शेती क्षेत्रात उद्योजक , शेतकऱ्यांना संधी


शेती क्षेत्रात, उद्योजक शेतकऱ्यांना संधी...!

PRESS MEDIA LIVE : पुणे :

सध्या देशात शेती क्षेत्रात जे नवीन कायदे तयार झाले त्यात करार शेती बाबत उल्लेख केला आहे. शेतकऱ्यांनी काय करावे हे स्वतः शेतकरी ठरवले त्यामुळे करार शेती केली म्हणून शेतकरी फसतील अशी बोंब करणारे यांनी लक्षात घ्यावे की शेती कराराने करावी की स्वताहून करावी यांचा निर्णय शेतकरी स्वतः घेणार त्यामुळे त्याला विरोध करण्याची काही गरज नाही. शेतकऱ्याने काय करावे आणि काय करू नये हे सांगण्यापेक्षा त्याला शेती क्षेत्रात उद्योग उभा करण्यासाठी कायद्याच्या बेड्या तोडून स्वतंत्र्य द्यावे. आज शेती करताना मधला दलाल, व्यापारी, वाहतूक इ. बाबी टाळून शेतकर्‍यांच्या हातात रोख पैसा मिळतो. त्यामुळेच शेकर्‍यांनी करार शेती आणि कंपनी शेती-संकल्पना समजून घेतांना ग्राहकाची आवड निवड, करार शेतीस प्रोत्साहन देणार्‍या कंपन्यांची मागणी, त्याप्रमाणेच शेतमाल पिकविणेचे धोरण अंमलात आणावे लागतील. शेतकरी स्वतः उत्पादक असल्याने त्याने शेती वर आधारित उत्पादन प्रक्रिया केंद्र उभारली तर शेवटी प्रगती ही शेतकऱ्यांची होणार आहे. सध्या मॉल संस्कृती वेगाने वाढत आहे. उदा. इ.स. २००० मध्ये हिंदुस्थानात फक्त ३ मॉल्स होते.२००५ पर्यंत या देशात २२० मॉल्स उभे राहिले. सुभिक्षाने एकाच दिवशी १०० लहान लहान दुकानांची साखळी सुरु केली. वॉलमार्ट-भारतीने आपल्या देशातील शेतकर्‍याबरोबर शेतीमाल, भाजीपाला, फळे वगैरेच्या खरेदीसाठी करार करण्याचा सपाटा सुरू केला आहे. जगामध्ये प्रचंड वेगाने वाढणार्‍या या उद्यागामध्ये हिंदुस्थान हा रिटेलिंग मार्केटमध्ये जगात पहिल्या क्रमांकावर आहे. करार शेती करतांना शेतकर्‍यांनी केले तर नुकसान नसून ते त्यांना फायदेशीर ठरेल. 

९० च्या दशकात संगणक आले तेंव्हा अनेकांनी त्याचा विरोध केला होता. 'संगणक चार माणसांचे काम करतो, आता बेकारी वाढेल' असा प्रचार केला गेला. संगणक येऊ नये म्हणून संघटीत क्षेत्रातील  कामगारांनी असंघटीत क्षेत्रातील कामगारांना हाताशी धरून मोर्चे काढले. सगळे होऊन ही संगणक आले. स्थिरावले रोजगार घटले का हो? नाही उलट वाढले. आज मात्र ज्यांनी संगणक आणले तेच लोक पुन्हा शेतकरी विधयक रद्द करा म्हणून न्यायलयात जात आहे. विरोध करीत आहेत. जो शेतकरी आज दुर्दशेच्या पराकोटीला पोचला आहे, त्याला म्हणतात, 'या नवीन कायद्याने ने तुझे वाट्टोळे होईल." अजून काय वाट्टोळे होणार आहे? ज्यांनी संगणक आणले ते आज शेतकरी बाजूने विरोध करत आहे. आज शेतकरी स्वातंत्र्याचे थोडे दार उघडले त्याला विरोध करणारे उद्या शेतकरी प्रगती करू लागला तर त्यांना आवडणार नाही का ? भांडवलदार येतील आज विरोध करणाऱ्याना भांडवलदार होऊ नका म्हणून कोणी थांबवले आहे. जर तुम्हांला तसे थांबवले असेल तर त्याला विरोध करा ते राहिले बाजूला आणि शेतकऱ्यानी फक्त गरिबीत जीवन जगावे असे वाटत असावे.  कारण काही लोकाना आपण काय बोलतो आणि काय करतो याच्याशी काही देणे घेणे नसते. त्यांना शेतकरी प्रश्न हे कामगारांचे प्रश्न वाटत असतात. 

