सांगली जिल्ह्यातील राजकीय नेते


सांगली जिल्ह्यातील राजकीय नेते कोरोनाच्या  विळख्यात 


PRESS MEDIA LIVE :  सांगली :

सांगली । सांगली जिल्ह्यात कोरोनाचा समूह संसर्ग सुरू झाला आहे. दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत असल्याने संकट अधिकच गडद होत असताना जिल्ह्यातील राजकीय नेत्यांमध्येही कोरोनाचा विळखा घट्ट होत आहे. सांगली जिल्ह्यात आतापर्यंत सात आमदारांना कोरोनाची लागण झाली असून, त्यापैकी दोन आमदार कोरोनामुक्त झालेत. तर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आणि अन्य शासकीय विभागातील अधिकारी कर्मचारी यांचे रिपोर्ट पण पॉझिटिव्ह आले आहेत. सांगली जिल्ह्यात मार्च महिन्यामध्ये कोरोनाचा शिरकाव झाला, त्या काळात युद्धपातळीवर उपाययोजना राबवून जिल्हा कोरोनामुक्त सुद्धा झाला होता. मात्र पुन्हा, कोरोनाने री-एन्ट्री केल्याने जिल्ह्याची परिस्थिती गंभीर झाली आहे.सांगली जिल्ह्यात आत्तापर्यंत सुमारे 16 हजार जणांना कोरोनानं ग्रासलं आहे. आता तर आमदार, राजकीय नेते आणि अधिकाऱ्यांना सुद्धा कोरोनाची लागण होत आहे. जिल्ह्यातील आमदार सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार विक्रमसिंह सावंत, आमदार सुमनताई पाटील आणि आमदार अनिल बाबर हे आमदार कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्या अगोदर माजी मंत्री आणि आमदार सदाभाऊ खोत, आमदार मोहनराव कदम यांना सुद्धा कोरोनाची लागण झाली होती. मात्र सध्या त्यांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. त्याच बरोबरच पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा आणि अन्य शासकीय विभागातील अधिकारी कर्मचारी यांचे रिपोर्ट सुद्धा कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.

माजी आमदार संभाजी पवार, माजी आमदार नितीन शिंदे, माजी खा.राजू शेट्टी, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, काँग्रेसच्या नेत्या जयश्रीताई मदन पाटील, आटपाडीचे माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख आणि स्वर्गीय आर. आर. पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील यांचे सुद्धा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्याचबरोबर सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ नेते, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य यांच्यासह सांगली महानगरपालिका क्षेत्रातील नगरसेवकही पॉझिटिव्ह आढळले आहेत. माजी महापौर हारुण शिकलगार यांचा कोरोनाने मृत्यू झाला. त्यामुळे सर्व सामान्यांसोबत राजकीय नेत्यांमध्येही कोरोनामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान, लोकप्रतिनिधी आणि नेते हे कोरोनाच्या लढ्यात सक्रिय झाले. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी नेते मंडळी बाहेर आले. प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत चर्चा, बैठका आणि माहिती दिली. रुग्ण झपाट्याने वाढत असल्याने सर्वसामान्यांना उपचार मिळत नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे लोकही नेत्यांपर्यंत पोहोचवू लागले. नेत्यांचा पुन्हा लोकांशी संपर्क सुरू झाला. त्यामुळे नेते मंडळीमध्येही कोरोनाचा शिरकाव झाला.

Post a comment

0 Comments