मलकापूर नगरपालिकेने राबवली अतिक्रमण मोहीम


 मलकापूर नगरपालिकेने राबवली जोरदार अतिक्रमण मोहिम.

PRESS MEDIA LIVE :

कराड -मलकापूर नगरपालिकेने मंगळवारी अतिक्रमण मोहीम राबवली. राष्ट्रीय महामार्गालगत कोल्हापूर नाका तसेच मलकापूर फाट्यावरील पत्र्याची शेड, ट्रॅक्‍टर शोरूमचे फलक जेसीबीच्या सहाय्याने हटवले. यावेळी येथील मिळकत धारकांनी पालिका कर्मचाऱ्यांशी वाद घातला. या मोहिमेसाठी चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. अतिक्रमणे हटवण्यात आल्याने येथील सेवा रस्त्यांनी मोकळा श्‍वास घेतला.अतिक्रमण मोहिमेला सकाळी 7 वाजता सुरूवात झाली. दुपारी साडेबारा वाजेपर्यंत मोहीम सुरू होती. यावेळी मुख्याधिकारी मनिषा आव्हाळे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

मलकापूर शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या दोनही बाजूच्या सेवा रस्त्यावर अतिक्रमण झाल्याचे सांगत नगरपालिकेने गेल्या आठवड्यात तब्बल 292 मिळकत धारकांना नोटीसा बजावल्या आहेत. त्यामुळे महामार्गालगतच्या मिळकतधारकात गोंधळाचे वातावरण होते. मंगळवार दि. 27 रोजी तणावपूर्ण वातावरणात मलकापूर पालिकेने मोठ्या पोलीस फौजफाट्यासह अतिक्रमण हटाव मोहिमेला सुरू केली. यावेळी पालिका कर्मचारी जेसीबी ट्रॅक्‍टरसह हजर होते. दिवसभरात चार मोठी अतिक्रमणे काढण्यात आली. जेसीबीच्या सहाय्याने अतिक्रमित फलक, पत्र्याचे शेड हटवण्यात आले. यावेळी पोलीस उपनिरिक्षक कांबळे यांच्यासह 27 पोलिसांचा बंदोबस्त होता.

मोहिमेत कोल्हापूर नाक्‍यावरील दोन पत्र्याचे शेड जेसीबीच्या सहाय्याने हटवली. मलकापूर फाट्यालगतचे जुने बांधकामही पाडण्यात आले. महामार्गालगत झालेल्या नवीन ट्रॅक्‍टरच्या शोरुमचा फलक तसेच लोटस फर्निचर या शोरुमचा फलकही हटवण्यात आला. कारवाई सुरू असताना नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी काही मिळकतधारक व पालिका कर्मचारी यांच्यात जोरदार शाब्दीक चकमक उडाली. दुपारनंतर कारवाई थांबली. मात्र, अतिक्रमण मोहिमेचा धसका घेतलेल्या अनेक मिळकतधारक तसेच व्यवसायीकांनी स्वतःहून अतिक्रमणे काढून घेण्यास सुरुवात केल्याचे दिसून आले. अशाच पध्दतीने शहरातील सर्व मार्गावरील अतिक्रमणे हटणार का? अशी चर्चा होती.

Post a comment

0 Comments