भारतात पारंपरिकरीत्या भूधारक हे नेहमीच काही एकर शेतीमध्ये शेती करत आले आहेत. पाण्याच्या कमतरतेमुळे प्राथमिक ठिबक सिंचन पद्धतीचा वापर करून शेतकरी पीक घेत आले आहेत. मात्र पाण्याची साठवण योग्यरीत्या न झाल्याने शेतीला असफल पाणी व्यवस्थापनाची झळ सोसावी लागत असते. शेतमाल पोहोचविण्यासाठी पर्याप्त सुविधा उपलब्ध नसल्याने शेतीमध्ये योग्य रीतीने विपणन होऊ शकत नाही. तसेच शेतमाल आणि उत्पन्न सुरक्षितरीत्या साठविण्याची सोय नसल्याने शेतमाल वाहून नेताना व साठवताना सुद्धा बरेच नुकसान होत असते. पतसंस्थांकडून मिळणारी पत आणि विमा प्रवेशाच्या अभावी शेतक-यांना शेतीसाठी पैसे जमविणे कठीण जाते. कृषी विपणन क्षेत्र इतके कमजोर आहे की ते शेतक-यांना त्यांच्या पिकांचा योग्य भाव सुद्धा मिळवून देण्यास अपयशी ठरते. कंत्राटी शेती या सर्व समस्यांवर एकमेव तोडगा आहे आणि यामुळे भारतीय शेती क्षेत्रात शेतक-यांना बराच नफा होऊ शकतो. आपण लक्षात ठेवले पाहिजे ज्यांना पिंजऱ्यात राहयचे त्यांनी तिथे राहवे परंतु ज्यांना आकाशात उडायचे त्यांना उडू दिले पाहिजे. सगळ्यांना म्हटले पिंजऱ्यात बंदिस्त रहा तर कशी प्रगती होणार. त्यामुळे शेती क्षेत्रात जे सुधारणा करण्यात आले आहे त्यामुळे उद्योजक शेतक-यांना ही मोठी संधी आहे. 

कंत्राटी शेती हा एक करार असेल खरेदीदार आणि शेतक-यामध्ये. ज्यात उत्पन्नावर करार ठरविला जाईल. होणा-या उत्पन्नाच्या प्रमाणावर शेतक-याच्या सहमतीने खरेदीदार पहिलेच त्याची किंमत ठरवेल व हे ठरविलेल्या कालावधीत होईल. असे करताना शेतकरी उत्पन्न काढेल आणि खरेदीदार त्या उत्पन्नाचा ठेकेदार असेल. शेती व्यवसायात असणा-या कॉर्पोरेट कंपन्यांना कंत्राटी शेतीचा उत्तम फायदा होईल. आयात-निर्यात इत्यादी करीत असलेल्या कंपन्यांमध्ये कंत्राटी शेतीचा नफा अगदी स्पष्ट दिसून येईल. कारण त्या कंपन्या बांधील वेळेत कच्चा माल उत्तम दरात घेऊ शकतील. जसे की देसाई फ्रुट्स, स्रिटस प्रोसेससिंग इंडियासारख्या मोठय़ा कंपन्या कंत्राटी शेती करीत आहेत आणि त्यातून त्यांना उत्तम फायदा होत आहे. कंत्राटी शेतीमुळे शेतक-यांचे संत्र्याचे उत्पादन जे कधी वाया जात होते ते वाया जाणार नाही आणि तसेच केळीच्या उत्पन्नाला सुद्धा या शेतीमुळे जास्त फायदा मिळू शकेल. झालेल्या करारानुसार शेतक-याला ठरलेल्या वेळेत माल पिकवून ठेकेदाराला ठरलेल्या किमतीत द्यावा लागेल. यामुळे बाजारपेठेतील अस्थिरता सुद्धा कमी होईल आणि शेतक-यांसाठी सुद्धा ही बाब फायद्याची असेल तसेच ठेकेदाराला होणारा नफा हा उत्पन्नाचे उत्तम व्यवस्थापन करेल. ठेकेदार हा चांगल्या पिकांसाठी शेतक-याला सुरुवातीपासूनच मदत करेल.

