एकही राजकीय मुहूर्त पंचागात


 पुढील साडेचार वर्ष पहाटेचा एकही  राजकीय मुहूर्त पंचागात दिसत नाही.... शिवसेना.


PRESS MEDIA LIVE :  मुंबई :

मुंबई – शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर राज्यात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले होते. या पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मध्यावधी निवडणुकीचे भाष्य केले होते.  राज्याच्या राजकारणात ‘वन फाइन मॉर्निंग’ अचानक काहीतरी घडेल, असे भविष्य चंद्रकांत पाटील यांनी वर्तविल्यापासून अनेकांचे घोडे स्वप्नातच उधळू लागले आहेत. फाइन मॉर्निंगला म्हणजे भल्या पहाटे काहीतरी घडेल असे चंद्रकांतदादांना का वाटते ते तपासून घ्यायला हवे. दादांची तब्येत वगैरे बरी आहे ना? त्यांना नीट झोप वगैरे लागते ना? की राजभवनातून अचानक एखाद्या फाइन मॉर्निंगला बोलावणे येईल म्हणून ते झोपतच नाहीत, असे प्रश्न अनेकांना पडले आहेत. चंद्रकांतदादांना फाइन मॉर्निंगला काहीतरी घडेल असे वाटते. हे काही चांगल्या प्रकृतीचे ‘साइन’ नाही.

सध्याचे सरकार पूर्ण पाच वर्षे चालेल याबाबत कोणाच्या मनात शंका असण्याचे कारण नाही. अशी शंका  देवेंद्र फडणवीस यांच्या मनातही नाही, पण चंद्रकांतदादांना पहाटे पहाटे सध्या जाग येत आहे. त्यांची झोपमोड होते की, ते दचकून गचकन जागे होतात यावर पुढचे बरेच काही अवलंबून आहे. 

आजच्या घडीला विधानसभेची मध्यावधी निवडणूक कोणालाही नको आहे. असा आध्यात्मिक विचारही दादांनी पहाटेनंतरच्या सूर्योदयास मांडला आहे. म्हणजे या मंडळींच्या डोक्यात काहीतरी वळवळते आहे. मध्यावधी निवडणुकांची भाकिते करून त्यांना पहाटेचा गजर लावायचा असेल तर ‘घडाळय़ा’चे काटे गतिमान आहेत आणि यावेळी वेळा चुकणार नाहीत याची खात्री बाळगा. सोबतीला हात आहे. हातावर घडय़ाळ आहे व घडय़ाळातून पहाटेचा गजर काढून टाकला आहे. अजित दादांनी आता गजराचे नाही तर टोल्यांचे घडय़ाळ भिंतीवर लावले आहे व ते टोले सतत वाजत असतात. त्यामुळे सगळेच ‘जागते रहो’च्या भूमिकेत आहेत. टोल्यांच्या आवाजामुळे भाजपच्या दादांची पहाट खराब होत असेल तर तो त्यांचा प्रश्न. 

पाच वर्षे राज्य फडणवीस-पाटलांनीही चालवले आहे. त्यामुळे संकटकाळात काय करायचे व काय नाही याचे भान त्यांना असायला हवे. पहाटे पहाटे फडणवीसांना जाग येत नाही, पण चंद्रकांतदादांना दचकून जाग येते हे गंभीर आहे. दादा, दचकू नका! महाराष्ट्रातील राजकारणात ‘पहाट’ योग एकदाच आला व तो योग काही चांगला नव्हता. त्यामुळे नव्या घडामोडींसाठी पहाटेची कुंडली, मुहूर्त कोणी मांडू नयेत. राज्यपालांची सकाळही का बिघडवता? तुमचा खेळ होतो व राजभवन नाहक बदनाम होते. आता बदनाम होण्याचा राजभवनाचा कोटाही संपला आहे. त्यामुळे महाराष्ट्राचे सरकार पुढची साडेचार वर्षे आरामात चालेल. सरकार दिवसरात्र काम करते व पहाटे थोडी साखरझोप घेते. संकट टळले की साखरझोपेत विघ्न येत नाही. पुढील साडेचार वर्षे पहाटेचा एकही राजकीय मुहूर्त पंचांगात दिसत नाही हे आम्ही छातीठोकपणे सांगत आहोत, असा टोलाही शिवसेनेने लगावला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post