लोकशाहीत जन की बात.....


लोकशाहीत 'जन की बात ' अधिक महत्वाची

प्रसाद कुलकर्णी यांचे प्रतिपादन

PRESS MEDIA LIVE : इचलकरंजी :

 ता. ११, संसदीय लोकशाही हा भारतीय संविधानाचा आणि राजकारणाचा महत्त्वाचा केंद्रबिंदू व स्थायीभाव आहे.मात्र आज  ' लोक' एकीकडे आणि 'शाही' दुसरीकडे असा अशी परिस्थिती तयार होते आहे. लोकशाहीची परवड होणे हे चांगले लक्षण नव्हे. राजेशाही व साम्राज्यशाहीशी लढा देत ती नष्ट करून लोकांनी लोकशाही प्रस्थापित केली आहे.मनकी बात नव्हे तर जनकी बातचे महत्व लोकशाहीत अधिक महत्त्वाचे आहे.मतदारांचे खरे प्रश्न लक्षात घेऊन मतदारांच्या जाहिरनाम्यावर निवडणूका झाल्या पाहिजेत. भावनिक,तात्कालिक व हवेतील प्रश्नांपेक्षा घटनेच्या मूल्यांना जपणाऱ्या जमिनीवरील व दीर्घकालीन समता प्रस्थापित करणाऱ्या मुद्यांना केंद्रस्थानी आणणे ही आजच्या काळाची गरज आहे.असे मत ' प्रबोधन प्रकाशन ज्योती' मासिकाचे संपादक प्रसाद माधव कुलकर्णी ( इचलकरंजी ) यांनी व्यक्त केले.ते जयसिंगपूर कॉलेज,जयसिंगपूरचा राज्यशास्त्र विभाग आणि आयक्युएसी यांच्या वतीने आयोजित केलेल्या नॅशनल वेबिनार मध्ये प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. प्राचार्य डॉ.राजेंद्र कुंभार यांनी वेबिनारचे उदघाटन केले व आयोजना मागील भूमिका स्पष्ट केली. प्रा.डॉ.के.डी.खळदकर यांनी स्वागत केले.प्रा.डॉ.प्रभाकर माने यांनी वक्त्यांची ओळख करून दिली.

प्रसाद कुलकर्णी पुढे म्हणाले, मतदार जेवढा जागरूक तेवढी लोकशाही सक्षम होत असते. दुर्जनांच्या सक्रियतेपेक्षा सज्जनांची निष्क्रियता लोकशाहीला अधिक हानी पोहोचवत असते. लोकशाही राज्यव्यवस्था जनतेच्या संमत्तीवर आधारित अपेक्षित असते. म्हणूनच त्यात लोकसहभाग महत्त्वाचा असतो.राजकारणातून साधनशुचिता हरवणे ,मूव्हमेंट संपून इव्हेंटबाजी सुरू होणे, नीतिमूल्ये पायदळी तुडवली जाणे, राजकारणाचे सत्ताकारण होणे ही लोकशाहीच्या सुदृढतेची लक्षणे नाहीत.सत्तेचे विकेंद्रीकरण संसदीय लोकशाहीतच होऊ शकते. तर हुकूमशाहीत सत्तेचे केंद्रीकरण असते. आज जाणीवपूर्वक लोकशाहीला कमअस्सल ठरवून हुकूमशाहीचे उघड व छुपे समर्थन करणारी एक कारस्थानी यंत्रणा पद्धतशीरपणे कार्यरत करून दिशाभूल केली जात आहे.

प्रसाद कुलकर्णी पुढे म्हणाले,आज राजकीय,नागरी, मानवी अधिकारांचा प्रत्यक्ष - अप्रत्यक्ष संकोच करण्याचे प्रमाण वाढले आहे. सर्व व्यवस्था आणि स्वायत्त संस्थांचे तकलूपी करण करण्याचा प्रयत्न होतो आहे. माध्यम आणि समाज माध्यम यांचा वापरही सत्तेच्या अंध गौरवीकरण्यासाठी केला जात आहे. माणसांची विचारक्षमता मारून टाकण्याचे काम केले जात आहे. हे सारे बदल हे लोकशाही समोरील  पर्यायाने लोकांसमोरील आव्हान आहे. काही राजकीय पक्ष व नेते यांच्या आत्ममग्नी कार्यपद्धतीपासून ते निवडणूक कायद्यातील उणिवांपर्यंत अनेक बाबी लोकशाहीपुढे आव्हाने उभी करत आहेत. हे खरे असले तरी संसदीय लोकशाही हीच सर्वात लोकाभिमुख पद्धती आहे हे नाकारता येणार नाही. मुद्दा आहे तो त्यातील दोष दूर करण्याचा.भारतीय लोकशक्तीने आपली शक्ती वेळोवेळी दाखवून दिलेली आहे.उतल्या मातलेल्याना ताळ्यावर आणण्याचे काम लोकशाही व्यवस्थेतच होत असते. म्हणूनच लोकशाही समोर आलेली आव्हाने लोकशक्तीनेच परतवून लावली पाहिजेत.आपल्या ओघवत्या शैलीतील मांडणीत प्रसाद कुलकर्णी यांनी या विषयाचा सविस्तर उहापोह केला. प्रा. डॉ.एस.बी.बनसोडे यांनी आभार मानले.या वेबिनारच्या आयोजनात प्रा.डॉ.एस.आर.साबळे,प्रा.डॉ.एन.पी.सावंत,प्रा.डॉ.टी.जी.घाटगे,प्रा.सौ.व्ही.व्ही.चौगुले, प्रा.डॉ.सुनंदा शेळके,प्रा.डॉ.एस.बी.डफळापूरकर आदींनी सहभाग घेतला होता.तसेच राज्यातील व राज्याबाहेरील  प्राध्यापक,अभ्यासक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Post a Comment

Previous Post Next Post