कंत्राटी शेती ही भारतातील शेती व्यवसायामध्ये नक्कीच उत्तमरीत्या यशस्वी होईल. एवढेच नव्हे तर ठेकेदार आणि शेतक-यांमधील संबंध सुद्धा चांगले होतील, जे व्यवसायासाठी पूरक असेल. कंत्राटी शेतीच्या व्यवस्थापनेमुळे लवकरच अशी एक व्यवस्था निर्माण होईल जी शेतक-यांच्या सुरक्षिततेची काळजी घेईल. कंत्राटी शेतीमुळे नुकसान होण्याचा धोका कमी होतो आणि करार झाला असल्यामुळे दोघांनाही होणा-या उत्पन्नाच्या व्यवस्थापनाची जबाबदारी असते. मात्र कंत्राटी शेतीमध्ये शारीरिक, सामाजिक आणि मार्केटमध्ये होणा-या चढउतारामुळे थोडा फरक पडू शकतो. या शेतीमध्ये होणारा आणखी एक फायदा म्हणजे नियमित येणारा पैसा ज्यामुळे शेतकरी रिकामा राहत नाही. तसेच स्वत:ची जमीन नसणा-या शेतक-यांसाठी रोजगार उत्पन्न होतो. ज्यामुळे त्यांचे शहराकडील स्थानांतरण थांबते व शेतीवरचा विश्वास वाढतो. यात शेतक-यांना सगळ्यात मोठा होणारा फायदा म्हणजे व्यवहारातील पारदर्शकता; जी पहिलीच करारात सामील झालेली असते. शेतक-यांना नफा हवा असेल, तर त्यांनी नेहमीच उत्पन्नाच्या गुणवत्तेचा दर्जा राखायला हवा. तसे करण्यासाठी त्यांना योग्य वेळी खतांचा आणि इतर गोष्टींचा पुरवठा होणे अत्यंत आवश्यक आहे आणि याच वेळेस खरी गरज असते यांना चांगली माहिती देणा-या कंपनीची. ही कंपनी शेतक-यांना जास्त मुदतीचे सुरक्षित आणि उत्तम दराचे करार पुरविण्यास मदत करते, जेणेकरून शेतक-यांना आधार आणि एक चांगली जीवनशैली मिळू शकेल. कंपनी फळे आणि भाजीपाला थेट शेतक-यांकडून एकत्र करून रिटेल दुकानांमध्ये तसेच हॉटेलला भाजीपाला पुरविणा-यांना वा अन्य कंपन्या, इतर ई कॉमर्स फूड इंडस्ट्रीजला पुरविते. हे सर्व एकाच श्रंखलेतून होत असल्याने माल वेळेवर पोहोचतो आणि यामुळे शेतमालाचे नुकसानही कमी प्रमाणात होते आणि शेतक-यांना त्यांचा माल चांगल्या दरात विकल्याचे समाधानही असते. या सर्व कामात आपल्या जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान, जाणकारांची मदत तसेच इतर लागणा-या उत्तम दर्जाच्या सेवा कंपनी पुरवू शकेल. अशा शेतींना नमुना म्हणून ठेवण्यात येईल, जेणेकरून इतर शेतकरी यातून शेतीची क्षमता कशी वाढवावी, तांत्रिक मदत कधी व कशी घ्यावी या आणि इतर गोष्टींबद्दल माहिती घेऊ शकेल. या शेतीचा फायदा शेतक-यांना तर होईलच मात्र वितरकांना सुद्धा मालाचा दर्जा कळेल. तसेच शेतक-यांना एखाद्या विशिष्ट पिकाचे सुद्धा उत्पन्न घेता येईल आणि असे ते एकटे किंवा इतर शेतकरी मिळूनसुद्धा करू शकतात जेणेकरून ते जास्त प्रमाणात उत्पन्न पिकवू शकतील. कंत्राटी