कारण गुलदस्त्यात.


 कोरोनाचे गंभीर संकट असताना सत्ताधारी आणि विरोधक मात्र पार्टी मध्ये दंग.

महापौरांच्या बंगल्यावर पार्टीचे आयोजन केले होते , पार्टीचे कारण गुलदस्त्यात.

PRESS MEDIA LIVE :. पुणे : मोहम्मद जावेद मौला.

पुणेकर कोरोनाच्या गंभीर संकटात असतानाच सत्ताधारी भाजप आणि विरोधक मात्र पार्टी करण्यात दंग आहेत. महापौर बंगल्यावर बुधवारी रात्री सुग्रास जेवणाच्या पार्टीचे आयोजन केले होते. विशेष म्हणजे सत्ताधारी पदाधिकार्‍यांसह विरोधी पक्षांचे गटनेते या पार्टीला उपस्थित होते. या पार्टीचे कारण मात्र गुलदस्त्यात आहे.

कोरोनाच्या साथीने पुण्यात गंभीर रूप धारण केले आहे. रुग्णालयांमध्ये बेड्स मिळत नाहीत. राज्य शासन आणि महापालिकेने उभारलेली जम्बो कोविड सेंटर पूर्ण क्षमतेने सुरू झालेली नाहीत. अशा परिस्थितीत उपाययोजना करण्याऐवजी महापालिका आणि राज्य सरकार एकमेकांकडे बोटे दाखविण्याचे काम करीत आहेत.असे चित्र असतानाच या सर्व मंडळींनी एकत्र येऊन महापौर बंगल्यावर पार्टी केली असल्याचे समोर आले आहे.

                    पार्टीतील माननीय

या पार्टीला महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यासह उपमहापौर सरस्वती शेंडगे, सभागृहनेतेधीरज घाटे, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ, काँग्रेसचे गटनेते आबा बागुल, शिवसेनेचे पृथ्वीराज सुतार, मनसेचे वसंत मोरे यांच्यासह काही नगरसेवकही उपस्थित असल्याचे सांगण्यात आले.

पार्टीचे कारण गुलदस्त्यात काँग्रेसच्या एका पदाधिकार्‍याकडून ही पार्टी ठेवण्यात आली होती. मात्र, या पार्टीच्या आयोजनाचे कारण मात्र समजू शकले नाही. एकीकडे बुधवारी दुपारी काँग्रेसने पालिका कर अभय योजनेवरून भाजपवर जोरदार टीका केली होती, तर दुसरीकडे ही मंडळी पार्टीसाठी एकत्र आल्याने आश्‍चर्य व्यक्‍त केले जात आहे. मुळातच पुण्यातील परिस्थिती गंभीर असताना अशी पार्टी करण्याची ही वेळ आहे का आणि याचे भान महापौरांसह अन्य पदाधिकार्‍यांना नाही का, असे प्रश्न आता उपस्थित झाले आहेत.

Post a comment

0 Comments