिरी केली आहे. ग.दि. माडगुळकरांचे पुणे,माडगूळ आणि  शेटफळ येथे उचित स्मारक व्हावे यासाठी महाराष्ट्रभर त्यांचा कवितांचा जागर करून १४ डिसेंबर २०२० रोजी महाराष्ट्रातील कवी,लेखक,कळावंत,सुज्ञ रसिक आदींनी विविध ठिकाणीअभिनव आंदोलन केले ते अतिशय उचित होते. वास्तविक गदिमांच्या जन्मशताब्दी वर्षात  हे स्मारक पूर्ण व्हायला हवे होते.शासनाने त्याकडे गंभीरतेने पहायला हवे होते.प्रभू श्रीरामाला राजकारणाचा विषय बनविणे वेगळे आणि गीतरामायणकाराचे उचित स्मारक उभारणे वेगळे याची प्रचिती आली. मात्र आतातरी हे स्मारक तातडीने उभे रहावे व विद्यमान सरकारने ते करावे ही तमाम साहित्यप्रेमीची अपेक्षा आहे.या निमित्ताने गदिमांच्या विषयी थोडं जाणूनही घेऊया.

एकावन्न वर्षांपूर्वी म्हणजे १९६८ साली गदिमांचे ‘गीतसौभद्र ‘ हे पुस्तक प्रकाशित झाले होते.त्याला महाराष्ट्रचं लाडकं व्यक्तीमत्व हे बिरुद असलेले व ज्यांचे हेच जन्मशताब्दी वर्ष आहे त्या पु.ल.देशपांडे यांची प्रस्तावना आहे.त्या प्रस्तावनेत पु.ल.म्हणतात,”सहज बोलणे तरी उपदेश”असे संतांविषयी म्हणतात.माडगूळकरांची गीतरचना सहजपणाची ती उंची गाठते.सोपेपणा इतके जगात काहीही अवघड नाही.एकनाथांप्रमाणे माडगूळकर सर्व पेठांचा कवी.भागवतापासून भारुडापर्यंत नानापरीच्या गीतांचा तो जसा एक जनक होता तसेच माडगूळकर. तमाशाच्या बोर्डावर माडगूळकरांची लावणी घुमघुमत असते.देवळातल्या कीर्तनात त्यांचा अभंग रंगलेला असतो.एखादी नात आजीला ‘गीतरामायण ‘ऐकवीत असते.एखाद्या विजनात तरूतळी कवितेची वही घेऊन प्रियकराच्या कानी गाणे गुणगुणणारी एक युवती माडगूळकरांचे गीत गात असते.आणि सीमेवरचे जवान त्यांच्या समरगीतांच्या धुंदीत पावले टाकीत असतात.कवीच्या हयातीतच या गीतांपैकी अनेक गीतांना अपौरुषेय लाभले.माडगूळकरांच्या कढत लावणीचा चटका बसलेले एक गृहस्थ चिडून मला म्हणाले होते की,’माडगूळकरांनी फक्त असल्या लावण्याच लिहाव्यात.मी सांगतो ‘वेदमंत्राहुन आम्हा वंद्य वंदे मातरम ‘सारखी ओळ माडगूळकरांना लिहिता येणार नाही,असल्या तेजस्वी कविकडे जाऊन शिका म्हणावं.’ते शक्य नाही मी म्हणालो.का ? कारण वेद मंत्राहून आम्हा वंद्य वंदे मातरम ‘ हे गीत सुद्धा माडगूळकरांचेच आहे.संत शाहिरांनंतर असले नामातीत होण्याचे भाग्य एवढ्या मोठ्या प्रमाणात लाभलेला कवी माझ्या पाहण्यात नाही.सामान्य आणि असामान्य दोन्ही प्रतीच्या रसिकांची उस्फुर्त दाद मिळालेला हा कवी आहे.”