शेती ही झपाटय़ाने वाढत आहे. यात प्राथमिकरीत्या टोमॅटोचा गर, सेंद्रीय रंग, पोल्ट्री, मशरूम, चिप्ससाठी लागणार बटाटा, मँडारिन संत्रे, ऑर्किड, पल्पवूड या सर्व पदार्थाचे उत्पन्न कंत्राटी शेतीतून घेता येते. आपल्या येथील वातावरणात वेगवेगळी पिके घेण्यास अत्यंत पूरक आहे. आणि कंत्राटी पध्दतीमुळे ही शेती अत्यंत सुकर व सुव्यवस्थित करता येते. या शेतीच्या मदतीने कंपनी शेतक-यांना तांत्रिक मदत करू शकतात आणि बी-बियाणे, खते, तांत्रिक सल्लासुद्धा पुरवू शकतात. यामुळे शेतक-यांना सरळ सरळ नफा मिळेल व दलाली कमी होईल.  शेतकऱ्याने पैसे कमवण्यासाठी त्याला त्याचे स्वतंत्र्य पाहिजे. त्याला काय करायचे यासाठी अनेक मार्ग पाहिजे जेणेकरून त्याने कुठल्या मार्गाने त्याचा शेती मध्ये उद्योग करतांना काय करावे यासाठी बंधन नको तर त्यासाठी पर्याय खुले पाहिजे. आपण जर त्याला म्हणू लागलो नाही तुला इतर पर्याय नाही वापरता येणार तर तो कसा प्रगती करेल. कुठल्याही उद्योगात कार्य करणाऱ्याला पर्याय पाहिजे असतात. आपण समजून घेतले पाहिजे शेती हा जोखीमाचा उद्योग आहे. त्यात आपल्या कडे कमाल जमीन धारणा कायद्यामुळे शेतीचे तुकडे दिसू लागले आहे. पूर्वी एकत्र कुटुंब ही विभक्त झाली आणि त्यामुळे जमिनीचे तुकडे पडले व शेती क्षेत्र कमी झाले. शेती क्षेत्र कमी असल्याने त्यात गुंतवणूक केलेला पैसा अधिक नफा कसा मिळून देऊ शकतो यांचे साधे गणित कोणी समजून देऊ शकेल का ? आपल्याकडे शेती क्षेत्राला कधी उद्योग म्हणून बघितले नाही. आज ही परिस्थिती आहे तंत्रज्ञान वाढले सुविधा मध्ये बदल झाला आणि जगा बरोबर स्पर्धा करायची असेल तर आपल्याला देखील त्याचप्रमाणे पाउल उचलणे गरजेचे होते. आज जे काही विधेयक मंजूर झाले त्यामुळे थोड्या प्रमाणात शेतकऱ्यांना स्वातंत्र्य बघण्यास मिळेल.  येणाऱ्या काही दिवसात जे शेतकरी विरोधी कायदे आहे ते रद्द करण्यासाठी किसानपुत्र आंदोलन लढा देत राहील. शेतकरी स्वातंत्र्य पाहिजे त्याला प्रगती करू द्याची असेल तर संविधानातील परिशिष्ट ९ हे रद्द करावे लागेल. शेतकऱ्यांना त्यांचे स्वातंत्र्य मिळणे गरजेचे आहे. जसा काळ बदलतो तसं आपण देखील बदलेले पाहिजे प्रत्येक दिवस सारखा नसतो. त्यामुळे शेती क्षेत्रात कालानुरूप बदल होणे गरजेचे होते आणि जे काही बदल करण्यात आले   त्यामुळे जर शेतकरी प्रगती करू शकत असेल तर आपण ते बदल स्विकारले पाहिजे. 

मयुर बाळकृष्ण बागुल, 

समन्वय समिती सदस्य, किसानपुत्र आंदोलन, पुणे 

चलभाषा – ९०९६२१०६६९

Post a Comment

Previous Post Next Post