मनपा स्वतःच खरेदी करणार


 पालिका खरेदी करणार पाच “कार्डियाक’ ॲम्बुलन्स.

PRESS MEDIA LIVE :. पुणेः 

 शहरातील ऍम्ब्युलन्सची कमतरता दूर करण्यासाठी महापालिकेने स्वत:च्या पाच कार्डियाक ऍम्ब्युलन्स खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिकेची एक कार्डियाक रुग्णवाहिका येत्या पाच ते सहा दिवसांत रुग्णसेवेत दाखल होत असून उर्वरित चार रुग्णवाहिकांसाठी पालिकेच्या वाहन विभागाकडून निविदा प्रक्रिया राबवण्यात येत आहे. ही खरेदी प्रक्रियाही ऑक्टोबर महिन्याच्या मध्यापर्यंत पूर्ण होणार आहे. शहरात करोनाचा प्रादुर्भाव काही केल्या कमी होण्याचे नाव घेत नाही. त्यातच अत्याधुनिक सुविधा असलेल्या रुग्णवाहिका वेळेत उपलब्ध न झाल्याने काही गंभीर रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. बाधितांची ऑक्सिजन पातळी कमी झाल्यानंतर एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात रुग्णाला नेण्यासाठी कार्डियाक रुग्णवाहिकेची आवश्यकता पडते. त्या पार्श्वभूमीवर ही व्यवस्था महापालिका प्रशासनाकडून करण्यात आली आहे.

दरम्यान, सद्यस्थितीला महापालिकेने जम्बो हॉस्पिटलमध्ये 24 तास 108 सेवेतील एक कार्डियाक ऍम्ब्युलन्स कार्यरत ठेवली असून, रूबी हॉल आणि जहॉंगीर हॉस्पिटलकडील प्रत्येकी एक कार्डियाक ऍम्ब्युलन्स पाहिजे तेव्हा उपलब्ध होईल, अशी व्यवस्था करण्यात आल्याची माहिती महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रूबल अग्रवाल यांनी दिली आहे. महापालिकेच्या 125 रुग्णवाहिका असून, यापैकी 74 रुग्णवाहिकांमध्ये ऑक्सिजन व्यवस्था करण्यात आली आहे; महापालिकेच्या सेवेतील या सर्व रुग्णवाहिका मोफत उपलब्ध असून यासाठी नागरिकांनी 108 क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले.

महापालिकेने स्वत:ची एक कार्डियाक रुग्णवाहिका खरेदी केली असून यामध्ये रुग्णाच्या जिवितासाठी आवश्यक असलेली वैद्यकीय उपकरणे बसवण्याचे काम सुरू आहे. ही रुग्णवाहिका येत्या पाच-सहा दिवसात रुग्णसेवेत दाखल होणार आहे. तसेच इतर चार कार्डियाक रुग्णवाहिकांची निविदा लवकरच उघडण्यात येणार आहे.

– नितीन उदास, प्रमुख, महापालिका वाहन विभाग

Post a comment

0 Comments