असे हे जनकवी गदिमा आटपाडी ,कुंडल,औन्ध या ठिकाणी प्राथमिक,माध्यमिक विद्यालयांतून शिकले.मॅट्रिकची परीक्षा ते उत्तीर्ण होऊ शकले नाहीत.परिणामी पुढील शिक्षण घेऊ शकले नाहीत.त्यामुळे चरितार्थासाठी त्यांनी चित्रपट व्यवसायात प्रवेश केला.’ब्रह्मचारी ‘या हंस पिक्चरच्या चित्रपटात काम केले.के.नारायण काळे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी दिग्दर्शन ,पटकथा लेखनाची मुळाक्षरे गिरवली.याच काळात थोर साहित्यिक वि.स.खांडेकर यांचा लेखनिक म्हणूनही त्यांनी काम केले.या कामामुळे त्यांचे वाचन विस्तृत झाले.त्यांना काव्यलेखनाची गोडी लागली.’नवयुग ‘चित्रसंस्थेत चित्रपट निर्मितीचे धडे गिरवून त्यांनी अनेक चित्रपट कथा लिहिल्या,दिग्दर्शन केले,चित्रपट गीते लिहिली.भक्त दामाजी,पहिला पाळणा,रामजोशी आदी चित्रपटांमुळे ते यशस्वीपणे चित्रपट सृष्टीत स्थिरावले.

गदिमांचा ‘सुगंधी वीणा ‘ हा पहिला गीतसंग्रह वयाच्या तिसाव्या वर्षी म्हणजे १९४९ साली प्रकाशित झाला.त्यानंतर त्यांनी मोठी वाङ्मय निर्मिती केली.जोगीया,चार संगीतिका,गीतरामायण,काव्यकथा,चैत्रबन,गीतगोपाल,गीतसौभद्र इत्यादी कवितासंग्रह प्रकाशित झाले.तसेच कृष्णाची करंगळी,चंदनी उदबत्ती आदी दहा कथासंग्रह त्यांनी लिहिले.आकाशाची फळे,उभे धागे,आडवे धागे या कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या.मंतरलेले दिवस, वाटेवरच्या सावल्या आणि तीळ तांदूळ हे आत्मचरित्रपर लेखन तसेच ‘युगाच्या सावल्या’ हे नाटकही माडगूळकरांनी लिहिले.

गीतरामायणमुळे गदिमा घरोघरी पोहोचले.तसेच उद्धवा अजब तुझे सरकार,एक धागा सुखाचा,थकले रे नंदलाला,बाई मी विकत घेतला श्याम,विठ्ठला तू वेडा कुंभार,इंद्रायणी काठी,नाच रे मोरा,या चिमण्यांनो परत फिरा रे,जिंकू किंवा मरू,बुगडी माझी सांडली ग यासारखी शेकडो गाणी लोकप्रिय झाली.अ आजही लोकप्रिय आहेत.भाषेतील गोडवा,नादमाधुर्य,गेयता ही त्यांच्या काव्य – गीतांची वैशिष्ठे होती.कुसुमाग्रज म्हणतात,’माडगूळकरांची कविता मराठी मातीतून उगवलेली अस्सल मराठी रूपाची ,कलदार शैलीची आणि कसदार आशयाची आहे.शब्दांच्या आणि छंदांच्या राज्यातील तर ते स्वामीच होते.”

गदिमांनी दिडशेवर चित्रपटांचे लेखन केले.दीड हजारांवर गीते लिहीली.दो ऑखे बारह हाथ,नवरंग,गुंज ऊठी शहनाई,तुफान और दिया अशा गाजलेल्या वीस हिंदी चित्रप टांच्या कथाही गदिमांनी लिहिल्या.१९७३ साली यवतमाळ येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते.त्यांना महाराष्ट्र शासनाचे अनेक पुरस्कार मिळाले होते.महाराष्ट्राच्या विधान परिषदेवरही त्यांची निवड झाली होती.१९५१ साली त्यांना संगीत नाटक अकादमी सन्मान मिळाला होता.१९६९ साली भारत सरकारने त्यांना ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित केले होते.असा  थोर कलावंताचे उचित स्मारक होणे ही महाराष्ट्राची  सांस्कृतिक गरज आहे.  गदिमांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन..।


(लेखक समाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजी च्या वतीने गेली एकतीस वर्षे प्रकाशित होणाऱ्या " प्रबोधन “प्रकाशन  प्रकाशन ज्योती " मासिकाचे ‘संपादक’ आहेत.)

Post a Comment

Previous Post Next Post