उमरगा (उस्मानाबाद)


विघ्नसंतोषी प्रवृत्तीही शेतकऱ्याच्या मुळावर.


PRESS MEDIA LIVE : उमरगा  : 

उमरगा (उस्मानाबाद) : एकीकडे निसर्गाचा दगाफटका असह्य होत असताना विघ्नसंतोषी प्रवृत्तीही शेतकऱ्याच्या मूळावर येत आहे. तालुक्यातील कराळी शिवारात काढणी करून राशीसाठी जमा करून ठेवलेल्या तीन शेतकऱ्यांच्या सोयाबीनच्या गंजीला लावण्याचे कृत्य घडले. बुधवारी ( ता.२१) रात्री साडेनऊच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने आग लागल्याने जवळपास सहा लाखाचे नुकसान झाले असून यामुळे अगोदरच अस्मानी सुलतानी संकटातून जाणाऱ्या तीन शेतकऱ्यांवर आर्थिक संकट आले आहे.

या बाबतची प्राप्त माहिती अशी की, कराळी शिवारातील शेतकरी सुधाकर वडदरे यांनी जवळपास तीन एकर क्षेत्रातील सोयाबीनची काढणी केली होती.ग्यानबा वडदरे यांनी सहा एकर तर रमेश वडदरे यांच्या दोन एकर सोयाबीन पिकांची कापणी करुन त्यांनी तीन ठिकाणी स्वतंत्र स्वतःच्या शेतीत सोयाबीनची रास करण्यासाठी गंजी उभ्या केल्या होत्या. बुधवारी रात्री साडेनऊच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने रॉकेलची बॉटल घेवून तीनही शेतकऱ्यांच्या सोयाबीनच्या गंजी पेटविल्याने संपूर्ण सोयाबीन जळून राख झाले आहे.

कांही वेळाने हा प्रकार शेजारील शेतकऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर रात्रीच्या सुमारास शेतकरी शेतात पोहचले, मात्र चोहोबाजूने आगीने रुद्ररूप प्राप्त केल्याने सोयाबीनची राख झाल्याचे चित्र दिसून आले. गुरूवारी (ता. २२) सकाळी तलाठी गजेंद्र पाटील यांनी शिवारात जावून घटनास्थळाचा पंचनामा केला असून आगीत सोयाबीन जळून खाक झाल्याने जवळपास सहा लाखाहून अधिक नुकसान झाले आहे. दरम्यान मोठ्या मेहनतीने पिकविलेल्या, हातातोंडाशी आलेल्या सोयाबिनची राख पाहुन वडदरे शेतकरी बांधवाना अश्रू अनावर होत होते. असे कृत्य करणाऱ्याची चौकशी व्हावी व या शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Post a Comment

Previous Post Next Post