सांगली: मात्र व्यापाऱ्यांचा उघड विरोध..

सांगलीत जनता कर्फ्यु , मात्र व्यापार्‍यांचा उघड विरोध.


PRESS MEDIA LIVE : सांगली :

कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी आता प्रशासनाने शुक्रवार (दि. 11) पासून दहा दिवस जनता कर्फ्यूचे आवाहन केले आहे. यामध्ये हॉस्पिटल, मेडिकल्स आणि दूध वगळता अन्य व्यवहार बंद ठेवावेत. नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घरातून बाहेर पडू नये, अशा जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी व आयुक्त नितीन कापडनीस यांनी सूचना केल्या आहेत.

शहरासह अन्य ठिकाणच्या व्यापार्‍यांनी मात्र जनता कर्फ्यूला उघड विरोध केला आहे. सर्वत्र गर्दी असेल तर आम्ही दुकाने बंद कशासाठी ठेवावीत, असा पवित्रा व्यापारी एकता असोसिएशनचे अध्यक्ष समीर शहा यांच्यासह जिल्ह्यातील विविध संघटनांनी घेतला आहे.शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा हाहा:कार झाला आहे. दररोज हजारभर रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह निष्पन्न होत आहेत. 30-40 जणांचे मृत्यू होत असून, रुग्णांवर उपचारासाठी ऑक्सिजन, व्हेंटिलेटर्सचे बेड मिळेनात. सांगली जिल्ह्याचा कोरोनादर हा जगाच्या तुलनेत अधिक पोहोचला आहे. एकूणच शहरात बेफाम गर्दी, नागरिकांकडून सोशल डिस्टन्स नसणे, मास्क नसणे आणि सॅनेटायझरचा वापर न करणे यातून मोठ्या प्रमाणात संसर्ग पसरत आहे. भाजीबाजार ते सर्वच बाजारपेठा, शासकीय कार्यालये रस्ते गर्दीने फुल्ल आहेत. यातून कोरोनाचा झपाट्याने प्रसार होत आहे.याला रोख लावण्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून लॉकडाऊन, जनता कर्फ्यूची मागणी होत होती. पालकमंत्री जयंत पाटील यांनीही जनतेनेच खबरदारीद्वारे जनता कर्फ्यू पाळण्याची सूचना केली होती. यानुसार आता डॉ. चौधरी, कापडनीस यांनी शहर व जिल्ह्यात स्वयंस्फूर्तीने बंद पाळण्याचे आवाहन केले आहे. शुक्रवारपासून 20 सप्टेंबरपर्यंत हा बंद राहणार आहे.

परंतु सांगली, मिरजेसह जिल्ह्यात अनेक ठिकाणी व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते, संघटनांनी त्याला विरोध केला आहे. जर शासकीय कार्यालये, उद्योग-व्यवसाय सुरू राहणार आहेत. एसटीसह सर्व सेवा सुरू राहणार असतील तर गर्दी कशी थांबणार? त्यामुळे आम्ही बंद पाळणार नाही असा पवित्रा घेतला आहे. एकूणच व्यापारी, जनता काय भूमिका घेते यावर शुक्रवारीच जनता कर्फ्यूचे भवितव्य ठरणार आहे.

फेरीवाले बंद; भाजीपाला घरपोहोच द्या

प्रामुख्याने शहरात भाजी विक्रेते, खाद्यपदार्थ, फेरीवाल्यांकडे मोठ्या प्रमाणात गर्दी होते. त्यासाठी त्यांनी व्यवहार बंदचे आवाहन केले होते. त्यानुसार भाजीविक्रेते संघटनांनी पुन्हा आठवडा, रस्त्यावरचे बाजार बंद पाळण्याची भूमिका घेतली आहे. आयुक्त कापडनीस यांनी त्यांना सुरक्षित अंतर ठेवून रिक्षाद्वारे फिरून घरपोहोच भाजीविक्रीची सूचना दिली आहे. फेरीवाल्यांनी तर सर्व व्यवहार दहा दिवस बंद ठेवण्याची जाहीर केली आहे.

Post a comment

0 Comments