कात्रज ते नवले पूल.


 कात्रज ते नवले पूल संपूर्ण रस्ताच ‘अपघाती स्पॉट’.

या साठी उपाय योजना  करण्याची स्थानिकांकडून मागणी.

PRESS MEDIA LIVE :  पुणे : मोहम्मद जावेद मौला :

पुणे – कात्रज ते नवले पुलादरम्यानच्या रस्त्यावर मंगळवारी भीषण अपघात झाला. यामुळे या रस्त्याने नियमित ये-जा करणाऱ्या वाहनचालकांचा काळजाचा ठोका चुकला. यातून पुन्हा एकदा या रस्त्याकडे लक्ष वेधले गेले आहे. या रस्त्यावरून प्रामुख्याने दुचाकी चालविणे नेहमीच जिकीरीचे ठरते. या परिसरात पुन्हा असे भीषण अपघात घडू नयेत, यासाठी उपाययोजना करण्याची मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.

अतिवेग, ओव्हरटेक करणे, टायर फुटणे आणि गाडीवरील नियंत्रण सुटणे या कारणांमुळे प्रामुख्याने महामार्गांवर अपघात घडतात. कात्रज ते नवले पुलापर्यंतचा मार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहनांची वर्दळ असते. कात्रजहून महामार्गाकडे ये-जा करणे सोयीचे असून, सिग्नल नसल्याने या मार्गाने प्रवास केल्यास वेळदेखील वाचतो. यामुळे अनेक वाहनचालक या रस्त्याचा अवलंब करतात. परंतु, या रस्त्याची रचना, रस्त्याकडेला असणारी अतिक्रमणे, अवजड वाहनांचा अतिवेग, भरधाव येणारी वाहने यामुळे या रस्त्यावर वाहन चालविणे नेहमीच आव्हानात्मक ठरते.

मंगळवारी घडलेल्या अपघातामध्ये टायर फुटणे आणि वाहनावरील नियंत्रण सुटणे, अशी दोन कारणे समोर आली आहेत. यापूर्वी भारती विद्यापीठ वाहतूक विभागाच्या हद्दीत 8 प्राणांतिक अपघात आणि 3 किरकोळ अपघात झाले होते. यापूर्वी देखील डी-मार्टच्या समोर रस्ता ओलांडताना एक अपघात घडल्याची नोंद असल्याचे भारती विद्यापीठ वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक इंदलकर यांनी सांगितले.

कात्रजच्या मुख्य चौकामध्ये कात्रज घाट, कोंढवा, स्वारगेट आणि नवले पूल या चारही ठिकाणांहून येणारे रस्ते एकत्र येतात. त्यामुळे या चौकातील वाहतुकीचा प्रश्‍न गंभीर आहे. या ठिकाणी सातत्याने अपघात देखील होत होते. त्यामुळे हा चौक “हॉटस्पॉट’ ठरत होता. मात्र, या ठिकाणी रस्ता रुंद केल्याने या चौकातील अपघात कमी झाल्याचे निरीक्षण वाहतूक शाखेने नोंदविले आहे.

          वाहन चालविणे जिकीरीचे…

कात्रज आणि नवले पुलाला जोडणारा हा रस्ता कायमच वाहनचालकांना धोकादायक वाटतो. प्रामुख्याने कात्रजकडून येणाऱ्या भरधाव वाहनांमुळे याठिकाणी अपघाताचा धोका संभवतो. या मार्गावर सातत्याने लहान-मोठे अपघात घडतात. अवजड वाहनांमुळे वाहनचालकांना नाहक जीव गमवावा लागत आहे. नियम पाळून देखील असे गंभीर अपघात घडल्यास वाहने चालवायची कशी? असा सवाल स्थानिकांकडून करण्यात येत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post